आशीष ठाकूर
अवघ्या तेरा दिवसांत निफ्टी निर्देशांकाने ८,८०० वरून १०,१७७ अशी धाव घेतली, जराही उसंत न घेता. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय आर्थिक, सामाजिक विवंचनांची त्याने दखल घेतली नाही.
निर्देशांकाची अल्पावधीतली भरीव वाढ ही ‘शोचनीय’ आहे. सद्य:स्थितीत तसं म्हणणंदेखील अन्यायकारक होईल. कारण ‘शोचनीय’ या शब्दात विचार करणे अभिप्रेत असते. गेल्या तेरा दिवसांतील बाजाराचं वर्तन हे ‘याड लागलंय’ अशाच धाटणीचं आहे. या पार्श्वभूमीवर चालू आठवडय़ाच्या वाटचालीकडे वळू या.
शुक्रवारचा बंद भाव :
सेन्सेक्स : ३४,२८७.२४
निफ्टी : १०,१४२.२०
या स्तंभात जेव्हा सेन्सेक्स ३०,००० आणि निफ्टी निर्देशांक ८,८०० वर असताना, म्हणजेच निर्देशांकाची स्थिती ‘ही नाकावर सूत असल्यागत होती’ तेव्हापासून सेन्सेक्स ३४,००० आणि निफ्टी निर्देशांकाचे १०,००० चे वरचे लक्ष्य सूचित केलं होतं जे आता साध्यदेखील झालं; पण हे घडत असताना सभोवताली काय घडत होतं? अमेरिकेत आज मार्टिन ल्युथर किंग यांच्या वेळच्या वर्णद्वेषाविरुद्धच्या लढय़ाची आठवण होईल एवढी भीषण परिस्थिती आहे. इतकी की, अध्यक्ष ट्रम्प यांना सुरक्षिततेसाठी बंकरचा आधार घ्यावा लागला. दररोज अमेरिका-चीन व्यापारीयुद्धाचे शंख फुंकले जात आहेत. परदेशी पतमानांकन संस्था मूडीजने करोनामुळे भारताची आर्थिक परिस्थिती खालावण्याच्या शक्यतेमुळे भारताला दिलेले निराशाजनक पतमानांकन. मनाला उद्विग्न करणाऱ्या या घटना घडत असताना बाजाराची वागणूक ही ‘रोम जळत असताना निरो फिडेल वाजवत बसलाय’सारखी आहे.
या परिस्थितीत बाजाराची वाटचाल ही संथगतीने परिस्थितीचे आकलन करीत, दोन पावलं पुढे, एक मागे अशी असणं गरजेचं आहे. आता जी तेजी चालू आहे तिचे स्वरूप हे अतिजलद स्वरूपात न राहता सर्वसमावेशक, सर्व गुंतवणूकदारांना या तेजीत सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देणारी असली पाहिजे. येणाऱ्या दिवसात बाजाराची वाटचाल संथ गतीने झाली तर तो आश्वासक संकेत असेल. असे झाल्यास येणाऱ्या दिवसांत, प्रथम एक हलकीशी घसरण अपेक्षित असून सेन्सेक्सच पहिले खालचे लक्ष्य हे ३३,७०० आणि निफ्टीवर ९,९०० असे असेल. त्यानंतरचे लक्ष्य सेन्सेक्सवर ३२,२५० आणि निफ्टीवर ९,५०० असे असेल. या स्तराचा आधार घेत, या स्तरावर पायाभरणी करत या तेजीवरचे लक्ष्य हे सेन्सेक्सवर ३६,००० आणि निफ्टीवर १०,५५० असे असेल. हे लक्ष्य गाठण्यास बाजार जेवढय़ा संथ गतीने वाटचाल, (बाजाराची वाटचाल ही गणिती श्रेणीने झाली पाहिजे ना की भूमिती श्रेणीने!) सर्वसमावेशक राहिल्यास ही तेजी शाश्वत स्वरूपाची असेल. अन्यथा बाजाराने लेखाच्या शीर्षकाबरहुकूमच वागायचं ठरवलं, तर ते अंतिमत: विनाशास कारणीभूत ठरणार.
आगामी तिमाही निकालांचा वेध..
१) टायटन कंपनी लिमिटेड
* तिमाही निकाल – सोमवार, ८ जून
* ५ जूनचा बंद भाव – रु. ९९१.०५
* निकालानंतर केंद्रबिंदू स्तर – ९०० रुपये
अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून ९०० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य १,०५० रुपये. भविष्यात ९०० रुपयांचा स्तर सातत्याने राखल्यास १,१५० रुपयांच्या लक्ष्याकडे वाटचाल.
ब) सर्वसाधारण निकाल : ९०० ते १,०५० रुपयांच्या पट्टय़ात वाटचाल.
क) निराशादायक निकाल : ९०० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत ८०० रुपयांपर्यंत घसरण.
२) सेंच्युरी टेक्स्टाइल इंडस्ट्रीज लिमिटेड
* तिमाही निकाल – बुधवार, १० जून
* ५ जूनचा बंद भाव – रु. ३१७.७५
* निकालानंतर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर – २८० रुपये.
अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून २८० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ३५० रुपये. भविष्यात २८० रुपयांचा स्तर सातत्याने राखल्यास ४०० रुपयांच्या लक्ष्याकडे वाटचाल.
ब) सर्वसाधारण निकाल : २८० ते ३५० रुपयांच्या पट्टय़ात वाटचाल.
क) निराशादायक निकाल : २८० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत २५० रुपयांपर्यंत घसरण.
३) कॅस्ट्रॉल इंडिया लिमिटेड
* तिमाही निकाल – शुक्रवार, १२ जून
* ५ जूनचा बंद भाव – रु. १२३.१०
* निकालानंतर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर – ११५ रुपये.
अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून ११५ रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य १३० रुपये. भविष्यात ११५ रुपयांचा स्तर सातत्याने राखल्यास १५० रुपयांच्या लक्ष्याकडे वाटचाल.
ब) सर्वसाधारण निकाल : ११५ ते १३० रुपयांच्या पट्टय़ात वाटचाल.
क) निराशादायक निकाल : ११५ रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत १०० रुपयांपर्यंत घसरण.
४) हिंडाल्को इंडस्ट्रीज लिमिटेड
* तिमाही निकाल – शुक्रवार, १२ जून
* ५ जूनचा बंद भाव – रु. १४९.३०
* निकालानंतर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर – १३० रुपये.
अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून १३० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य १७० रुपये. भविष्यात १३० रुपयांचा स्तर सातत्याने राखल्यास २०० रुपयांच्या लक्ष्याकडे वाटचाल.
ब) सर्वसाधारण निकाल : १३० ते १७० रुपयांच्या पट्टय़ात वाटचाल.
क) निराशादायक निकाल : १३० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत ११५ रुपयांपर्यंत घसरण.
लेखक भांडवली बाजार विश्लेषक
ashishthakur1966@gmail.com