प्राप्तिकर कायद्यामधील इतर तरतुदींचा लाभ घेऊन पगारदार व्यक्ती आपला प्राप्तिकर निश्चित वाचवू शकतात. आजच्या लेखात वेगवेगळ्या करमुक्त अलाउन्सेसचा ‘पे पॅकेज’ मध्ये समावेश करून प्राप्तिकर वाचवता येऊ शकतो.
जानेवारी महिना सुरू झाला की सर्वच प्राप्तिकरदात्यांना आणि विशेषत: जे प्राप्तिकरवाले पगारदार आहेत त्यांना ३१ मार्च ही तारीख डोळ्यासमोर एकसारखी दिसायला लागते. कारण ३१ मार्च या तारखेच्या आत प्राप्तिकर वाचवण्यासाठी ज्या गुंतवणुकी करायला पाहिजेत त्या करून त्याच्या प्रती, प्रूफ  इ. खात्यामध्ये सादर करायच्या असतात. जेणे करून केलेल्या गुंतवणुकीच्या रकमा लक्षात घेऊन एकूण पगारावरील प्राप्तिकर (टॅक्स अ‍ॅट सोर्स) मूळात कापला जातो. त्यामुळे जानेवारी ते मार्च या काळात कलम ८०क मध्ये नमूद केलेल्या विविध योजनांमध्ये (म्हणजे राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रे, पी.पी. एफ. विम्याचा हप्ता इ. मध्ये) मोठय़ा प्रमाणावर गुंतवणूक केली जाते. प्राप्तिकर वाचवण्यासाठी अशी गुंतवणूक करणे आवश्यक आहे. पण प्राप्तिकर वाचवण्यासाठी कलम ८०क किंवा करनिर्धारण वर्ष २०१२-१३ साठीच उपलब्ध असलेल्या ‘८०ककफ’मध्ये नमूद केलेल्या गुंतवणुकीमध्ये पैसे गुंतवून प्राप्तिकर वाचतो, असे नाही तर प्राप्तिकर कायद्यामधील इतर तरतुदींचा लाभ घेऊन पगारदार व्यक्ती आपला प्राप्तिकर निश्चित वाचवू शकतात. आजच्या लेखात वेगवेगळ्या करमुक्त अलाउन्सेसचा ‘पे पॅकेज’ मध्ये समावेश करून प्राप्तिकर कसा वाचवता येईल ते पाहू या.
एखादी व्यक्ती ज्या वेळेला एखाद्या कंपनीमध्ये पगारदार नोकर म्हणून रुजू होणार असते त्या वेळी त्या कंपनीच्या एच. आर. म्हणजेच ह्य़ूमन रिसोर्स डिपार्टमेंटच्या पदाधिकाऱ्यांकडून त्या व्यक्तीला बेसिक पगार आणि डिअरनेस अलाऊन्स द्वारा एकूण किती ‘पे पॅकेज’ मिळणार आहे, त्याविषयी सांगितलं जातं. त्या वेळी असे ‘पे पॅकेज’ स्वीकारताना त्या व्यक्तीने प्राप्तिकर कायद्यानुसार जे प्राप्तिकरमुक्त अलाऊन्सेस आहेत त्याविषयी माहिती घेऊन त्यांचा एकूण ‘पे पॅकेज’मध्ये समावेश करण्याचा आग्रह धरला तर बऱ्यापैकी प्राप्तिकर वाचू शकतो. असे प्राप्तिकर मुक्त अलाऊन्सेस कोणते?
१. वैद्यकीय खर्चाचा परतावा  : कलम १७ (२) नुसार वार्षिक रु. १५०००/- एवढा वैद्यकीय खर्चाचा परतावा संपूर्णपणे करमुक्त मिळतो.
२. प्रवास आणि ट्रान्सपोर्ट अलाउन्स : कलम १० (१४) नुसार पगारदार नोकराला त्याची नेमून दिलेली कामे करण्यासाठी जो प्रवास भत्ता मिळतो तो रकमेच्या कमाल मर्यादेचं बंधन लागू न होता पूर्णपणे प्राप्तिकरमुक्त मिळतो. तसेच याच कलमाद्वारे दरमहा रु. ८००/- म्हणजे वार्षिक रु. ९६००/- एवढा ट्रान्सपोर्टभत्ता पूर्णपणे प्राप्तिकरमुक्त मिळतो.
३. युनिफॉर्म अलाऊन्स : कंपनीचे नेमून दिलेले काम करण्यासाठी परिधान करायच्या पोशाखाची खरेदी, तसेच त्या पोशाखाच्या देखभालीसाठीचा खर्च कलम १० (१०) नुसार कमाल मर्यादेचं बंधन लागू न होता पूर्णपणे करमुक्त मिळतो.
४. मुलांच्या शिक्षणासाठीचा अलाऊन्स : एका अपत्यामागे दरमहा रु. १००/- एवढा शैक्षणिकभत्ता आणि एका अपत्यामागे दरमहा रु. ३००/- एवढा हॉस्टेलभत्ता पूर्णपणे करमुक्त मिळतो. हे दोन्ही भत्ते जास्तीत जास्त दोन अपत्यांसाठी मिळतात.
५. टेलिफोन खर्चाचा परतावा : प्राप्तिकर कायद्याच्या नियम ३ नुसार टेलिफोन खर्चाचा परतावा पूर्णपणे करमुक्त मिळतो.
६. फूड कूपन्स : एखाद्या नोकरदार व्यक्तीला त्याच्या कंपनीकडून मिळणाऱ्या फूड कुपन्सची वार्षिक रक्कम पूर्णपणे करमुक्त फायद्याच्या स्वरुपात मिळते.
वरील सहा अलाउन्सेस व्यतिरिक्त हाऊस रेंट अलाउन्स आणि लिव्ह ट्रॅव्हल अलाउन्स हे दोन महत्त्वाचे अलाऊन्स प्राप्तिकर वाचवू शकतात. पण त्याविषयी सविस्तर माहिती पुढच्या लेखात घेऊ या.
आजच्या लेखात वर नमूद केलेल्या सहा करमुक्त अलाऊन्सेसचा समावेश ‘पे पॅकेज’ ची आखणी करताना केल्यामुळे प्राप्तिकर कसा वाचतो ते एक उदाहरण घेऊन जाणून घेऊ या. समजा एखाद्या व्यक्तीने नोकरीवर रुजू होताना बेसिक पे अधिक डिअरनेस अलाऊन्स असं मिळून रु. ४,५०,०००/- चं ‘पे पॅकज’ स्वीकारलं. पुढे या व्यक्तीने करनिर्धारण वर्ष २०१२-१३ साठी 80  कलमाद्वारे रु. १०००००/- आणि 80 ऋ कलमाद्वारे रु. २००००/- गुंतवायचे ठरवले तर रु. ४५०००० या एकूण करपात्र उत्पन्नातून रु. १२००००/- वजा होऊन रु. ३३००००/- या रकमेवर रु. १५४५०/- एवढा प्राप्तिकर या व्यक्तीला भरावा लागेल. पण या व्यक्तीने रु. ४५००००/- ‘पे पॅकेज’ स्वीकारताना वरील अलाऊन्सेसचा समावेश करून त्याची आखणी केल्यास आणि त्या स्वरूपात ‘पे पॅकेज’ मिळण्याचा आग्रह धरल्यास त्याला रु. ४५००००/- या रकमेवर प्राप्तिकर भरावाच लागणार नाही. त्यासाठी त्याने खालील तक्तयामध्ये नमूद केल्याप्रमाणे बेसिक पे आणि डिअरनेस अलाऊन्स आणि इतर अलाऊन्स यांची योग्य ती विभागणी करणे आवश्यक आहे.
आर्थिक वर्ष २०१२-१३ म्हणजेच करनिर्धारण वर्ष २०१३-१४ साठी कलम ८० मध्ये मिळणारी रु. २००००/- वजावट रद्द झाली असली तरी रु. ४५००००/- च्या ‘पे पॅकेज’ चा विचार करता प्राप्तिकर देय शून्यच राहिल. कारण करनिर्धारण वर्ष २०१३-१४ साठी करपात्र उत्पन्नाची मर्यादा रु. १८००००/- वरून रु. २०००००/- एवढी करण्यात आली आहे. तेव्हा ‘पे पॅकेज’ स्वीकारताना सावधानता बाळगल्यास आणि वरील अलाऊन्सेसचा समावेश करून ‘पे पॅकेज’ची आखणी केल्यास प्राप्तिकर वाचू शकतो हे निश्चित !
करनिर्धारण वर्ष २०१२-१३
    करपात्र उत्पन्न (रु.)    करमुक्त उत्पन्न (रु.)  
बेसिक + डिअरनेस पे      ३०००००         
ट्रान्सपोर्ट अलाऊन्स          – ९६००
कन्व्हेयन्स अलाऊन्स         – ४८०००
युनिफॉर्म अलाऊन्स         – ३६०००
शैक्षणिक अलाऊन्स         – २४००
(दोन अपत्यांकरता)
फूड कूपन्स                 – १५०००
वैद्यकीय खर्चाचा परतावा    – १५०००
टेलीफोन खर्चाचा परतावा   – २४०००
      एकूण     ३००,०००     – १५०,०००
   वजा ८० क ची वजावट     १००,०००
  ‘८० ककक’ची वजावट     २००००   
     एकूण    १२०,०००
  करपात्र उत्पन्न     १८०,०००
  प्राप्तिकर देय शून्य

Story img Loader