सुधीर जोशी sudhirjoshi23@gmail.com
भांडवली बाजारात सध्या अस्थिरतेचे वातावरण आहे. जागतिक बाजारपेठेत धातूंच्या वाढत्या दरांमुळे व खनिज तेलाच्या उच्चांकी दरांमुळे काही क्षेत्रातील समभागांनी मार खाल्ला तर खांनी तेजी दर्शविली. विरोधाभासी काळात बाजारातील रस्सीखेच अशीच काही काळ सुरू राहील. मात्र बाजारातील सर्वव्यापी विक्रीच्या मारम्य़ामुळे गेल्या चार सप्ताहांत बाजाराचे प्रमुख निर्देशांक सात टक्कय़ांनी खाली आले. सध्या तरी मंदीवाल्यांचे पारडे जड आहे; पण लवकरच बाजाराला तळ सापडून स्थैर्य येईल.
सरल्या सप्ताहात युद्धाच्या व वाटाघाटीच्या बातम्यांचा वेध घेत बाजार त्यावर प्रतिक्रिया देत होता. अस्थिरता पराकोटीची होती. जागतिक बाजारपेठेत धातूंच्या वाढत्या दरांमुळे व खनिज तेलाच्या उच्चांकी दरांमुळे रंग, रसायन, सिमेंट व वाहनउद्योगांवर विक्रीचा मारा झाला तर पोलाद व इतर धातू कंपन्यांमध्ये तसेच माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांमध्ये तेजीची लाट आली. तरीदेखील बाजारातील सर्वव्यापी विक्रीच्या माऱ्यामुळे सतत चौथ्या सप्ताहात बाजार घसरणीने बंद झाला. गेल्या चार सप्ताहांत बाजाराचे प्रमुख निर्देशांक सात टक्क्यांनी खाली आले आहेत.
मिहद्र हॉलिडेज : मिहद्र हॉलिडेज अँड रिसॉर्ट्स ही कंपनी आपल्या ८० रिसॉर्ट्स व हॉटेल्सद्वारे सुट्टीतील निसर्गरम्य ठिकाणच्या सहलीसाठी देशात व परदेशात सुविधा पुरविते. कंपनीकडे दीड लाखांहून अधिक सदस्यांची नोंदणी झाली आहे. करोनानंतर जसे निर्बंध संपुष्टात येत आहेत तशी लोकांची सहलीला जाण्याची संख्या वाढत आहे. डिसेंबरअखेर तिमाहीत या कंपनीला १४ कोटी रुपयांचा नफा झाला होता जो वर्षांपूर्वीच्या याच तिमाहीत करोनाच्या प्रभावामुळे केवळ १७ लाख रुपयांचा होता. समभागांचा सध्याचा भाव वर्षभराच्या गुंतवणुकीसाठी योग्य वाटतो.
सफारी इंडस्ट्रीज : गेली दोन वर्षे करोनाच्या निर्बंधांमुळे बाधित झालेली ही आणखी एक कंपनी. प्रवासी बॅगांच्या व्यापारात २३ टक्के हिस्सा असलेल्या या कंपनीने हलोल येथील कारखान्यात नवीन उत्पादन क्षमता निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे तसेच बॅगांचे प्रकार १०० वरून ८०० पर्यंत वाढविले आहेत. कंपनीने आपली वितरण व्यवस्थाही मजबूत केली आहे. प्रवासी बॅगांमध्ये सॅम्सोनाइट व व्हीआयपी या कंपन्या आघाडीवर असल्या तरी त्यांची उत्पादने उच्च किमतीची तर सफारी सामान्य ग्राहकांना परवडतील अशा बॅगा, बॅकपॅक व शालोपयोगी बॅगांची विक्री करते. येणाऱ्या काळात सहल, समारंभ व ऑफिसला जाणाऱ्यांच्या संख्येत होणारी वाढ कंपनीला लाभदायक ठरेल. सध्या ८७० रुपयांच्या आसपास असलेला भाव शंभर रुपयांची वाढ देऊ शकेल.
अपोलो हॉस्पिटल्स : अपोलो हॉस्पिटल्सने आपले फार्मसीशी संबंधित ऑनलाइन व ऑफलाइन असे सर्व व्यवसाय व अपोलो २४/७ डिजिटल व्यवसाय एका उपकंपनीत एकत्रित केले. त्यामुळे ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या सेवांचे सुसूत्रीकरण होईल व हॉस्पिटल्स, औषध सेवा हे आरोग्यसेवेशी संबंधित, पण भिन्न प्रकारे हाताळावे लागणारे व्यवसाय वेगवेगळय़ा चमूंकडून कार्यक्षमतेने हाताळले जातील. कंपनीकडे ७१ सुसज्ज इस्पितळे आहेत तसेच ४,३०० औषध दुकाने त्यांच्याशी जोडलेली आहेत. करोनामुळे स्पेशालिटी हॉस्पिटल्समधील इतर शस्त्रक्रिया कमी केल्या गेल्या; पण आता या सेवांची मागणी वाढेल. थोडय़ा दूरच्या लाभासाठी या कंपनीमध्ये सध्याच्या भावात केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल.
हिंडाल्को : युक्रेन व रशियामधील युद्ध व त्यामुळे रशियावर आलेले व्यापार निर्बंध यामुळे जागतिक बाजारपेठेतील अॅल्युमिनियम व पोलादाच्या पुरवठय़ावर परिणाम होणार आहे. जगातील अॅल्युमिनियम व स्टीलच्या निर्यातीत रशियाचा वाटा अनुक्रमे १० व १३ टक्के आहे. वाहन क्षेत्रातील संचित मागणी व विद्युत वाहनांच्या वाढत्या मागणीमुळे अॅल्युमिनियमची मागणी वाढतच राहील. हिंडाल्कोच्या डिसेंबरअखेरच्या नफ्यात (३,६६० कोटी रुपये) वार्षिक तुलनेत ८१ टक्के वाढ झाली होती. कंपनीच्या उज्ज्वल भविष्याची बाजाराने नोंद घेतली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांतील बाजाराच्या पडझडीतही हिंडाल्कोचे समभाग वधारले. हिंडाल्कोचे समभाग थोडय़ा घसरणीची संधी मिळेल तेव्हा घेता येतील.
भू-राजकीय तणावांवर बाजाराची तात्काळ आलेली प्रतिक्रिया नेहमीच टोकाची – ‘नी-जर्क’ धाटणीची असते; पण काही महिन्यांतच बाजार सावरतो. कुवेतचे युद्ध, कारगिलचे युद्ध या काळातही असाच अनुभव आला आहे; पण या वेळी उत्तर प्रदेशच्या निवडणुकांचे निकाल, व्याजदर वाढण्याची शक्यता, आतापर्यंत रोखून ठेवलेल्या इंधन दरात मोठी वाढ होण्याची भीती व एलआयसीच्या समभाग विक्रीमुळे बाजारातील रोकड तरलता कमी होण्याची शक्यता अशा बाबीदेखील महत्त्वाच्या ठरणार आहेत. भारतातील औद्योगिक व शेतकी उत्पादन, वस्तू व सेवा कर संकलनातील सातत्य हे देशाची आर्थिक परिस्थिती आलबेल असल्याचे दर्शविते. अशा विरोधाभासी काळात बाजारातील रस्सीखेच अशीच काही काळ सुरू राहील. सध्या तरी मंदीवाल्यांचे पारडे जड आहे; पण लवकरच बाजाराला तळ सापडेल. कारण या महिनाअखेपर्यंत यातील बऱ्याच गोष्टींबाबत उलगडा झालेला असेल व बाजाराला स्थैर्य येईल.
या सप्ताहातील या घडामोडींवर लक्ष ठेवा
* मेट्रो ब्रॅण्ड्स, सन टीव्ही, श्रीराम सिटी युनियन फायनान्स, श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स, टीव्हीएस इलेक्ट्रॉनिक्स या कंपन्या अंतरिम लाभांशाची घोषणा करतील.
* उत्तर प्रदेश, पंजाब व इतर राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल.
* पेट्रोल-डिझेल दरात होऊ शकणारी वाढ.