* प्रश्न:  मी ६२ वर्षे वयाचा निवृत्त आहे. मला पेन्शन मिळत नाही. माझे एकूण उत्पन्न (व्याजापासून) ५ लाख रुपये आहे. मी कलम ८०क प्रमाणे दीड लाखाची गुंतवणूक करतो. मी तीन सहकारी बँकेला फॉर्म १५एच देतो आणि एका बँकेला मी फॉर्म १५एच देत नाही या बँकेकडून होणाऱ्या उद्गम करामुळे (टीडीएस) मला आणखी कर भरावा लागत नाही. माझा प्रश्न असा आहे की, तीन बँकेला फॉर्म देणे आणि एका बँकेला फॉर्म न देणे बरोबर आहे का? माझा दुसरा प्रश्न असा की, एका सहकारी बँकेत माझी मुदत ठेव आहे आणि त्या बँकेत माझे बचत खाते नाही. ही सहकारी बँक माझे व्याज दुसऱ्या बँकेत असलेल्या बचत खात्यात जमा करताना कमिशन घेत नाही, परंतु मुद्दल रक्कम दुसऱ्या बँकेत आरटीजीएसद्वारे जमा करताना त्यावर कमिशन घेते. हे बरोबर आहे का?

– किशोर मेहंदळे

(असाच प्रश्न विश्वास जोशी यांनीही विचारला आहे. त्यांनी असे विचारले आहे की, माझे वय ७२ वर्षे आहे. माझे एकूण उत्पन्न ४,५०,००० रुपये आहे. मी दीड लाख रुपयांची गुंतवणूक कलम ८०क नुसार करतो आणि माझे उत्पन्न ३ लाख रुपये आहे तर मला फॉर्म १५एच देता येईल का?)

उत्तर : ज्येष्ठ नागरिक ज्यांचे वय ६० वर्षांपेक्षा जास्त आणि ८० वर्षांपेक्षा कमी आहे अशा करदात्यांचे करपात्र उत्पन्न (८०क ची गुंतवणूक वजा जाता) हे ३ लाख रुपयांपेक्षा कमी असेल तर फॉर्म १५एच देता येतो. किशोर मेहेंदळे यांच्याबाबतीत त्यांचे करपात्र उत्पन्न ३,५०,००० रुपये (उत्पन्न ५,००,००० वजा कलम ८०क प्रमाणे १,५०,००० गुंतवणूक) आहे, त्यामुळे आपल्याला फॉर्म १५एच कोणत्याच बँकेला देता येणार नाही. विश्वास जोशी यांच्याबाबतीत त्यांचे उत्पन्न ३,००,००० रुपये असल्यामुळे त्यांना फॉर्म १५एच देता येतो. बँक आरटीजीएससाठी आपल्याकडून कमिशन घेत असेल तर बँकेच्या शुल्काची चौकशी करावी. काही बँक ठरावीक रकमेच्या आरटीजीएससाठी शुल्क आकारते.

 

* प्रश्न: माझे उत्पन्न करपात्र उत्पन्नाच्या मर्यादेपेक्षा कमी आहे. मला माझ्या पत्नीला घर भेट म्हणून द्यावयाचे आहे. या घराची किंमत ५० लाख रुपये आहे. या व्यवहारावर भेट कर भरावा लागेल का? भरावा लागत असेल तर तो कोणी भरावा?

– श्रीनाथ पुरोहित

उत्तर : भेट कर (गिफ्ट टॅक्स) आता अस्तित्वात नाही. भेटी आता प्राप्तिकर कायद्यामध्ये समाविष्ट करण्यात आल्या आहेत. भेटींवर, भेट मिळणाऱ्या व्यक्तीला प्राप्तिकर भरावा लागतो. अशा भेटी ५०,००० रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या असतील (रोख किंवा वस्तूच्या स्वरूपात) तर त्या इतर उत्पन्नात दाखवून त्यावर कर भरावा लागतो.

भेटी ५०,००० रुपयांपेक्षा कमी असतील तर त्या करमुक्त असतात. ठरावीक नातेवाईकांकडून मिळालेल्या भेटींचा यामध्ये समावेश होत नाही. आपण आपल्या पत्नीला घर भेट म्हणून दिले तर ते इतर उत्पन्नाच्या व्याख्येत येत नसल्यामुळे त्यावर पत्नीला किंवा आपल्याला सुद्धा कर भरावा लागणार नाही.

*  प्रश्न:  मी २०१० साली एका बँकेचे ५ लाख रुपयांचे गृह कर्ज घेतले होते. आता मार्च २०१६ मध्ये याच घरावर इतर वापरासाठी सहा लाख रुपयांचे टॉपअप कर्ज घेतले आहे. मी माझ्या २०१० मध्ये घेतलेल्या गृहकर्जाची प्राप्तिकारासाठी उत्पन्नातून वजावट घेत आहे. टॉपअप कर्जावर भरलेल्या व्याज आणि मुद्दल रकमेची वजावट घेऊ  शकतो का?

– तेजसिंग गाडे

उत्तर : प्राप्तिकर कायद्याप्रमाणे नवीन घर घेण्यासाठी घेतलेल्या कर्जाच्या व्याज आणि मुद्दल परतफेडीची उत्पन्नातून वजावट मिळते. कर्जाचा वापर घर घेण्यासाठी केला तरच प्राप्तिकर कायद्याप्रमाणे सवलती मिळतात. टॉपअप कर्ज जरी घरावर घेतले असले तरी त्याचा वापर दुसऱ्या कारणासाठी केल्यामुळे त्यासाठी प्राप्तिकर सवलत मिळत नाही.

 

* प्रश्न: मी अकोला येथे सप्टेंबर १९९३ मध्ये एक घर १,४८,७०० रुपयांना विकत घेतले होते. नुकतेच हे घर मी १२,७५,००० रुपयांना विकले (याचे मुद्रांक शुल्कासाठी मूल्य १५,५०,००० रुपये आहे). मला मिळालेली संपूर्ण रक्कम मी माझ्या मुलाला पुणे येथे नवीन घर घेण्यासाठी दिली. मला कर वाचविण्यासाठी बाँडमध्ये किती गुंतवणूक करावी लागेल?

– सुनील कुलकर्णी

उत्तर : आपल्याला भांडवली नफा किती झाला हे आधी शोधावे लागेल. हा दीर्घमुदतीचा भांडवली नफा असल्यामुळे महागाई निर्देशांकाचा लाभ मिळेल. दीर्घ मुदतीचा नफा खालील प्रमाणे :

घराची विक्री किंमत :           = १२,७५,००० रुपये

मुद्रांक शुल्कासाठी मूल्य         = १५,५०,००० रुपये

भांडवली नफ्यासाठी वरीलपैकी जी रक्कम जास्त आहे ती विचारात घेतली जाते  = १५,५०,००० रुपये

घरासाठी झालेला खर्च           =  १,४८,७०० रुपये

महागाई निर्देशांकानुसार खरेदी मूल्य:

१९९३-९४ सालचा महागाई निर्देशांक २४४

२०१५-१६ सालचा महागाई निर्देशांक १०८१

महागाई निर्देशांकानुसार खरेदी मूल्य : १,४८,७०० ७ १०८१ / २४४ = ६,५८,७९० रुपये

दीर्घ मुदतीचा भांडवली नफा = ८,९१,२१० रुपये

वरील दीर्घ मुदतीचा नफा सहा महिन्यांच्या आत कॅपिटल गेन बाँडमध्ये गुंतविल्यास कर भरावा लागणार नाही.

 

* प्रश्न:  माझे वय ७१ वर्षे आहे. माझे उत्पन्न तीन लाख रुपयांपेक्षा कमी असल्यामुळे मी मागील चार वर्षे विवरणपत्र भरले नव्हते. आता ते तीन लाख रुपयांपेक्षा जास्त झाले तर काय करावे?

– सुधीर चोडणेकर, मुंबई

उत्तर : आपले उत्पन्न तीन लाख रुपयांपेक्षा जास्त असेल त्या वर्षीचे विवरणपत्र दाखल करणे बंधनकारक आहे. जर पुढील काळात एखाद्या वर्षी उत्पन्न तीन लाख रुपयांपेक्षा जास्त झाले तर विवरणपत्र दाखल करावे.

 

* प्रश्न:  मी निमसरकारी संस्थेतून जुलै २०१६ मध्ये सेवानिवृत्त होत आहे. पेन्शन योजनेनुसार मला २,५०० रुपयांचे तोकडे पेन्शन अनुज्ञेय आहे. आमच्यासारख्या निवृत्त चाकरमान्यांना केवळ मुदत ठेवींवर निर्वाह करावयाचा आहे. तेव्हा वित्तीय वर्षांत मिळणारे व्याज किती रकमेपर्यंत करमुक्त असते?

– अनिल कदम, वर्धा

उत्तर : आपले वय ६० वर्षांपेक्षा कमी असेल तर २,५०,००० रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त असेल. मुदत ठेवींच्या व्याजावर प्राप्तिकरात कोणतीही सूट किंवा सवलत मिळत नाही. ती पूर्णपणे करपात्र आहे. बचत खात्यावरील व्याजावर १०,००० रुपयांची सवलत मिळते. करदात्याचे उत्पन्न पाच लाख रुपयांपेक्षा कमी असेल तर कलम ‘८७ए’ नुसार ५,००० रुपयांची करसवलत मिळू शकते (ही सवलत आर्थिक वर्ष २०१५-१६ पर्यंत २,००० रुपये इतकी होती). हे विचारात घ्यावे. शिवाय बँकेतील मुदत ठेव ही कलम ८०क नुसारची गुंतवणूक म्हणून ठेवल्यास दीड लाखापर्यंतची वजावट मिळू शकते. हे खालील तक्त्यात दर्शविले आहे :

म्हणजेच आपल्याला, जर आपण गुंतवणूक केलीत तर ४,२०,००० रुपयांच्या व्याजावरसुद्धा कर भरावा लागणार नाही आणि गुंतवणूक केली नसल्यास २,७०,००० रुपयांच्या व्याजावर कर भरावा लागणार नाही.

 

* प्रश्न:  मी गृहकर्ज घेतले आहे आणि त्यावर भराव्या लागणाऱ्या व्याज व मुद्दल रकमेवर मी कर सवलतीचा लाभ घेत आहे. माझ्या पत्नीने दुसरे घर फक्त पत्नीच्याच नावाने विकत घेतले आहे. या घरासाठी तिने गृहकर्ज घेतले आहे. या कर्जासाठी मी सह-कर्जदार आहे. या कर्जाचा हप्ता माझ्या पगारातून जातो. मला या घरासाठीसुद्धा प्राप्तिकराच्या सवलती मिळू शकतील का?

– सुधीर देशमुख

उत्तर : घरासाठी असणाऱ्या प्राप्तिकर कायद्यातील सवलती घेण्यासाठी घर मालकीचे असणे गरजेचे आहे. आपले पहिले घर आपल्या नावाने असल्यामुळे व्याज आणि मुद्दल परतफेडीची वजावट उत्पन्नातून आपण घेऊ  शकता. परंतु केवळ पत्नीच्या नावाने असणाऱ्या घरात आपली मालकी नसल्यामुळे त्या घरासाठी घेतलेल्या गृहकर्जाच्या परतफेडीची वजावट आपल्याला घेता येणार नाही.

 

* प्रश्न: माझे ठाणे येथे भाडय़ाचे दुकान आहे. दुकानाचा मालक पुढील काळात दुकान विक्रीस काढणार आहे आणि मी त्या दुकानावरचा ताबा सोडण्यासाठी मला त्याला होणाऱ्या फायद्यामधील ५० टक्के फायदा देणार आहे. माझा प्रश्न आहे की, मला मिळणाऱ्या ५० टक्के रकमेवर किती कर भरावयास लागेल आणि तो कर वाचवण्यासाठी कोणती गुंतवणूक कोठे आणि कशी करावी लागेल?

– मकरंद बापट

उत्तर : भाडय़ाचा अधिकार सोडण्यासाठी मिळालेल्या रकमेची करपात्रता ठरविण्यासाठी अनेक उच्च न्यायालयाने वेगवेगळे निर्णय दिले आहेत. परंतु १९९४च्या प्राप्तिकर कायद्यातील सुधारणेनंतर भाडय़ाचा अधिकार सोडण्यासाठी मिळालेला मोबदला हा भांडवली नफ्याच्या अंतर्गत करपात्र करण्यात आला. आपल्याला दुकानाचा अधिकार कधी मिळाला यावर भांडवली नफा हा दीर्घ मुदतीचा आहे किंवा लघु मुदतीचा आहे हे ठरते. भाडय़ाचा अधिकार तीन वर्षांपेक्षा जास्त काळापासून असेल तर भांडवली नफा दीर्घ मुदतीचा होतो. भांडवली नफा दीर्घ मुदतीचा असेल तर यासाठी ‘कलम ५४एफ’ नुसार विक्री किमतीएवढी गुंतवणूक नवीन घरात केल्यास कर भरावा लागणार नाही (यासाठी काही अटींची पूर्तता करावी लागते) किंवा भांडवली नफ्याएवढी रक्कम कॅपिटल गेन बाँडमध्ये केल्यास (कमाल रक्कम ५० लाख रुपये) कर भरावा लागणार नाही. जर भांडवली नफा लघु मुदतीचा असेल तर गुंतवणुकीचा पर्याय उपलब्ध नाही. तरी आपले कागदपत्र तज्ज्ञांना दाखवून त्यांचा सल्ला घ्यावा.
gift1

  • लेखक मुंबईस्थित सनदी लेखाकार असून, वाचक त्यांना pravin3966@rediffmail.com या ई-मेलवर आपले प्रश्न पाठवू शकतील.