प्राप्तीकर कायद्याच्या कलम ‘८० सी’नुसार करदात्यांना एकूण रु. १,००,००० एवढी १००%वजावट मिळण्याची तरतूद आहे. प्राप्तीकर वाचविण्याच्या दृष्टिने हे एक महत्त्वाचे कलम आहे. कलम ८० सीमध्ये नमूद केलेल्या विविध गुंतवणूक योजनांमध्ये रु. १,००,००० एवढी गुंतवणूक करून १०.३% कराच्या टप्प्यात येणाऱ्या करदात्याचा रु. १०,३०० तर २०.६% या कराच्या टप्प्यात येणाऱ्या करदात्याचा रु. २०,६०० आणि ३०.९% या कराच्या टप्प्यात येणाऱ्या करदात्याचा रु. ३०,९०० एवढा कर वाचतो. ३१ मार्च जशी जवळ येते तशी करदात्यांची गुंतवणूक करण्यास धावपळ अधिक वाढते. अनेक करदात्यांसमोर गुंतविण्यासाठी १ लाख रुपये कसे उभे करायचे, असा प्रश्नही असतो. त्यांच्यासाठी (आणि ज्यांच्यासमोर असा प्रश्न नाही त्यांच्यासाठीदेखील) पीपीएफ हे एक उत्तम साधन आहे. ज्यायोगे वरील नमूद केलेला प्रश्न सुटू शकतो.
त्यासाठी गुंतवणूकमंत्र म्हणजे पीपीएफ खात्यात पहिली ६ वर्षे गुंतवणूक करा आणि नंतरची ९ वर्षे या खात्यामधून पैसे काढून पुनर्गुतवणूक (रि-फायनान्सिंग किंवा रि-इन्व्हेस्टमेन्ट) करा. एक उदाहरण घेऊन हा मुद्दा अधिक स्पष्ट होईल –
कलम ८० सीनुसार मिळणारी वजावट घेण्यासाठी दरवर्षी रक्कम गुंतविण्यासाठी पैसे कसे उभे करायचे हा प्रश्न डॉ. सुमती यांच्यासमोर नेहमी असायचा. त्यावर कायदेशीर तोडगा म्हणजे त्यांनी पहिली ६ वर्षे नियमितपणे एक विशिष्ट रक्कम म्हणजे समजा रु. ७०,००० त्यांच्या पीपीएफ खात्यात जमा करायची. आपण पहिल्या भागात पाहिले की, ६ वर्षांनंतर चार वर्षे अलिकडे असलेल्या रकमेच्या ५०% एवढी रक्कम खातेदाराला दरवर्षी काढता येते. या तरतुदीचा फायदा घेऊन डॉ. सुमती यांनी सातव्या वर्षांपासून रु. ७०,००० खात्यातून काढावेत व ते पुन्हा पीपीएफ खात्यात जमा करावे. एक काळ असा होता की करबचतीसाठी करावी लागणारी गुंतवणूक करपात्र उत्पन्नातूनच झाली पाहिजे, असा नियम होता. आता हा नियम अस्तित्वात नाही. म्हणूनच अशाप्रकारे रि-फायनान्सिग शक्य आहे. वरील नियोजन अंमलात आणले गेले तर डॉ. सुमती यांच्या पीपीएफ खात्याचा ‘ग्रोथ चार्ट’ खालीलप्रमाणे असेल –
सोबतच्या उदाहरणात डॉ. सुमती या ३०.९% कराच्या टप्प्यात येतात. तसेच कलम ८० सीनुसार मिळणारी वजावट घेण्यासाठी त्यांना. रु. ७०,००० एवढय़ा रकमेची गरज आहे, असे गृहित धरले आहे. त्याचप्रमाणे करमुक्त व्याजाचा दर वार्षिक ८% राहिल, असेही गृहित धरण्यात आले आहे.
पीपीएफ योजनेचा रि-फायनान्सिंगसाठी उपयोग करताना एका गोष्टीची खबरदारी घेतली पाहिजे. ती म्हणजे जी रक्कम काढायची आहे ती विचारपूर्वक ठरविली गेली पाहिजे. याचे कारण पीपीएफ योजनेमधील नियमानुसार वर्षांकाठी एकदाच रक्कम या खात्यातून काढता येते.
पुढे जाऊन असा सल्ला देता येईल की, अगदी खूपच आवश्यकता असेल अशा परिस्थितीतच पीपीएफ रि-फायनान्सिंगचा उपयोग करावा.
(लेखक गुंतवणूक व करनियोजन सल्लागार आहेत.)