समीर नेसरीकर
सध्याच्या सामाजिक आणि बदलत्या तंत्रज्ञानाच्या कालखंडात आपल्या ‘कमाईची वर्षे’ कमी होत आहेत. पूर्वीसारखे एकदा नोकरीला लागल्यावर साठीला निवृत्ती ही संकल्पना आता कालबाह्य होत आहे. त्यामुळे जीवनाच्या संध्याकाळी समृद्धीची आणि समाधानाची सोनेरी किरणे पसरायची झाल्यास, रिटायरमेंट प्लॅन आवश्यकच आणि तोही त्यांचा त्यांनीच आखायचा आहे..
‘कांचनसंध्येच्या निमित्ताने’ लोकसत्ता ११ जुलै २०२२ आणि ‘ही वाट दूर जाते’ लोकसत्ता २५ जुलै २०२२ या तारखांना प्रसिद्ध झालेल्या दोन्ही लेखांमधून आपण ‘रिटायरमेंट प्लॅनिंग’ची आवश्यकता आणि ‘एसआयपी’च्या माध्यमातून आपण स्वत:साठी एक चांगला ‘निवृत्तिनिधी’ कसा उभारायचा याबद्दलचे काही महत्त्वाचे मुद्दे पाहिले. काळ पुढे सरकलाय, असं मानूया की आपण आता निवृत्तीच्या उंबरठयावर आहात, महिन्याअखेरीस मिळणारे ‘एम व्हिटॅमिन’ यापुढे मिळणार नाही, जमवलेल्या पुंजीतूनच नियमित उत्पन्नाचा स्रोत निर्माण करावा लागेल, तो म्युच्युअल फंडातून कसा निर्माण करायचा याविषयी जाणून घेऊया, आजचा विषय आहे ‘सिस्टिमॅटिक विथड्रॉव्हल प्लॅन’ म्हणजेच ‘एसडब्लूपी’.
गुंतवणुकीचा शिस्तशीर पर्याय असणाऱ्या ‘एसआयपी’ पद्धतीने गुंतवणूक आपल्या सर्वानाच माहिती आहे, यात आपल्या बँकेतून ठरावीक रक्कम, ठरावीक तारखेला, ठरवलेल्या म्युच्युअल फंड योजनेत जमा होते. त्याचप्रमाणे अगदी उलट म्हणजेच ‘एसडब्लूपी’मध्ये ठरवलेल्या म्युच्युअल फंड योजनेतून, ठरावीक रक्कम, ठरावीक तारखेला आपल्या बँकेत जमा होते. ‘एसआयपी’च्या विरुद्ध कार्यपद्धती एसडब्लूपीची असते. ज्यावेळेस आपल्याला नियमित उत्पन्नाची गरज असते, त्यावेळेस ‘एसडब्लूपी’मार्फत आपण दरमहा पैशांचा नियमित स्रोत निर्माण करू शकता. म्युच्युअल फंडाच्या समभागसंलग्न ‘ओपन एंडेड’ आणि/अथवा पेन्शन योजनेत नियोजनपद्धतीने दीर्घकालीन गुंतवणूक (हे एवढे महत्त्वाचे आहे की याचा पुनरुच्चार करायचा मोह टाळता येत नाही) केल्यास वयाच्या ५८-६० वर्षांनंतर ‘एसडब्लूपी’च्या माध्यमातून दरमहा निवृत्तिवेतनासारखे उत्त्पन्न (‘एसडब्लूपी’ पद्धतीने) घेता येईल.
रामभाऊंच्या (वय ६१ वर्षे) उदाहरणावरून आपण ‘एसडब्लूपी’ पद्धत समजून घेऊ. रामभाऊंकडे जमा असलेल्या ‘रिटायरमेंट’ फंडातून जर २० लाख रुपये ‘अ’ म्युच्युअल फंड योजनेत एकगठ्ठा ‘डेट हायब्रीड’ फंडात गुंतवून त्यातून ‘एसडब्लूपी’ चालू केल्यास त्यांना दर महिन्याला एक ठरावीक रक्कम, ते जी ठरवतील ती, मिळत राहील. ज्या दिवशी त्यांनी २० लाख रुपये गुंतवले त्यादिवशीचा ‘एनएव्ही’ (नेट असेट व्हॅल्यू) १५.१८ रुपये होता असे मानल्यास रामभाऊंना त्या योजनेचे १,३१,७५२ युनिट्स (पूर्णाक विचारात घेतले आहेत) सुरुवातीला मिळतील.
रामभाऊंनी एका वर्षांनंतर या योजनेतून दरमहा १०,००० रुपये (दहा हजार) काढायचे ठरवले. एसडब्लूपीच्या चालू केल्यानंतरच्या पहिल्या महिन्यात, एनएव्ही १६.२६ रुपये आहे असे समजू. त्याप्रमाणे रामभाऊंना दहा हजार रुपये देण्यासाठी ‘अ’ म्युच्युअल फंड योजनेतून ६१५ युनिट्स(१०,०००/१६.२६) वजा करण्यात येतील. म्हणजे उरलेले युनिट्स आता १,३१,१३७ (१,३१,७५२ वजा ६१५) असतील. दुसऱ्या महिन्यात (१६.१४ रुपये एनएव्ही मानून), ‘अ’ म्युच्युअल फंड योजनेतून ६२० युनिट्स (१०,०००/१६.१४) वजा करण्यात आले. तिसऱ्या महिन्यात (१६.६३ रुपये एनएव्ही मानून), ‘अ’ म्युच्युअल फंड योजनेतून ६०१ युनिट्स (१०,०००/१६.६३) वजा करण्यात आले. रामभाऊंकडे आता १,२९,९१६ युनिट्स राहिले. या पद्धतीने रामभाऊंकडे ठरवलेल्या मुदतीपर्यंत, एसडब्लूपीच्या मदतीने, दरमहा बँकेत पैसे येत राहतील. जे उरलेले १,२९,९१६ युनिट्स आहेत, त्याचे मूल्य आहे २१,६०,५०३ रुपये (१,२९,९१६ युनिट्स गुणिले १६.६३ रुपये एनएव्ही), म्हणजेच गुंतवलेल्या रकमेपेक्षा १,६०,५०३ रुपये जास्त.
सुरुवात करण्यापूर्वी गुंतवणूकदारांनी खालील मुद्दे विचारात घेणे अतिआवश्यक आहे.
१. इथे आपण गुंतवलेली मुद्दल शाबूत ठेवून ‘एसडब्लूपी’द्वारे दरमहा पैसे बँकेत येऊ देणे, अशी पद्धत अवलंबणे गरजेचे असल्यामुळे आपला ‘पैसे काढण्याचा दर’ (विथड्रॉव्हल रेट), योजनेच्या सरासरी वृद्धीदरापेक्षा (स्कीम ग्रोथ रेट) कमी ठेवला पाहिजे.
२.म्युच्युअल फंड घराण्याच्या दर महिन्याला प्रसिद्ध होणाऱ्या ‘फॅक्टशीट’मध्ये योजनेसंदर्भातील सर्व माहिती दिलेली असते. त्यातील ‘स्टॅंडर्ड डेव्हिएशन’, ‘यिल्ड टू मॅच्युरिटी’,‘पोर्टफोलिओ डय़ुरेशन’ या गुणोत्तरांचा अभ्यास असणे अत्यंत आवश्यक आहे.
३. मूळ गुंतवणूक आपण प्युअर डेट, डेट हायब्रिड, इक्विटी हायब्रिड या श्रेणीतील केल्यास ते सर्वसाधारपणे योग्य ठरू शकेल. मुख्यत: कमी अस्थिरता (लो व्होलॅटिलिटी) असणाऱ्या योजनेत गुंतवणूक करणे गरजेचे आहे.
४. बाजारातील प्रचलित व्याजदर, त्यातील कालांतराने होणारे संभावित बदल आणि त्याचा आपल्या गुंतवणुकीवर होणारा परिणाम यासाठी सतर्क राहावे.
५. प्रत्येक आर्थिक वर्षांत समभागसलंग्न म्युच्युअल फंड विकून होणारा दीर्घकालीन भांडवली नफा एक लाखापर्यंत करमुक्त आहे. दीर्घकालीन भांडवली नफ्यासाठीचा ‘होल्डिंग पीरियड’ समभागसंलग्न योजनांसाठी १२ महिन्यांचा आणि रोखे योजनांसाठी ३६ महिन्यांचा असतो. रोखे योजनांमध्ये ३६ महिन्यांनंतर गुंतवणूकदारांना ‘इंडेक्ससेशन’चा फायदा मिळतो.
६. एकगठ्ठा रक्कम गुंतवल्यावर ‘एसडब्लूपी’ कधी चालू करायची, याचा निर्णय आपल्या गरजेनुसार घ्यावा. गुंतवीत असलेल्या योजनेचा ‘एक्झिट लोड’ही विचारात घेतला पाहिजे.
६. म्युच्युअल फंडात लाभांश (डिव्हिडंड) हा प्रत्येक व्यक्तीच्या उत्पन्नाच्या पातळीनुसार कर निर्धारित होतो. तसेच त्याचे वाटप हे संपूर्णत: मालमत्ता व्यवस्थापन कंपनीवर अवलंबून असते म्हणूनच योजनेत गुंतवणूक करताना ‘ग्रोथ’ हा पर्याय निवडून, त्यामधून ‘एसडब्लूपी’ चालू करावी.
७. ‘एसडब्लूपी’ पद्धतीचा अवलंब प्रामुख्याने सेवानिवृत्तीनंतर दरमहा उत्त्पन्न मिळवण्यासाठी केला जात असला तरी गरजेनुसार, वयाच्या कोणत्याही टप्प्यावर आपण एसडब्ल्यूपी चालू करू शकता. व्यावसायिक/कलाकार/व्यापारी वर्गासाठी याचा फायदा होऊ शकतो.
वरती उद्धृत केलेले रामभाऊ शहरात राहतात, त्यांच्या गरजा, जीवननिगडित खर्च, हे निमशहरी/ तालुक्याच्या ठिकाणी राहणाऱ्या माणसापेक्षा वेगळे असणार. पण महिन्याकाठी पैशांची गरज कमी अधिक प्रमाणात सर्वानाच आहे. तेव्हा ‘मंथली कॅश फ्लो’साठी अभ्यासाअंती चालू केलेली ‘एसडब्लूपी’ पद्धत आपला निवृत्तीकाळातील नवीन दोस्त ठरेल, यात शंकाच नाही.
(लेखक मुंबईस्थित गुंतवणूकविषयक अभ्यासक)
sameernesarikar@gmail. com
(म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही बाजार जोखमींच्या अधीन असते. गुंतवणूक करण्यापूर्वी फंडाचे माहितीपत्रक कृपया सखोल अभ्यासा.)