बहुर्चीत आणि बहुप्रतिक्षित व्याजदर कपात अखेर एकदाची झाली. रिझव्‍‌र्ह बँकेने पाव टक्का व्याजदर कपात केली आणि सीआरआरमध्येदेखील पाव टक्का कपात केली. काही बँकांनीदेखील कर्जावरील व्याजदर (बेस रेट) थोडे कमी करून ‘मम’ म्हटले. आयडीबीआय, आरबीएस आणि स्टेट बँक यांचा व्याजदर कपात करणाऱ्या बँकांमध्ये समावेश आहे. या व्याजदरातील कपातीचा लाभ जुन्या आणि नव्या कर्जदारांना नक्कीच होईल. काही मंडळी सहज म्हणतील पाव टक्क्याने काय होणार आहे? त्यांचेही म्हणणे रास्त आहे. ११% व्याज भरणाऱ्या कर्जदाराला १०.७५% व्याजामुळे रु. १ लाखाच्या २० वर्षे मुदतीच्या कर्जावर १७ रुपयेच फायदा होतो. पण हेही नसे थोडके. लहान का होईना पण सुरुवात झाली, असे म्हणणे जास्त योग्य ठरेल. गेल्या वर्षांत बँकांनी नवीन कर्जदारांना आकर्षति करण्यासाठी नवनवीन योजना चालू केल्या होत्या. यात आकर्षक व्याजदर, अत्यल्प हाताळणी खर्च (प्रोसेसिंग फी), सुलभ प्रक्रिया आणि झटपट निर्णय यांचा समावेश होता. त्यामुळे जुन्या कर्जदारांची काहीशी पंचाईत झाली होती. नवीन कर्जदारांपेक्षा जुन्या कर्जदारांचा व्याजदर जास्त होता. त्यांना आता थोडासा दिलासा मिळाला असावा. पण ही बचत पुरेशी नाही. कर्जदारांनी आता अधिक चौकस बुद्धीने बँकांच्या व्याजदरांकडे लक्ष देणे आवश्यक आहे. व्याजदरांच्या घसरणीला आता सुरुवात झाली आहे. मार्च महिना अखेरिस रिझव्‍‌र्ह बँक पुन्हा एकदा व्याज दर कपात करेल, अशी एकूणच बाजाराची अपेक्षा आहे. त्यापूर्वी केंद्र सरकारचे वार्षकि अंदाजपत्रक (बजेट) जाहीर होईल. अर्थसंकल्पामध्ये प्रशासकीय खर्चावर शासनाचे नियंत्रण राहिले व एकूणच शासनाची आíथक परिस्थिती चांगली असेल तर रिझव्‍‌र्ह बँक पुन्हा एकदा व्याजदर कपात करेल. त्यावेळी महागाई आणि अर्थव्यवस्थेचा वाढीचा दरदेखील बघितला जाईल. हे सर्व घटक अनुकूल असतील याची हमी आज देणे केवळ अशक्य आहे. त्याचबरोबर मुदत ठेवींच्या वाढीचा वेग कर्ज वितरणाच्या तुलनेत लंगडा आहे. त्यामुळेच बँकांनी जानेवारी महिन्यात मुदत ठेवींवरील व्याज दर वाढविले आहेत. एक बाजूला मुदत ठेवींवरील वाढलेले व्याज दर आणि दुसऱ्या बाजूला कर्जावरील व्याजदरात अपेक्षित कपात हे समीकरण लगेच जुळणे कठीण वाटते. त्यामुळे सर्वच बँका त्वरेने व्याजदर खाली आणतील अशी अपेक्षा बाळगू नये. प्रत्येक बँक स्वत:ची गणिते मांडून मगच व्याजदर खाली आणेल. त्यामुळे तुम्ही ज्या बँकेकडून कर्ज घेतले आहे त्या बँकेने व्याजदर खाली आणले नाहीत तरी हताश होऊ नका. इतर बँकांच्या व्याजदरांवर लक्ष द्या तुमचे जास्त व्याज आकारणारे गृहकर्ज तुम्ही दुसऱ्या बँकेकडे वळते करून त्यावरील व्याजदर कमी करून घेऊ शकता. तुमच्या २० वर्षांच्या गृहकर्जाची किमान ८-१० वष्रे शिल्लक असतील तर जरूर कमी व्याजदर देणाऱ्या बँकेकडे जावे. तुमच्या कर्जावरील व्याजदरापेक्षा १% कमी व्याजदर दुसरी बँक देत असेल तर त्वरेने हा निर्णय घ्या. त्यामुळे तुमची बरीच बचत होईल आणि तुम्ही लवकरच कर्ज मुक्त होऊ शकाल. ‘फ्लोटिंग रेट’ गृह कर्जावर ‘प्री पेमेंट पेनल्टी’ नाही. त्यामुळे एका बँकेकडून दुसऱ्या बँकेकडे जाण्याचा प्रवास सुकर होईल, अशी अपेक्षा आहे. पण दुसऱ्या बँकेकडे कर्जाची विचारणा करण्यापूर्वी स्वत:चा ‘क्रेडिट रिपोर्ट’ एकदा तपासून पहा. बँका गृहकर्ज देताना क्रेडिट रिपोर्ट’ तपासून बघतात व ७५० पेक्षा जास्त ‘क्रेडिट स्कोअर’ असावा, अशी अपेक्षा बाळगतात.

Story img Loader