सुधीर जोशी
गेल्या सप्ताहात आयटीसी, मिहद्र अँड मिहद्र, डाबर, पी आय इंडस्ट्रीज, दीपक नाईट्राईट, बँक ऑफ बडोदासारख्या अनेक दिग्गज कंपन्यांच्या निकालांनी तेजीच्या तुफानाला अधिक वेग दिला. अमेरिकी भांडवली बाजाराची दमदार धाव, आंतरराष्ट्रीय पातळीवर खनिज तेलाच्या घसरलेल्या किमती, परदेशी गुंतवणूकदारांकडून झालेली समभाग खरेदी आणि सावरलेला रुपया या बाबी बाजारासाठी अनुकूल ठरल्या. मात्र तैवानमधील घडामोडी युक्रेनच्या वाटेने जाण्याची शक्यता व सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी होणारा रिझव्र्ह बँकेच्या व्याज दरवाढीचा बाजारावर अधिक दबाव राहिला. तैवानच्या आघाडीवर मोठी घडामोड झाली नाही. सध्या तरी त्यामुळे शांतता आहे. भांडवली बाजाराच्या अपेक्षेप्रमाणे मध्यवर्ती बँकेने देखील अध्र्या टक्क्यांची रेपो दरवाढ जाहीर केली. यामुळे बाजाराच्या तेजीला खीळ बसली नाही. सप्ताहअखेर बाजाराचे प्रमुख निर्देशांक सकारात्मक पातळीवर बंद होण्यास यशस्वी झाले.
एचडीएफसी लिमिटेड: या सर्वात मोठय़ा गृहवित्त क्षेत्रातील कंपनीने पहिल्या तिमाहीत ३,६६९ कोटींचा नफा मिळविला आहे. गेल्या वर्षांतील याच तिमाहीपेक्षा तो २२ टक्क्यांनी अधिक आहे. तसेच कंपनीने केलेल्या एकूण कर्ज वितरणात १६ टक्के वृद्धी झाली. यात वैयक्तिक कर्जाचा वाटा मोठा होता. रिझव्र्ह बँकेने रेपो दर वाढवल्यावर ग्राहकांच्या कर्जावरील व्याजदर वाढण्यास थोडा काळ लागतो. त्यामुळे एचडीएफसीचे नफ्याचे घटलेले प्रमाण येत्या काही महिन्यांत भरून निघेल. तसेच एचडीएफसी बँकेबरोबर विलीनीकरण झाल्यावर कमी व्याजातील ठेवींचा मोठा ओघ नव्या कंपनीला मिळेल. यासाठी हे समभाग दीर्घकाळ गुंतवणुकीचा दृष्टिकोन ठेवून पोर्टफोलियोमध्ये जमवायला पाहिजेत.
ओरिएंट बेल: पूर्वीची ओरिएंट सिरॅमिक्स अँड इंडस्ट्रीज लिमिटेड ही सिरॅमिक आणि व्हिट्रिफाईड टाइल्सची निर्मिती आणि विपणन करणारी ४५ वर्षे जुनी कंपनी आहे. जमिनीवर लावण्याच्या टाइल्सबरोबर भिंती व इमारतींच्या दर्शनी भागांसाठी वापरल्या जाणाऱ्या नॉन-व्हिट्रिफाइड, व्हिट्रिफाइड, अल्ट्रा व्हिट्रिफाइड अशा डेकोरेटिव्ह टाइल्सची विक्री करते. इतर मोठय़ा सिरॅमिक कंपन्यांच्या तुलनेत ही लहान कंपनी असली तरी भांडवली बाजारातील तिची कामगिरी चांगली आहे. कंपनी कर्ज-मुक्त आहे. विपणनासाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर करण्यात ती अग्रेसर आहे. गृहनिर्माण क्षेत्रातील वाढत्या मागणीचा कंपनीला फायदा होणार आहे. जूनअखेर सरलेल्या तिमाहीत कंपनीच्या विक्रीत ७८ टक्के वाढ होऊन ती १५४ कोटी रुपये झाली. कंपनीने नफ्यात २३६ टक्क्यांची वाढ नोंदवत तो ७ कोटींवर नेला आहे. सध्या ६०० रुपये ते ६४० रुपयांच्या पातळीत असलेल्या या समभागात माफक प्रमाणात गुंतवणूक करता येईल.
अशोक लेलँड: भारताच्या व्यावसायिक वाहन उद्योगात अशोक लेलँड आघाडीवर आहे. कंपनी बस, ट्रक, संरक्षण क्षेत्राशी निगडित आणि विशिष्ट उपयोगाच्या वाहन श्रेणीत विस्तृत उत्पादन करते. भारतीय महानगरांमध्ये आणि पाचपैकी चार राज्य परिवहन उपक्रमाच्या बसेस अशोक लेलँडकडून खरेदी केल्या जातात. गेल्या सहा महिन्यांत कंपनीने टिपर, मल्टी-एक्सल वाहनांची नवी मालिका बाजारात आणली. जूनअखेरच्या तिमाहीत कंपनीचा वाणिज्य वाहनांचा हिस्सा २७ टक्क्यांवरून ३१ टक्क्यांवर पोहोचला आहे. कंपनीच्या विक्रीमध्ये या तिमाहीत गेल्या वर्षांच्या तुलनेत १४४ टक्के वाढ नोंदवली गेली. कंपनीची नफा क्षमता वाढली असून कच्च्या मालाच्या (लोखंड) किमतीमधील घटीमुळे पुन्हा नफ्यामध्ये येईल. कंपनीच्या समभागातील गुंतवणूक एक ते दोन वर्षांत चांगला नफा देईल.
परदेशी गुंतवणूकदारांनी आधीच्या नऊ महिन्यांत लावलेला समभाग विक्रीचा मारा जुलै महिन्यात थांबला. सरलेल्या जुलै महिन्यात त्यांनी ५ हजार कोटींची नक्त समभाग खरेदी केली होती. ऑगस्टच्या पहिल्या आठवडय़ातही त्यांनी खरेदीच केली व त्यांच्या ‘पुन्हा येण्याचे’ लाभ बाजाराने अनुभवले. भारताकडे परदेशी चलनाची गंगाजळी पुरेशी असून जुलै महिन्यात ५७२ अब्ज डॉलर नोंदवली गेली आहे. यामुळे जगातील इतर देशांना भासत असलेल्या समस्या आपल्याकडे फारच कमी प्रमाणात आहेत. जुलै महिन्यांचा भारताच्या निर्मिती क्षेत्राचा (पीएमआय) निर्देशांक गेल्या ८ महिन्यांतील उच्चांकावर ५६.४ वर पोहोचला. भारतामधील उद्योग निर्यातीपेक्षा अंतर्गत मागणीवर जास्त अवलंबून आहेत. त्यामुळे अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या गेल्या महिन्यातील अवमूल्यनाचा त्यांना जास्त फटका बसलेला नाही. रुपयादेखील आता सावरतो आहे. दुसरीकडे दिलासादायक बाब म्हणजेच खनिज तेलाचे दरही खाली येत आहेत. परिणामी कंपन्यांना नफ्याच्या प्रमाणात झालेली घट भरून यायला मदत मिळेल. माहिती तंत्रज्ञान क्षेत्राला बसलेला कामगार गळतीचा (ॲट्रिशन रेट ) फटका आता कमी होत आहे. त्यामुळे येत्या तिमाहीत त्यांच्या निकालात सकारात्मक बदल दिसतील. या सर्व गोष्टींचा विचार करता कंपन्यांना आणि पर्यायाने बाजाराला चांगले दिवस येतील अशी आशा आहे. गुंतवणूकदारांनी लहान कंपन्यांमध्ये नफावसुली करून मोठय़ा कंपन्यांमध्ये टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करावी.
सप्ताहातील या घडामोडींकडे लक्ष ठेवा:
भारती एअरटेल, सिटी युनियन बँक, बोरोसिल, इंडियन हॉटेल्स, नाल्को, कावेरी सीड्स, प्रताप स्नॅक्स, टॉरन्ट पॉवर, एबीबइ, अंबर एंटरप्राइझ, डिश टीव्ही, फाईन ऑरगॅनिक, गॅलॅक्सी सरफॅक्टन्ट्स, प्रिन्स पाईप्स, ओएनजीसी, ऑइल इंडिया, पिडीलाइट, अरिबदो फार्मा, भारत फोर्ज, ट्रेंट, अॅस्ट्राल, हिरो मोटोकॉर्प या कंपन्या जूनअखेरच्या तिमाहीचे निकाल जाहीर करतील.
ई-क्लर्क्स कंपनी बक्षीस समभागांची घोषणा करेल.
sudhirjoshi23@gmail.com