मागच्या लेखात आपण २०१२ मध्ये सुचवलेल्या ३०% पेक्षा अधिक नफा मिळवून देणाऱ्या शेअरचा आढावा घेतला. आजच्या लेखात आपण तोटय़ातील शेअरचा आढावा घेणार आहोत. मात्र तत्पूर्वी ‘स्टॉप लॉस’ म्हणजे काय? ही पद्धत कधी अवलंबायची आणि या पद्धतीचा फायदा काय किंवा नक्की गणित काय अशा काही वाचकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरेही शोधणार आहोत. ‘स्टॉप लॉस’ याचा शब्दश: अर्थ म्हणजे नुकसान थांबवणे. एखाद्या कंपनीचा शेअर खरेदी करताना कुठलाही गुंतवणूकदार विक्रीची एक लक्ष्य किंमत ठरवत असतो. उदा. ३-४ महिन्यांपूर्वी तुम्ही १०० रुपयांना िहदाल्को खरेदी करताना तो ठरावीक (६ महिन्यांत) काळात १३० होईल तेंव्हा आपण तो विकून टाकायचा असे ठरवले असेल तर तुमची लक्ष्य किंमत १३० रुपये आणि शेरा राखून ठेवायचा कालावधी ६ महिने राहील. जर अपेक्षेप्रमाणे सहा महिन्यांत िहदाल्को १५० रुपयांवर गेला तर तुमचे गणित आणि अभ्यास उत्तम आहे; मात्र काही वेळा हाच अंदाज चुकूही शकतो. म्हणजे याच उदाहरणात अनेक शक्यता येतात. जसे –
* एकाच महिन्यात िहदाल्कोचा बाजारभाव १५० रुपयांवर गेला.
* सहाही महिने बाजारभाव १०० रुपयांच्या आसपासच राहिला.
* खरेदीनंतर एकाच महिन्याच्या आत बाजारभाव ७५ रुपयांवर घसरला.
कुठलीही गुंतवणूक करताना त्यावर मिळणाऱ्या परताव्याचा विचार गुंतवणूकदार करतच असतो. त्याचबरोबर हा परतावा किती काळात मिळायला हवा याचाही अंदाज बांधत असतो. मुदत ठेवी किंवा रोख्यांसारख्या गुंतवणुकीवर असा अंदाज बांधायची गरज नसते. कारण गुंतवणूक करतानाच किती टक्के व्याज मिळणार आहे, तसेच गुंतवणुकीचा कालावधी आणि पतमापानामुळे त्यातील धोका वगरे बाबी गुंतवणूकदाराला गुंतवणूक करतानाच माहिती असतात. शेअरमधील गुंतवणूक मात्र तुमचा अभ्यास आणि अंदाज यावरच आधारित असते. हे अंदाज चुकूही शकतात आणि अर्थातच नफा, तोटा तर सोडाच, पण तुमचे मुद्दलही गमावून बसण्याची शक्यता असते. म्हणूनच शेअर बाजारातील गुंतवणूक ही धोक्याची समजली जाते.
आता वरच्या उदाहरणात गुंतवणूकदार आपापल्या विचाराप्रमाणे पुढीलपकी कुठलाही निर्णय घेऊ शकतो.
* लक्ष्य किंमत आल्यावर शेअर विकून टाकणे.
* ठरावीक कालावधीमध्ये लक्ष्य किंमत न मिळाल्यास शेअर आहे त्या बाजारभावाला विकून टाकणे किंवा कालावधी वाढवणे.
* खरेदी केल्यावर शेअरचा भाव पडायला लागल्यास अजून शेअर खरेदी करणे आणि सरासरी खरेदी किंमत कमी करणे.
* गुंतवणूक करतानाच शेअर किती भावापर्यंत ठेवायचा हे निश्चित करणे. म्हणजे िहदाल्को खरेदी केल्यानंतर तो ८५ च्या खाली गेला तर मी तोटा सहन करून विकून टाकेन.
थोडक्यात नफा किती मिळवायचा याचप्रमाणे तोटा किती सहन करायचा हेही गुंतवणूक करताना ठरवायचे. तोटा सहन करणे किंवा ‘स्टॉप लॉस’ पद्धतीमुळे तुमचे पुढील नुकसान वाचू शकते. अर्थात इथेही गुंतवणूकदराची मानसिकता महत्त्वाची ठरते. बऱ्याचदा बहुतांशी नवखे गुंतवणूकदार पडणारा शेअर बघत नुकसान सहन करतात आणि नुकसान वाढवून घेतात. त्याऐवजी थोडे नुकसान सहन करून तीच रक्कम दुसऱ्या शेअरमध्ये वळवली तर फायद्याची ठरू शकते. पोर्टफोलियो तयार करताना आपल्या गुंतवणुकीवर सतत लक्ष असावे ते याच करता.

मागच्या लेखात आपण २०१२ मध्ये पोर्टफोलियोसाठी सुचवलेल्या आणि ३०% जास्त फायद्यात असलेल्या शेअरचे काय करायचे ते पाहिले. आज अर्थात तोटय़ातील किंवा सध्या नुकसानात असलेल्या काही शेअरबद्दल. एक चांगली बाब म्हणजे सुचवलेल्या ४७ शेअरपकी केवळ ५ कंपन्यांचे शेअर ३०% अधिक नुकसानात आहेत. आणि मागे सांगितल्याप्रमाणे एकूण संपूर्ण पोर्टफोलियोचा परतावा ४६% पेक्षा अधिक आहे. त्यामुळे ज्या गुंतवणूकदारांनी सगळेच सुचवलेले शेअर खरेदी करून राखून ठेवले असतील तरीही त्यांना नुकसान झालेले नाही.
ज्या गुंतवणूकदारांनी हे किंवा असेच शेअर विकून टाकून तोटा कमी केला असेल त्यांचा प्रश्नच नाही. परंतु ज्यांनी हे शेअर ठेवून दिले असतील त्या गुंतवणूकदारांसाठी हा प्रपंच. गेल्या वर्षी सोन्यातील गुंतवणूक तोटय़ाचीच ठरली तर शेअर बाजाराने मात्र ९% परतावा दिला. यंदाच्या वर्षीही शेअर बाजारातील गुंतवणूक सोन्यापेक्षा जास्त झळाळी मिळवून देईल, असे वाटत असले तरीही आपला पोर्टफोलियो मात्र फायद्यातच राहणार हे निश्चित.

Story img Loader