डॉ. आशीष थत्ते
आपण विविध कारणांसाठी बरेचसे पैसे खर्च करतो आणि मग लक्षात येते की त्या खर्चाचा काही फारसा उपयोग झाला नाही किंवा काहीच उपयोग झाला नाही. त्यामुळे बुडीत खर्च संकल्पना काही आपल्याला नवीन नाही. माझ्या एका मित्राच्या मुलीच्या विशिष्ट शाखेच्या प्रवेशासाठी त्याने देशभरातील सुमारे ५ महाविद्यालये पालथी घातली आणि शेवटी प्रवेश घेतला तो पुण्यातच. म्हणजे देशभरात फिरण्याचा खर्च बुडीत खात्यात गेला, असे कित्येक खर्च आपण उगाचच करतो. खर्च करतेवेळी बऱ्याचदा त्यातून काय निष्पन्न होणार आहे हे माहिती नसते. खर्च हा केवळ पैशात होत नसून वेळ देखील खर्च करतो, जो बऱ्याचदा लक्षात घेतला जात नाही.
आपण बऱ्याच वेळेला एखाद्या नाटकाला, मैफिलीला किंवा सिनेमाला जातो आणि तो खूपच वाईट असतो. आपल्यापैकी किती लोक तो अर्धवट सोडून जातात? अगदी कितीही विश्लेषण वगैरे वाचले असले तरीही असे होते की सिनेमा आवडला नाही, किंवा मैफील फारशी रंगत नाही म्हणजे वेळ आणि पैसे दोन्ही बुडीत खात्यात जातात. उपाहारगृहात आपण एखादा छान पदार्थ मागावतो. मात्र तो अगदी बेचव किंवा आपल्याला आवडला नसला तरी आपण पैसे बुडीत खात्यात जाणार असल्यामुळे आपण तो खाऊन संपवतो. एखादा समभाग आपण जास्त बाजारभाव असताना घेतो आणि काही दिवसांतच तो कोसळतो. पण बरेच लोक त्या भ्रमात असतात की तो भविष्यात वाढेल म्हणून विकत नाही. स्वत:जवळ बाळगून ठेवतात. खरे तर नंतर त्यांची किंमत कमी होते किंवा अगदी घेतलेल्या किमतीपासून कमी झाल्याने गुंतवलेली रक्कम बुडीत खात्यात जाते. आता टी २० विश्वचषक सुरू झाला आहे. एखाद्या फलंदाजाने जर काही जास्त चेंडू स्थिर व्हायला घेतले आणि नंतर त्यातून चांगल्या धावा नाही काढल्या तर? बुडीत खात्यात गेलेले चेंडू आता परत खेळायला मिळत नाहीत. मिस्बाह उल हकला आज देखील पाकिस्तानमध्ये २००७ च्या टी २० विश्वचषकातील संथ खेळीबद्दल पराभवाला जबाबदार ठरवले जाते. विद्यार्थी खूप वेळेला कुणाच्या तरी मर्जीखातर एखादी विद्याशाखा निवडतात आणि मग काही महिने किंवा वर्ष झाली की त्यांना लक्षात येते की, हे काही माझे क्षेत्र नव्हे. म्हणजे खर्च केलेले पैसे किंवा वेळ बुडीत खात्यातच जातो. पूर्वी सर्रास औषधे किंवा खाण्याच्या वस्तू कालबाह्यतेचीतारीख निघून गेली तरी सेवन करायचो. उद्देश एकच की तो खर्च बुडीत खात्यात जायला नको. आता मात्र आपण अधिक जागरूक झालो आहोत. शिवाय आधीपेक्षा क्रयशक्ती वाढली असल्याने आपण असे करत नाही. बऱ्याचदा नातेसंबंध देखील यशस्वी होतातच असे नाही. त्यावर खर्च केलेले पैसे आणि वेळ बुडीत खात्यात जातो.
बुडीत खर्च होतो आणि होतच राहतो. कारण बऱ्याचदा कोणीही आपली चूक सहजासहजी मान्य करत नाही. सरकारी खर्च जो फुकट जातो तो मुख्यत्वेकरून या कारणामुळेच जातो. गुंतवणूक करताना भावनांपासून दूर राहून भविष्यातील गोष्टींचा विचार करून ती केल्यास कदाचित त्या बुडीत खर्चात जाणार नाहीत. दिवाळीत फटाके फोडणे हे आपण बुडीत खर्चात समाविष्ट केल्यामुळे त्यांची हल्ली फक्त प्रतीकात्मक खरेदी केली जाते. मात्र कपडे आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू जसे मोबाइल, गॅझेट यांची ऑनलाइन खरेदी मात्र जोरात आहे. त्यामुळे तुम्हाला सर्वाना दीपावलीच्या शुभेच्छा. या वस्तू विकत घेऊन वापरा नाहीतर त्यांचा बुडीत खर्चात समावेश करावा लागेल. आणि हो बुडीत खर्चाच्या भ्रमाच्या मानसिकतेचा फायदा घ्यायचा असेल तर लगेच दिवाळीची सवलत चालू असणाऱ्या कुठल्यातरी जिमचे महागातले सदस्यत्व घ्या आणि खर्च बुडीत होणार नाही म्हणून रोज सकाळी तिथे नक्की जा!
लेखक कॉस्ट अँड मॅनेजमेण्ट
अकाउंटंट म्हणून कार्यरत /
ashishpthatte@gmail. Com/@AshishThatte