प्राप्तिकर कायद्यातील मार्गदर्शकरुपी कलमांचा, नियमांचा प्राप्तिकर नियोजनाद्वारे कर वाचविण्यासाठी उपयोग करून घेतला पाहिजे. विशेषत: पगारदार व्यक्तींनी या कलमांचा पुरेपूर उपयोग करून प्राप्तिकर वाचवला पाहिजे.
मागील लेखात ज्या पगारदार व्यक्तींना घरभाडे भत्ता मिळतो आणि ज्यांचे स्वत:च्या मालकीचे घर नाही त्यांना कलम १०(१३अ) आणि नियम २अ नुसार कर कसा वाचवता येईल ते पाहिले. पगारदार व्यक्तींमध्ये अशाही व्यक्ती असतील ज्यांना त्यांच्या कंपनीमधून घरभाडे भत्ता मिळत नसेल आणि ज्यांच्या नावावर राहते घर नसल्याने अशा व्यक्ती घरासाठी भाडे देत असतील. अशा व्यक्तींसाठीसुद्धा प्राप्तिकर कायद्यामध्ये प्राप्तिकर वाचवण्यासाठी एक तरतूद आहे. आणि ही तरतूद केवळ पगारदार व्यक्तींपुरतीच मर्यादित नसून स्वत:चा उद्योगधंदा असलेल्या (सेल्फ एम्प्लॉईड) व्यक्तींसाठीसुद्धा उपलब्ध आहे.
आजच्या लेखात ज्या पगारदार व्यक्तींना घरभाडे भत्ता मिळत नाही आणि अशा व्यक्ती राहत असलेल्या घरासाठी भाडे भरत असतील तसेच ज्या व्यक्तींचा स्वत:चा उद्योगधंदा आहे आणि अशा व्यक्ती राहत असलेल्या घरासाठी भाडे भरत असतील तर प्राप्तिकर कायद्यातील एका वजावटीचा उपयोग करून अशा व्यक्तीचे एकूण उत्पन्न कायदेशीररित्या कसे कमी होईल आणि म्हणून कायदेशीररित्या प्राप्तिकर कसा वाचेल याविषयी माहिती घेऊ या.
या संदर्भात प्राप्तिकर कायद्याच्या कलम ८०जीजीमध्ये तशी तरतूद आहे. या कलमानुसार एखाद्या पगारदार व्यक्तीला किंवा स्वत:चा उद्योगधंदा असणाऱ्या व्यक्तीला त्याच्या उत्पन्नातून पुढे दिलेल्या तीन रकमांपैकी जी रक्कम सर्वात कमी आहे त्या रकमेची वजावट मिळते.
१. दरमहा रु. २,००० किंवा
२. एकूण उत्पन्नाच्या २५% एवढी रक्कम किंवा
३. घरभाडे वजा एकूण उत्पन्नाच्या १०% रक्कम.
कलम ८०जीजीमध्ये मिळणारी ही वजावट घेण्यासाठी त्या व्यक्तीने काही अटींचे पालन करणे आवश्यक आहे –
१. ही व्यक्ती ज्या कंपनीत काम करते त्या कंपनीमधून या व्यक्तीला घरभाडे भत्ता मिळत असता कामा नये.
२. ही व्यक्ती ज्या शहरात नोकरी अथवा स्वत:चा उद्योगधंदा करते त्या शहरात अशा व्यक्तीच्या स्वत:च्या नावावर तसेच पत्नीच्या किंवा अज्ञान अपत्याच्या नावावर राहते घर असता कामा नये.
एक उदाहरण घेऊन कलम ८०जीजीनुसार वजावट कशी मोजतात ते पाहू.
समजा एखाद्या पगारदार व्यक्तीचे एकूण उत्पन्न म्हणजे ढोबळ उत्पन्नातून (ग्रॉस टोटल इन्कममधून) कलम ८०जीजीनुसार मिळणारी वजावट वजा न करता कलम ८०नुसार मिळणाऱ्या इतर वजावटी वजा करून राहिलेले उत्पन्न आहे रु. ६,००,००० समजा ही व्यक्ती राहत असलेल्या घरासाठी वार्षिक रु. ९०,००० एवढे घरभाडे भरते आहे. या व्यक्तीला त्याच्या कंपनीतून घरभाडे भत्ता मिळत नाही. या माहितीच्या आधारे त्या व्यक्तीला कलम ८०जीजीनुसार पुढीलप्रमाणे वजावट मिळेल.
१. दरमहा रु. २,००० म्हणजे वार्षिक रु. २४,००० किंवा
२. एकूण उत्पन्नाच्या २५% एवढी रक्कम म्हणजे रु. १,५०,००० किंवा
३. घरभाडे वजा एकूण उत्पन्नाच्या १०% एवढी रक्कम म्हणजे रु. ९०,००० वजा रु. ६०,००० म्हणजे रु. ३०,०००
या तीनपैकी रु. २४,००० ही सर्वात कमी रक्कम असल्याने कलम ८०जीजीनुसार या व्यक्तीला रु. २४,००० एवढी वजावट मिळेल. म्हणजे त्याच्या ढोबळ उत्पन्नातून (ग्रॉस टोटल इन्कममधून) रु. २४,००० वजा होतील. आणि म्हणून त्यांचे करपात्र उत्पन्न कमी होऊन ही व्यक्ती २०% कर टप्प्यात (टॅक्स स्लॅब) येत असेल तर रु. ४,८०० एवढा कर वाचेल. दुसऱ्या भाषेत सांगायचे तर एखादी व्यक्ती ज्या कर टप्प्यात बसते म्हणजे १०%, २०% किंवा ३०% त्यानुसार वजावटीच्या रकमेवर तेवढा कर वाचेल.
कर नाही त्याला डर कशाला? ही जुनी म्हण परिचित असेलच. ज्या व्यक्तींच्या नावे घर नाही आणि घरभाडे भत्ताही मिळत नाही, त्यांना कलम ८०जीजीनुसार मिळत असलेल्या वजावटीचा लाभ घेता येईल. अशा तऱ्हेने कर वाचल्यामुळे वरील म्हणीमध्ये थोडा बदल करून ‘घर नाही त्याला कर कशाला?’ अशी प्राप्तिकर नियोजनाच्या संदर्भात एक नवी म्हण समस्त प्राप्तिकरदात्यांच्या परिचयाची व्हावी, अशी इच्छा!
कर मात्रा : घर नाही त्याला कर कशाला?
प्राप्तिकर कायद्यातील मार्गदर्शकरुपी कलमांचा, नियमांचा प्राप्तिकर नियोजनाद्वारे कर वाचविण्यासाठी उपयोग करून घेतला पाहिजे. विशेषत: पगारदार व्यक्तींनी या कलमांचा पुरेपूर उपयोग करून प्राप्तिकर वाचवला पाहिजे.
First published on: 28-01-2013 at 01:24 IST
मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tax measure why tax to homeless