|| सुधीर जोशी
चारच दिवस व्यवहार झालेल्या गेल्या सप्ताहात पहिल्याच दिवशी सेन्सेक्सला १,५०० अंशाचा तडाखा देऊन बाजाराने गुंतवणूकदारांना भयभीत केले. अतिशय अस्थिर वातावरणात अनेक लहान कंपन्यांना खालचे सर्किट लागले. दुसऱ्या दिवशी बँका, वाहने व दूरसंचार क्षेत्राच्या निवडक कंपन्यामध्ये खरेदी होऊन बाजार सावरला. पण नंतरच्या दिवसात घसरण सत्र सुरूच राहिले व सेन्सेक्स आणि निफ्टीला साप्ताहिक स्तरावर ३ टक्क्यांची झळ सोसावी लागली.
अॅक्सिस बँक: अॅक्सिस बँकेने बाजाराला चकित करणारे निकाल जाहीर केले. बँकेच्या नफ्यात मागील तिमाहीच्या तुलनेत १५ टक्के तर मागील वर्षाच्या तुलनेत २२४ टक्के वाढ झाली. बँकेने दिलेल्या कर्जांमध्ये सहेतुक कर्जचुकवेगिरीचे प्रमाण ६.७७ वरून ३.१७ टक्के घसरले. बँकेचा समभाग गेले वर्षभर मागे रेंगाळत आहे. बँकेच्या इतर व्यवसायांचे मूल्य जरी बाजूला ठेवले तरी इतर मोठ्या खासगी बँकांच्या तुलनेत अॅक्सिस बँकेचा समभाग स्वस्तात मिळतो आहे. बाजारातील घसरणीच्या काळात आता हे समभाग जमवायला हरकत नाही.
मारुती सुझुकी: बाजारात मोठी घसरण होत असताना मारूती सुझुकीचे समभाग तेजीत होते. कंपनीचे डिसेंबर अखेरच्या निकालानुसार कंपनीला जरी मागील वर्षाएवढी कामगिरी करता आली नाही तरी या आधीच्या तिमाहीच्या तुलनेत वाहन विक्रीत १३ टक्के तर नफ्यात ११३ टक्के वाढ करता आली. सेमीकंडक्टर चिपच्या तुटवड्यामुळे उत्पादनात मोठी घट झाली. पण ही परिस्थिती आता सुधारत आहे. करोनानंतर खासगी वाहनांना मिळत असलेल्या पसंतीमुळे कंपनीकडे अडीच लाखांहून अधिक मागण्या बाकी आहेत. भविष्यातही ग्रामीण तसेच शहरी भागातून वाहनांच्या मागणीत वाढ होण्याची शक्यता आहे. इंधनाच्या वाढत्या दरांमुळे ग्राहकांचा कल सीएनजीकडे वळत आहे ज्यामध्ये मारुतीचा मोठा वाटा आहे. विद्युत शक्तीवर चालणाऱ्या वाहनांमध्ये मारुती जरा मागे पडली असली तरी योग्यवेळी कंपनी या बाजारपेठेत उतरेल. कंपनीचे समभाग थोड्या घसरणीची वाट पाहून टप्प्याटप्प्याने जमवावेत.
परसिस्टंट सिस्टीम्स: कंपनीची मिळकत ४४ टक्क्यांनी वाढून ९२८ कोटी झाली, तर नफा ३७ टक्क्यांनी वाढून १७३ कोटी झाला. सॉफ्टवेअर कॉर्पोरेशन इंटरनॅशनल ही कंपनी घेतल्यामुळे कंपनीच्या बँकिंग क्षेत्रातील तंत्रज्ञान सेवांमध्ये फायदा होईल. कंपनीच्या मोठ्या व मध्यम ग्राहकांच्या संख्येतही अनुक्रमे १४ व १० टक्क्यांनी वाढ झाली. डिजिटल अभियांत्रिकी क्षेत्रातील मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ अपेक्षित असून व्यवस्थापनाला एक ते दोन वर्षांत एक अब्ज डॉलरची मिळकत अपेक्षित आहे. कंपनीकडे १,९०० कोटी रुपयांची रोकड आहे. त्यामुळे भविष्यात आणखी व्यवसायांचे अधिग्रहण होऊ शकते. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील सहभागासाठी कंपनीचे समभाग जमविणे फायद्याचे ठरेल.
आयसीआयसीआय लोम्बार्ड: सध्या बाकीच्या विमा कंपन्यांसारखी ही कंपनीदेखील कठीण परिस्थितीतून जात आहे. कंपनीला नऊ महिन्यांच्या काळात नफ्यामध्ये १५ टक्के घट सोसावी लागली. वाहन विक्रीतील मंदीमुळे नव्या पॉलिसींवर परिणाम झाला आहे. ‘थर्ड पार्टी’ विम्याचे दरही गेल्या दोन वर्षांत वाढलेले नाहीत. आरोग्य विम्याचे दावे सध्या वाढलेले आहेत. तरीही भारती अक्साच्या अधिग्रहणामुळे कंपनीला प्रीमियम उत्पन्नात २६ टक्के वाढ साधता आली. कंपनीची या व्यवसायातील आघाडीची जागा, आयसीआयसीआय बँकेचे पाठबळ, उत्तम तंत्रज्ञानावर आधारित सेवा यामुळे दीर्घ मुदतीसाठी हा समभाग लाभदायक आहे.
बजाज फायनान्स: बजाज फायनान्सच्या समभागांची सध्या गाठलेली पातळी खरेदीसाठी आकर्षक आहे. कंपनीने डिसेंबर अखेरच्या तिमाहीत सर्वच निकषांवर चांगली कामगिरी केली होती. खरेदीच्या ठिकाणाजवळ ग्राहकांना सुलभ हप्त्याचे कर्ज वा क्रेडिट कार्ड देण्याच्या प्रयत्नांमुळे सहा अब्ज रुपयांची नवी कर्जे व जवळपास एक लाख क्रेडिट कार्डधारक कंपनीला जोडले गेले. कंपनीने दिलेल्या कर्जांमध्ये वार्षिक तुलनेत २६ टक्के वाढ झाली. कंपनीच्या समभागांमध्ये परदेशी गुंतवणूकदारांचा वाटा मोठा (२४ टक्के) असल्यामुळे परदेशी संस्थाकडून विक्रीची लाट आली की हे समभाग सर्वात आधी व जास्त खाली येतात, पण पुन्हा वर जातात. त्यामुळे यामध्ये खरेदीची व नफावसुलीच्या संधी अनेक वेळा येतात.
सध्या बाजाराला चिंता करण्यासारखी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे खनिज तेलाच्या दराने पार केलेली ९० डॉलरची पातळी. भारतात निवडणुकांमुळे इंधन दरात वाढ होत नाही. पण आज ना उद्या ते वाढतील व महागाईचा धोका वाढेल. युक्रेन व रशियामधील युद्धजन्य स्थिती हे दुसरे घबराटीचे कारण आहे व अमेरिकेबरोबर भारतातही व्याजदर वाढीची शक्यता बाजाराला त्रस्त करीत आहे. अर्थसंकल्पाआधीची अनिश्चितता हा अल्प काळासाठी असलेला एक चिंतेचा विषय. उद्या सादर होणारा अर्थसंकल्प हा मुद्दा निकालात काढेल. पण बाकीचे मुद्दे आणखी काही काळ बाजाराला दोलायमान ठेवतील.
या सप्ताहातील या घडामोडींवर लक्ष ठेवा
आयटीसीर, मिंडा कॉर्पोरेशन, श्री सिमेंट्स, टॉरन्ट पॉवर, अल्केम लॅब, पीआय इंडस्ट्रीज या कंपन्या डिसेंबरअखेरच्या तिमाहीचे निकाल व अंतरिम लाभांश जाहीर करतील.
बीपीसीएल, आरती समूह, सन फार्मा, टाटा मोटर्स, यूपीएल, इंडियन हॉटेल्स, डाबर, टाटा कन्झ्युमर, कॅडिला, ल्युपिन, आदित्य बिर्ला फॅशन, वरुण बीव्हरेजेस, सिटी युनियन बँक, टायटन या कंपन्या डिसेंबरअखेरच्या तिमाहीचे निकाल जाहीर करतील.
जानेवारी महिन्याचे वाहन विक्री व जीएसटी संकलनाचे आकडे
केंद्रीय अर्थसंकल्प १ तारखेला सकाळी ११ वाजता
मान्यवर या उत्सवी कपडे विकणाऱ्या दालनांची मालकी असणाऱ्या ‘वेदान्त फॅशन्स’ची प्राथमिक समभाग विक्री ४ फेब्रुवारीला सुरू होईल
sudhirjoshi23@gmail.com