सरलेल्या आठवडय़ातील शेअर बाजाराच्या आलेखावर नजर टाकून चालू सप्ताहासाठी त्याचा कल सांगणारे हे नवीन साप्ताहिक सदर..
गतसप्ताहात निफ्टी वर नजर टाकली असता असे दिसून येते कि आठवडय़ाच्या  सुरुवातीला ६०७४ असलेल्या निफ्टीने सप्ताहअखेर बंद होताना  ५९९८ म्हणजे  ७६ (-१.२%) अंशाची  घट दाखवली जी घट झाली त्यात मुख्यत: स्टेट बँक, टाटा मोटर, भारती एअरटेल यांचा हातभार होता.
त्रमासिक आलेखावर निफ्टीने गेल्या त्रमासिकात ५९४४चा अवरोध मोडून काढत ५९६५चा उचांक प्रस्थापित केला होता. त्यामुळे पुढचा त्रमासिक अवरोध जो ६१८१ आहे त्याचा मागोवा निफ्टी काढत आहे. आठवडय़ाच्या आलेखावर नकारात्मक फरक दाखवून तेजी तात्पुरती संपत आल्याचे तो संकेत देत आहे.  शुक्रवारी त्याने आठवड्याच्या आलेखावरील अल्पकालीन EMA चा आधार जो ५९९० होता तो ५९८३ पर्यंत घसरत जाऊन तोडला आहे. १६ नोव्हेंबरपासून प्रथमच त्याने हा आधार तोडला असून पुढील आठवड्यात ५९६५च्या आसपास आधार घेऊन थोडा वर येण्याची शक्यता आहे.
सरलेला आठवडा हा डेरिव्हेटिव्हज्च्या जानेवारी मालिकेच्या सौदापूर्तीचा आठवडा होता.  या पाश्र्वभूमीवर गुरुवारी झालेल्या फ्युचर / ऑप्शनच्या ‘रोलओव्हर’ सर्वात जास्त ज्यात झाला ती म्हणजे साखर, खते, हॉटेल व पायाभूत सोयीसुविधा या क्षेत्रांतील समभाग आहेत. फेब्रुवारीअखेर मांडल्या जाणाऱ्या अर्थसंकल्पाचे हे समभाग लाभार्थी ठरण्याचा यामागे कयास निश्चितच आहे.
गेले वर्षभर भारतीय अर्थव्यवस्थेवर आपला विश्वास दाखवणाऱ्या परकीय गुंतवणूक संस्थांनी या वर्षांच्या पहिल्या पाच आठवड्यात (१ फेब्रुवारीचे आकडे उपलब्ध नाहीत) २०,३९९ कोटी रुपयांची गुंतवणूक करून आपला विश्वास अबाधित असल्याची खात्री दिली. तर देशी गुंतवणूक संस्थांनी १७,५३१ कोटी रुपयांची विक्री करून त्यांना पुरवठय़ाचे काम बजावले. गेल्या पाच सप्ताहात एकही दिवस परकीय गुंतवणूक संस्थांनी नक्त विक्री केली नाही तर देशी गुंतवणूक संस्थांनी एकही दिवस नक्त खरेदी केली नाही.
सरलेल्या आठवडय़ात ज्या समभागांचे भाव वेगाने वाढले अथवा पडले त्याचा माग
१. भारती एअरटेल (३३०) :
या दूरसंचार सेवा प्रदात्या कंपनीने आपल्या दरात केलेल्या वाढीमुळे त्यांचा फायदा वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन गुंतवणूकदारांनी यात खरेदीचा सपाटा चालविला होता. २१ डिसेंबरला २९९ वरून एकमार्गी वर जात त्याने २३ जानेवारीला ३६९ ही पातळी दाखवली. एका महिन्यात घसघशीत २३%  फायदा मिळाल्याने गेल्या आठवड्यात त्याची सपाटून विक्री करण्यात आली.
शिफारस : ३२२ चा स्टॉप लॉस ठेवून खरेदी केल्यास ३४७ पर्यंत जाण्याची शक्यता
२. टाटा स्टील (३९९) :
७ जानेवारीस ४४८ चा भाव दाखवून हा समभाग खाली येत आहे. गेल्याच्या गेल्या आठवड्याच्या आलेखावर त्याने ४०३ चा आधार तोडला पण गेल्या आठवड्यात पुढील आधार (३८७) न तोडता दैनिक आलेखावर फरक सकारात्मकता दाखवत असल्याने काहीशी उमेद करता येईल
शिफारस : ३८७ चा स्टॉप लॉस ठेवून खरेदी केल्यास ४११, ४१९ टप्प्याटप्प्याने ओलांडण्याची शक्यता.
३. स्टेट बँक  (२४०९) :
२५३०चा त्रमासिक अवरोध तोडून २५५१चा उच्चांक प्रस्थापित केल्यावर विश्रामाकरिता खाली येत आहे. गेले तीन आठवडे  २५५० ते २५२० या पातळीत फिरून रिझव्‍‌र्ह बँकेची पतधोरणाची  घोषणा झाल्यावर हिरमुसून शुक्रवारी त्याने आठवड्याच्या आलेखावरील अल्पकालीन EMA  चा जो २४३५ वर आधार घेतला होता तो २४०० पर्यंत घसरत जाऊन तोडला आहे.
शिफारस : २३७८, २३४८ पातळीपर्यंत खाली येण्याची शक्यता.
४. टाटा मोटर्स (२८५):
३३७ या सर्वोच्च पातळीवर १० जानेवारीस  जाऊन तेथून तो खाली येत आहे. २४ जानेवारीस वेगात २८२ पर्यंत घसरण दाखवल्याने निर्माण झालेली पोकळी  भरण्यासाठी ३१५ पर्यंत तो वर गेला. २८२ ला जात असताना त्याने मासिक अल्पकालीन EMA  (२७९) जवळ आधार घेतला होता तो त्याने शुक्रवारी २७० पर्यंत जाऊन तोडला पुढील आधार २६४ चा त्रमासिक अल्पकालीन EMA  चा आहे.
शिफारस : २५० च्या आसपास खरेदी केल्यास २७५ पर्यंत जाण्याची शक्यता. स्टॉप लॉस- २४५
५. ओएनजीसी (३३२):
सरकारने  गेल्या  महिन्यात डिझेल तसेच एलपीजीबाबत घेतलेल्या निर्णयांमुळे हा २६ डिसेंबरला २५७ला असणारा समभाग १८ जानेवारीला ३५४च्या पातळीस गेला. फार वेगाने वर गेल्याने आता तो खाली येण्याची शक्यता.
शिफारस : ३४४ चा स्टॉप लॉस घेऊन विक्री केल्यास, ३२०-३१४ ची पातळी टप्प्याटप्प्याने दाखविण्याची शक्यता
 ६.  इंडो बोरक्स (१०९) :
फक्त मुंबई शेअर बाजारात उलाढाल होणारा या समभागाने त्रमासिक आलेखावर गेल्या त्रमासिकात १०३.९चा अवरोध मोडून काढत ११३.४चा उच्चांक प्रस्थापित केला होता. गेल्या आठवड्यात याने ११३चा अवरोध मोडत मोठय़ा उलाढालीवर पुढे चाल घेतली आहे.  त्यामुळे पुढचा मासिक अवरोध जो १२६.६ आहे त्याचा मागोवा हा काढत आहे. अवघे तीन कोटी या छोटय़ा भागभांडवलावर गेल्या त्रमासिकात ४.३ कोटीचा नफा त्याने दाखविला होता जो गेल्या वर्षांच्या याच कालावधीपेक्षा दुप्पट आहे.
शिफारस : सध्याच्या स्तरावर खरेदी केल्यास स्टॉप लॉस- १०३.

Story img Loader