* माझ्या आठ वर्षांच्या मुलाचे २०१३-१४ आर्थिक वर्षांतील उत्पन्न ५२०० रुपये आहे. माझ्या माहितीप्रमाणे पाल्याचे १,५०० रु. उत्पन्न करमुक्त आहे. जर मी ४,००० रु. मुलाच्या नावे भविष्य निर्वाह निधी योजनेमध्ये गुंतविले तर मुलाचे करपात्र उत्पन्न शून्य दाखविता येईल का?
– संजय पेडणेकर
उत्तर: आयकर कायद्यानुसार १८ वर्षांखालील (अजाण) व्यक्तींचे उत्पन्न त्यांच्या पालकांच्या (ज्यांचे उत्पन्न जास्त आहे) उत्पन्नामध्ये मिळविले जाते व त्यावर त्या पालकाला कर भरावा लागतो. या उत्पन्नामध्ये मुलाने मिळविलेल्या अंगमेहनतीचे काम, कौशल्याचे काम, विशेष कौशल्य, किंवा विशेष ज्ञानापासून मिळालेल्या उत्पन्नाचा समावेश (कलम ८० यू अन्वये) होत नाही.
जे उत्पन्न पालकाच्या उत्पन्नात जोडायचे आहे, त्यावर तुमच्या माहितीप्रमाणे कमाल १,५०० रु. वजावट प्रत्येक १८ वर्षांखालील व्यक्तींसाठी जरूर मिळते. परंतु आपण त्या व्यतिरिक्त जरी भविष्य निर्वाह निधी योजनेमध्ये गुंतवणूक केली तरी, ती आपल्या गुंतवणुकीमध्येच धरण्यात येईल. जी अर्थातच तुम्हाला कमाल रु. १ लाखांच्या मर्यादेपर्यंत (तुमचे व मुलाचे मिळून) करता येईल. मुलाच्या भविष्य निर्वाह निधी योजनेमधील गुंतवणुकीची वेगळी वजावट मिळणार नाही. त्यामुळे मुलाचे उत्पन्न हे ५,२०० रु. वजा १,५०० रु. असे ३,७०० रु. इतके दाखवावे लागेल आणि आपणाला ८० सी कलमाअंतर्गत वजावटीच्या गुंतवणुकीमध्ये अतिरिक्त ४,००० रु. वजावट मिळू शकेल.
आपलेही करविषयक प्रश्न असतील तर ते आपण pravin3966@rediffmail.com या ई-मेलवर अथवा लोकसत्ता कार्यालय, ‘अर्थ वृत्तान्त’, एक्स्प्रेस टॉवर्स, पहिला मजला, नरिमन पॉइंट, मुंबई- ४०००२१ या पत्त्यावर पाठवू शकता. अथवा ई-मेल: arthmanas@expressindia.com
* गेल्या १६ महिन्यांपासून मी शेअर बाजारात गुंतवणूक करीत आहे. मला कर देय रकमेसंबंधी माहिती द्यावी? अल्पमुदत व दीर्घमुदतीमधील गुंतवणूकीतुन प्राप्त झालेल्या नफ्यामधून कोणकोणते खर्च वजा होऊ शकतात. (उदा. डिमॅट, इंटरनेट, टेलिफोन शुल्क वगैरे) यानुसार सवलती प्राप्त करून घेण्यासाठी कोणकोणते पुरावे जोडावे लागतील.
– प्रविण लंके (अहमदनगर)
उत्तर: रोखे व्यवहाराच्या विक्रीमधून झालेला लाभ हा दोन प्रकारचा, अल्पमुदत आणि दीर्घमुदत भांडवली लाभ (शॉर्ट टर्म आणि लाँग टर्म कॅपिटल गेन) असतो. जे रोखे एक वर्षांपेक्षा जास्त काळासाठी गुंतविलेले असतील तर त्यावरचा भांडवली नफा हा करपात्र नसतो. (अट- त्यावर रोखे विनिमय कर ((Securities Transaction Tax- STT) हा भरलेला असावा. जे रोखे एक वर्षांपेक्षा कमी काळासाठी गुंतविलेले असतील आणि त्यावर रोखे विनिमय कर भरलेला असेल तर त्यावर अल्पमुदत भांडवली नफा हा १५% (अधिक ३% शिक्षण अधिभार) भरावा लागतो. हा भांडवली नफा मोजताना फक्त जे खर्च प्रत्यक्षपणे व पूर्णत: विक्रीसाठी करण्यात आलेले आहेत, (कलम ४८ अन्वये) त्याचीच वजावट विक्रीच्या किमतीमधून मिळते. म्हणजे यामध्ये दलालीचा समावेश होतो. डिमॅट, इंटरनेट, टेलिफोन शुल्क हे प्रत्यक्षपणे व पूर्णपणे विक्रीकरिता वापरले जात नसल्यामुळे त्याची वजावट मिळत नाही. याशिवाय रोखे विनिमय कराची देखील वजावट मिळत नाही.
* आयकर कायद्याच्या ८० डी कलमानुसार मेडिक्लेम पॉलिसीमध्ये जास्तीत जास्त किती कर सवलत मिळू शकते? आमची पॉलिसी ही माझी पत्नी व माझ्या संयुक्त नावावर आहे. मी ७२ वर्षांचा ज्येष्ठ नागरिक आहे.
गेल्या वर्षांतील अर्थसंकल्पानुसार ठरविण्यात आलेल्या बँक ठेवींवरील व्याजातून रु. १०,००० ची सवलत ही, ८० सी अन्वये मिळणाऱ्या रु. १ लाख सवलती व्यतिरिक्त आहे का? असल्यास कोणत्या कलमानुसार ती सवलत आम्हास प्राप्त होऊ शकते?
– कमलाकर कौलगुड (ठाणे)
उत्तर: आयकर कलम ८० सी प्रमाणे बँकेतील मुदत ठेवीवरील गुंतवणुकीवर (८० सी योजने अंतर्गत) रु. १ लाख मर्यादेपर्यंत करपात्र उत्पन्नातून वजावट मिळते. याशिवाय बचत खात्यावरील व्याजावर ८० टीटीए कलमानुसार रु. १० हजारापर्यंतच्या व्याज उत्पन्नावर कर भरावा लागत नाही.
मेडिक्लेम पॉलिसी जी आपल्या आणि पत्नीच्या नावे आहे त्या विम्याच्या हप्त्यावर ज्येष्ठ नागरीकांसाठी (ज्यांचे वय वर्षे ६० पेक्षा जास्त आहे) ८० डी कलमानुसार रु. २० हजारांपर्यंत उत्पन्नातून सूट मिळते.
* मी भारतीय मूळ असलेली ऑस्ट्रेलियन नागरिक आहे. मी भारतात परत येण्याचा विचार करीत आहे. मी माझ्या पाच वर्षांच्या मुलासाठी युलिप पॉलिसी घेतली तर मला भारतामध्ये कलम ८० सी द्वारे वजावट मिळेल का?
– निलीमा वराटकर (ऑस्ट्रेलिया)
उत्तर: आपल्या भारतातील करपात्र उत्पन्नातून कलम ८० सी प्रमाणे विशिष्ट ‘युलिप’मध्ये आपल्या मुलाच्या नावे केलेल्या गुंतवणुकीवर वजावट मिळू शकते.
(प्रस्तुत लेखक सनदी लेखाकार आहेत)
‘फॉर्म २६ ए एस’ कसा बघावा याबद्दल मार्गदर्शन करा.
मुग्धा कुरंभट्टी (कांजुरमार्ग)
उत्तर: ‘फॉर्म २६ ए एस’ बघण्यासाठी आपल्याला आयकर विभागाच्या ई-फायलिंग पोर्टलवर https://incometaxindiaefiling.gov.in वर लॉग इन करावे लागेल. ही सोय ज्यांनी वैध ‘पॅन’धारक आहेत त्यांच्यासाठीच आहे. वर उल्लेख आलेल्या पोर्टलवर आपण जर नोंदणी केलेली असेल तर आपण थेट लॉग इन करू शकता. जर आपण नोंदणी केलेली नसेल तर आपल्याला सर्वप्रथम नोंदणी करून घ्यावी लागेल. त्यासाठी आपले नाव, जन्मतारीख, ईमेल, भ्रमणध्वनी इत्यादी आपणासंबधी माहिती द्यावी लागेल आणि त्यानंतर आयकर विभागाकडून लॉग इन/पासवर्ड संबंधी आपल्याला ईमेल पाठविली जाईल. लॉग इन झाल्यानंतर ‘माय अकाऊंट’वर क्लिक केल्यानंतर view form 26 AS (Tax Credit) वर क्लिक करावे. आपल्याला यात करनिर्धारण वर्ष २००९-१० पासून आतापर्यतची कर कापणी, आपण भरलेला कर, कर परतावे इत्यादी माहिती उपलब्ध आहे. ती वेळोवेळी तपासून पाहणे प्रत्येक जबाबदार करदात्यासाठी गरजेचे असते.