डॉ. आशीष थत्ते

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बुडीत खर्च संकल्पना तशी आपण रोजच्या जीवनात खूप वेळा वापरतो. मात्र कंपन्या कसे बुडीत खर्च करतात याची या भागात माहिती घेऊया आणि मग पुढील भागात रोजच्या जीवनातील उदाहरणे पाहू. जो खर्च आपण आधी केलेला आहे आणि आता पुढील कुठल्या निर्णयासाठी हा केलेला खर्च आता उपयोगाचा नसेल किंवा त्यातून इच्छित निष्पन्न होणार नसेल तर त्याला बुडीत खर्च किंवा आपल्या बोलीभाषेत बुडीत खात्यात टाकले असे आपण म्हणतो. बुडीत खर्च ही संकल्पना जेवढी व्यवसायात वापरली जाते तेवढाच अर्थशास्त्रातदेखील यावर खूप अभ्यास झाला आहे. त्यामुळे या दोन्ही शाखांचा त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन थोडासा वेगळा असू शकतो.

व्यवसायामध्ये निर्णय घेताना पुढे होणाऱ्या खर्चाचा विचार केला जातो आणि योग्य माहितीच्या आधारे निर्णय घेतला जातो. मात्र जे खर्च आधीच केले आहेत त्यांचा निर्णय घेण्यात सहभाग नसतो. पण तरीही पुढील निर्णय घेताना मागे झालेला खर्चाचा विचार केला जातो किंवा त्यातून मिळालेल्या शिकवणुकीला लक्षात घेतले जाते. कंपन्या आपल्या वस्तूंच्या विक्री आणि विपणनावर खूप खर्च करतात. एखाद्या वस्तू-सेवेला बाजारात मागणी आहे वा नाही तरीही अशावर केलेला खर्च कंपन्या पुढील कुठल्याही निर्णय प्रक्रियेत समाविष्ट करत नाहीत. संशोधन आणि विकासावर (रिसर्च अँड डेव्हलपमेंट) होणारा खर्चदेखील असाच असतो. कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांवर हजारो रुपये फक्त प्रशिक्षणावर खर्च करतात आणि अचानक तो कर्मचारी नोकरी सोडून जातो, मग हा खर्च नक्की कुठे मोजायचा तर तो थोडक्यात तो बुडीत खात्यातील खर्च असतो. कंपन्यांनी यामधून बोध घेऊन प्रशिक्षणाला जाणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून तसा करारनामा करून घेतात. जेणेकरून त्यांनी काही वर्षे काम करावे किंवा विशिष्ट कालावधीत सोडून गेल्यास तेवढे पैसे कंपनीला परत करावे.

बऱ्याचदा कंपन्यांना आणि आपल्यालासुद्धा खर्च झाल्यावर असे वाटू लागते की याचा काहीतरी उपयोग करावा. भविष्यात कधीतरी याचा उपयोग होईल म्हणून आपण खर्च करणे सुरू ठेवतो. बऱ्याच कंपन्या नवीन सॉफ्टवेअर घेतात किंवा तंत्रज्ञावर खर्च करतात. मात्र हा खर्च वाया गेला आहे असे लक्षात येऊनदेखील कधीतरी त्याचा फायदा होईल या आशेवर अजून खर्च करतात. अशा प्रकारचा भ्रम (फॉलसी) असल्यामुळे बऱ्याचदा आपण अतार्किक निर्णय घ्यायला लागतो. विशेषत: जेव्हा एखादे उत्पादन करणारे यंत्र कंपनी घेते, त्याचवेळी बाजारात नवीन आधुनिक यंत्र आले तर तुमच्या मालाचा खप कमी किंवा नाहीसादेखील होतो. अशावेळेला नवीन यंत्र घेणे हेच योग्य असते. जसे पैसे तसेच वेळेसाठीदेखील ही संकल्पना लागू होते.

हा लेख वाचल्यावर बरीच अशी उदाहरणे तुम्हाला रोजच्या जीवनातील नक्कीच आठवतील. त्यांचे अर्थभानह्ण पुढील सोमवारी बघूया. तुम्हाला काही अशी तुमच्या जीवनातील उदाहरणे सुचली तर जरूर कळवा.

* लेखक कॉस्ट अँड मॅनेजमेण्ट अकाउंटंट म्हणून कार्यरत / ashishpthatte@gmail.com

@AshishThatte

मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sunk cost definition sunk cost effect meaning of sunk cost zws