जून महिन्याच्या अतिथी विश्लेषक ज्योती भावे या भांडवली वस्तू आणि पायाभूत सुविधा विश्लेषक असून, त्या टाटा टीडी, डॉनिडे सिक्युरिटीज्, एम्के ग्लोबल या दलाल पेढय़ात कार्यरत राहिल्या आहेत. मागील तीन वर्षांपासून त्या एमबी इक्विटीज् या दलाल पेढीत सह-उपाध्यक्ष समभाग संशोधन विभागात कार्यरत आहेत.
कठोर आर्थिक निर्णयासाठी देशातील जनतेने तयार राहावे असे सूतोवाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ताज्या गोवा भेटीत केले. त्यामुळे आगामी अर्थसंकल्पात काय वाढून ठेवले असेल याची चुणूक मोदींच्या या वाक्याने येऊ शकेल. लोकप्रिय योजनांमुळे फुगलेली वितीय तूट व वाढती महागाई यांना वेसण घालण्यासाठी जे उपाय करणे शक्य आहे ते सर्व उपाय मोदी सरकार करेल.
मे महिन्याच्या महागाईचा दर ६.१ टक्के या पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहचला आहे. व्याज दर कपातीची शक्यता नजीकच्या काळात तरी दृष्टीपथात नाही. अनुदाने कमी करण्यासाठी सरकार प्रयत्नशील राहणार आहे. मागील सरकारच्या दरमहा डिझेलच्या किंमतीत मर्यादित वाढ करण्याचे धोरण या सरकारनेही सुरू ठेवल्यामुळे आपोआपच डिझेलसाठीच्या अनुदानातून सरकारची सुटका होईल. स्वयंपाकाचा गॅस व केरोसीनबाबत हेच धोरण अवलंबण्यात येईल. कररचनेत मोठे बदल होतील. वैयक्तिक करदात्यांना असलेल्या कर सवलती कमी करून कर संकलन वाढविण्यावर भर असेल. सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांना अधिक निर्णय स्वातंत्र्य बहाल केले जाऊ शकते. स्कूटर इंडिया व अन्य सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या ज्या सुधारणेच्या पलीकडे गेल्या आहेत त्या बंद होऊ शकतात.
मागील सोमवारी अर्थसंकल्पात संरक्षण खात्यासाठी सर्वात भरीव तरतुदीचा लाभार्थी ठरण्याची शक्यता असलेल्या भारत इलेक्ट्रोनिक्स लिमिटेडचा गुंतवणुकीसाठी विचार केला. अर्थसंकल्पात संरक्षण खात्यानंतरचा सर्वात मोठी तरतूद कृषी व ग्रामीण विकास खात्यासाठी असते. शेतीसाठी कमी व्याजाने वित्तपुरवठा, रासायनिक खते, कीटकनाशके, बी बियाणे व शेतीची अवजारे यांना दिले जाणारे अनुदान यांचा यात समावेश होतो. म्हणूनच शेतीच्या अवजारांचा (ट्रॅक्टर व इतर सुटे भाग) उत्पादक असलेल्या एस्कॉर्टसची शिफारस करावीशी वाटते.
एस्कॉर्टस ही भारतातील एक प्रमुख अभियांत्रिकी कंपनी आहे. या कंपनीची स्थापना १९४४ मध्ये झाली. या कंपनीने आपला व्यवसाय, शेती अवजारे, वाहन उद्योगासाठी सुटे भाग, बांधकाम यंत्रसामग्री व भारतीय रेल्वेसाठी यंत्रसामग्री या चार गटात विभागाला आहे. शेतीसाठी २५ ते ८० अश्वशक्तीचे ४५ प्रकारचे ट्रॅक्टर्सचा एस्कॉर्टसच्या प्रमुख उत्पादनात समावेश होतो. ‘फार्माटेक’ व ‘पॉवरटेक’ या एस्कॉर्टसच्या ट्रॅक्टरच्या प्रमुख नाममुद्रा आहेत. क्रेन लोडर फोर्कलिफ्ट ‘पिक अॅन्ड कॅरी’ प्रकारच्या हायड्रॉलिक क्रेन उंच इमारती बांधताना बांधकाम साहित्य हाताळण्या साठी वापरण्यात येणाऱ्या उंच क्रेन यांचा समावेश होतो. रेल्वेसाठी दोन डब्यांना जोडणारे कपिलग, प्रवासी डब्यांना धक्के बसू नये म्हणून वापरण्यात येणारी ‘शॉक अॅब्सॉरबर्स’, ‘ब्रेक ब्लॉक्स’ व ‘व्हल्कनाइज्ड रबर’ वापरून तयार केलेले सुटे भाग यांचा समावेश होतो. तर दुचाकीसाठी सुटय़ा भागात ‘शॉक अॅब्सॉरबर’, ‘टेलिस्कोपिक शॉक अॅब्सॉरबर’ व इतर सुटय़ा भागांचा समावेश होतो.
लोकसभेत मोदी सरकारला बहुमतास आवश्यकतेपेक्षा अधिक पाठबळ आहे. राज्यसभेत हे बहुमत मिळविण्यास दोन वष्रे जावी लागतील. मागील सरकारचे ‘ड्रीम प्रोजेक्ट’ असलेल्या अन्नसुरक्षा विधेयकात विद्यमान सरकारकडून मोठे बदल अपेक्षित असून ही योजना दारिद्य्ररेषेखालील लोकांपर्यंतच मर्यादित राखली जाईल. शेतीच्या किमान आधार किंमतीत वाढ ही वाढत्या महागाईला कारण ठरते.म्हणून शेतीच्या किमान आधार मूल्यात वाढ होण्याची शक्यता नाही. मंजुरीच्या प्रतीक्षेत असलेले कायदे मंजूर होण्यास अडचण येणार नाही. शेतीच्या सुधारणा व पायाभूत सुविधा क्षेत्राला गती देण्याचे काम हे सरकार करेल. जेणेकरून एस्कॉर्टसच्या ट्रॅक्टर व बांधकाम यंत्रसामग्रीला असलेली मागणी वाढण्याची शक्यता आहे. वाढीव मागणीमुळे नफ्याचे प्रमाण वाढेल. मागील पाच वर्षांत ट्रॅक्टरची बाजारपेठ सरासरी २५ टक्के दराने वाढत आहे. देशाच्या दक्षिण व पश्चिम भागात ही वाढ १० टक्क्य़ांदरम्यान आहे. मागील वर्षांत एस्कॉर्ट्सच्या एकूण ट्रॅक्टरच्या विक्रीत ४० अश्वशक्तीपेक्षा कमी ताकदीच्या ट्रॅक्टरचे जास्त प्रमाण होते. या ट्रॅक्टरच्या विक्रीत नफ्याचे प्रमाण अल्प आहे. तसेच विविध अडचणींचा सामना करीत असलेला खाण व्यवसाय व बांधकाम व्यवसायामुळे बांधकाम यंत्रसामग्री व्यवसायाचा नफा ३४ टक्क्यांनी घटला. कंपनीने ट्रॅक्टर व्यवसायाच्या किंमत धोरणात बदल केले असून काही ठिकाणी किंमती घटविल्या तर काही बाजारपेठेत काही उत्पादनांच्या किंमती वाढविल्या जेणेकरून एकूण ट्रॅक्टर विक्रीत ५० अश्वशक्तीहून अधिक ताकदीच्या ट्रॅक्टरचे प्रमाण वाढून या व्यवसायाची नफाक्षमता वाढेल. कंपनीने उच्च अश्वशक्तीच्या ट्रॅक्टरच्या विक्रीसाठी नवीन बाजारपेठा धुंडाळण्यात यश आले असून ऑस्ट्रेलिया व लॅटिन अमेरिका येथे निर्यात सुरू केली आहे. पुढील दोन वर्षांत ही निर्यात दुप्पट होण्याची शक्यता आहे असा विश्वास कंपनीने आपल्या वित्तीय निकालांनंतर झालेल्या विश्लेषकांच्या परिषदेत सांगितले. कंपनीने उत्तरांखंड राज्यातील रुद्रपूर कारखान्याची विस्तार योजना हाती घेतली असून या आíथक वर्षांत ती पूर्ण होणे अपेक्षित आहे. या कारखान्याची उत्पादन क्षमता सध्याच्या १५०,००० ‘शॉक अॅब्सॉरबर’ वरून तिपटीहून अधिक वाढून ५००,००० होणार आहे.
‘अर्थ वृत्तान्त’मध्ये प्रसिद्ध लेखांमध्ये चर्चिलेल्या, शिफारस केलेल्या योजना/समभागांमध्ये लेखकांची व्यक्तिगत गुंतवणूक अथवा अन्य स्वारस्य नाही. परंतु सदर लेखकांचा सल्ला घेणारे ग्राहक, निकटवर्तीयांची त्यात गुंतवणूक असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
शेतीच्या स्वयंपूर्णतेला अग्रक्रमाचे धोरण!
जून महिन्याच्या अतिथी विश्लेषक ज्योती भावे या भांडवली वस्तू आणि पायाभूत सुविधा विश्लेषक असून, त्या टाटा टीडी, डॉनिडे सिक्युरिटीज्, एम्के ग्लोबल या दलाल पेढय़ात कार्यरत राहिल्या आहेत.
First published on: 23-06-2014 at 01:04 IST
मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Top priority for self reliance in farming sector