सुधीर जोशी sudhirjoshi23@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भांडवली बाजारात आधीच्या काही सप्ताहातील सततच्या घसरणीनंतर सरलेल्या सप्ताहात तेजी-मंदीचा लपंडाव सुरू होता. पहिल्या दोन दिवसांतील तेजीने बाजारात परत उत्साह भरला. जगाच्या अर्थव्यवस्थेतील दुसऱ्या क्रमांकाच्या चीनने टाळेबंदी शिथिल केल्याने तसेच तंत्रज्ञान कंपन्यांसाठी अनुकूल पावले टाकण्याच्या निर्णय बाजाराला तेजी देणारा ठरला. मात्र हा उत्साह क्षणभंगुरच ठरला. अमेरिकेतील महागाईचे रौद्र रूप, आर्थिक मंदीचा धोका आणि त्या परिणामी तेथील बाजारातील मोठी पडझड, डॉलरच्या तुलनेत रुपयातील घसरण याचे प्रतिबिंब नंतरच्या दोन दिवसांत देशांतर्गत बाजारात मोठय़ा पडझडीने पाहायला मिळाले. सप्ताहातील अखेरच्या दिवशी पुन्हा एकदा अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी चीनच्या व्याजदर कमी करण्याच्या निर्णयाने बाजारात मोठी तेजी आली आणि निर्देशांक साप्ताहिक तुलनेत ३ टक्क्यांनी वधारले.

* बालाजी अमाइन्स: या विशिष्ट रसायन उत्पादकाने मार्चअखेरच्या तिमाहीत बाजी मारत २०२२ या आर्थिक वर्षांची अखेर दमदार केली. कंपनीच्या उत्पन्नात ७६ टक्के तर नफ्यात ७१ टक्के वाढ झाली. कंपनी डायमेथिल काबरेनेटच्या उत्पादनास महिन्याभरात सुरुवात करत आहे. लिथियम बॅटरीमध्ये वापरल्या जाणाऱ्या या घटकाचा पुरवठा सध्या संपूर्णपणे आयातीवर अवलंबून आहे. कंपनी इतर रासायनिक उत्पादनांची क्षमता निर्माण करीत आहे, ज्याचे फायदे पुढील एक-दोन वर्षांत दिसून येतील. सध्याच्या बाजार भावात (२९४३ रुपये प्रति समभाग) या समभागात गुंतवणुकीची संधी आहे.

* इमामी: या आयुर्वेदिक औषधनिर्मिती आणि ग्राहकोपयोगी उत्पादने बनविणाऱ्या कंपनीचा नफा मार्चअखेरच्या वर्षांसाठी गेल्या वर्षीच्या ४५४ कोटींवरून ६०६ कोटी झाला आहे. कंपनीने जाहिरातीवरील खर्च वाढविला असला तरीही कंपनीला नफ्याचे प्रमाण कायम राखता आले आहे. कंपनीच्या वार्षिक निर्यातीत ८ टक्के वाढ झाली. कंपनीच्या झंडू नाममुद्रेअंतर्गत उत्पादनांच्या विक्रीत ९ टक्के वाढ झाली. तंत्रज्ञानाचा वापर करून कंपनी ‘झंडू पोर्टल’ मार्गे कंपनी आतापर्यंत ४२ लाख ग्राहकांशी जोडली गेली आहे. खोज नावाच्या उपक्रमाद्वारे कंपनी ग्रामीण भागातील व्यवसाय वाढविण्याचा प्रयत्न करीत आहे. सध्याचा चारशे रुपयांच्या आसपासचा भाव या क्षेत्रातील कंपन्यांच्या तुलनेत आकर्षक आहे.

* मुथुट फायनान्स: सोन्याच्या तारण ठेवून त्यावर कर्ज देणारी ही आघाडीची कंपनी आहे. कंपनीने जाहिरात व ग्राहक प्रशिक्षणाद्वारे या कर्जाचा व्यवसाय असंघटित क्षेत्राकडून संघटित क्षेत्राकडे यशस्वीरीत्या वळविला आहे. यामध्ये अजूनही खूप वाव आहे. अधिक नोकरभरती न करता कंपनीने गेल्या पाच वर्षांत आपला व्यवसाय दुप्पट केला आहे. कंपनीला एए मानांकन आहे, त्यामुळे कंपनीला कर्ज मिळण्यात फायदा असतो. कंपनीचे वार्षिक निकाल अजून जाहीर झालेले नाहीत. मात्र डिसेंबरअखेरच्या नऊ महिन्यांच्या कामगिरीत सातत्य आहे. बाजारात गेल्या काही सप्ताहांत झालेल्या घसरणीत हे समभाग ११६० रुपयांच्या आसपास व्यवहार करत आहेत. ही पातळी खरेदीसाठी आकर्षक आहे.

* कजारिया सिरॅमिक्स: सरल्या आर्थिक वर्षांत कंपनीच्या उलाढालीत एक हजार कोटींची वाढ होऊन ती ३,७०५ कोटींवर पोहोचली आहे. नफादेखील २२ टक्क्यांनी वाढला आहे. कंपनीच्या नाममुद्रेला असणारी लोकप्रियता, निर्यातीत होणारी वाढ, गृह बांधणी क्षेत्रातील वाढती मागणी आणि मध्यम व लहान शहरांमध्ये कंपनी वाढवत असलेला कारभार या काही कंपनीच्या जमेच्या बाजू आहेत. नजीकच्या काळातील इंधन वायूचे वाढते दर हा काळजीचा विषय असला तरी कंपनी किमती वाढवून त्याचा मुकाबला करू शकेल. सध्या ९५०-१००० रुपयांच्या पातळीत दोन वर्षांसाठी गुंतवणूक करता येईल.

अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेने महागाई कमी होत नाही, तोपर्यंत व्याजदर वाढविण्याचे संकेत दिले आहेत. भारतीय रिझव्‍‌र्ह बँकेच्या व्याजदर आढावा समितीचेदेखील तसेच धोरण आहे. आता या उपायांनी महागाई काबूत आली तर बाजाराची पुढील वाटचाल सुकर होईल. पण तोपर्यंत बाजाराची वाट बिकटच राहील. तेजी-मंदीच्या मोठय़ा लाटा येत राहतील. त्याचा फायदा मात्र करून घेता आला पाहिजे.

सप्ताहातील काही निवडक घटना:

i ) अदानी समूहाने होल्सिमच्या अधिग्रहणाच्या माध्यमातून एसीसी व अंबुजा सिमेंट कंपन्यांवर मिळविलेल्या ताब्याने या क्षेत्राच्या ध्रुवीकरणास जोर मिळेल. लहान कंपन्यांना मोठय़ा आक्रमक उद्योगांबरोबर स्पर्धा करणे कठीण जाईल. त्यामुळे या क्षेत्रातील गुंतवणूक अल्ट्राटेक, दालमिया आणि श्री सिमेंटसारख्या मोठय़ा उद्योगात ठेवणे फायद्याचे राहील.

ii) खाद्यतेलाची सर्वात मोठी कंपनी, रुची सोयाने पतंजली आयुर्वेद लिमिटेडच्या खाद्यान्न व्यवसाय ताब्यात घेतला. त्यामुळे कंपनीचा तयार खाद्यान्न व्यवसाय ६ ते ७ हजार कोटींचा होईल. त्यावर १५ ते २० टक्के नफ्याची अपेक्षा आहे. बाजारातील मोठय़ा घसरणीतही रुची सोयाचे समभाग स्थिर होते. या कंपनीत थोडी गुंतवणूक करून पुढील सहा महिन्यांत आर्थिक कामगिरी बघून ती वाढवता येईल.

iii) निराशेने व्यापलेल्या बाजारातील वातावरणात उठून दिसले आयटीसीचे समभाग! करोनाचे निर्बंध गेल्यावर कंपनीचे सिगारेट, हॉटेल, कागद असे सर्वच व्यवसाय दमदार कामगिरी करू लागले आहेत. कंपनीने जाहीर केलेला लाभांशही गुंतवणूकदारांना पसंत पडला. त्यामुळे या समभागात विक्रीचा मारा झाला नाही आणि लवकरच हे समभाग ३०० रुपयांचा स्तर गाठण्याचा विश्लेषकांचा कयास आहे.

सप्ताहातील या घडामोडींकडे लक्ष ठेवा *  कावेरी सीड्स, कोलगेट, मुथुट फायनान्स, पटेल इंजिनीअरिंग, झोमॅटो, बलरामपूर चीनी, डिव्हीज लॅब, डेक्कन सिमेंट, अशोका बिल्डकॉन,फॉर्टिस हेल्थकेअर, मॅक्स हेल्थकेअर, पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन, सुझलॉन, सुदर्शन केमिकल्स, जिंदाल स्टील अँड पॉवर, कोल इंडिया या कंपन्या गेल्या आर्थिक वर्षांचे निकाल जाहीर करतील. *  लेटंट व्ह्यू, बिर्ला सॉफ्ट, एमटार टेक्नॉलॉजी या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्या गेल्या आर्थिक वर्षांचे निकाल जाहीर करतील. *  बिर्ला सॉफ्टकडून समभागांच्या पुनर्खरेदीची घोषणा

मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Stock market weekly update weekly market recap zws