या महिन्याचे अतिथी विश्लेषक आहेत जीईपीएल कॅपिटलचे आदित्य आनंद बापट. या पहिल्या भागात त्यांनी १९९१ पासूनच्या सहा सार्वत्रिक निवडणुकांच्या निकालानंतर शेअर निर्देशांकांच्या कामगिरीचा आढावा घेतला आहे. निवडणुकीमुळे लाभार्थी ठरणाऱ्या उद्योग क्षेत्राविषयी व या क्षेत्रातील कंपन्यांमध्ये गुंतवणूक संधींची चर्चा ते फेब्रुवारी महिन्यातील चार सोमवारी या सदरातून घेतील..
सार्वत्रिक निवडणुका आणि बाजार यांचे जवळचे नाते आहे. मागील पाच निवडणुकीनंतरच्या एका वर्षांत बाजाराचा परतावा दोन अपवाद वगळता सरसच राहिलेला आहे. साहजिकच यंदाच्या निवडणुकांनंतर बाजार कसा असेल याचा अंदाज मांडण्यात संख्याशास्त्रज्ञ गुंतले आहेत.
‘लोकसत्ता अर्थ वृत्तान्त’साठी फेब्रुवारी महिन्यात अतिथी विश्लेषक म्हणून लिहायला होकार तर दिला, परंतु नक्की विषय काय असावा याचा विचार करत असताना मागील आठवडय़ात प्रसिद्ध झालेल्या दोन बातम्यांनी लक्ष वेधून घेतले. पहिली होती, केंद्रीय विधी आयोगाची बठक होऊन निवडणुकीत प्रत्येक उमेदवाराच्या खर्चाची मर्यादा वाढविण्याच्या प्रस्तावावर विचार करण्यात आला; तर दुसऱ्या बातमीत मुख्य निवडणूक आयुक्त व्ही. एस. संपथ यांनी केंद्रीय गृह सचिव जी. के. पिल्लई यांची भेट घेऊन सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला.. या दोन बातम्यांत एक समान धागा आहे तो म्हणजे जगातील सर्वात मोठय़ा लोकशाही राष्ट्राच्या सोळाव्या लोकसभेच्या स्थापनेसाठी होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकीचा.
आजपासून कधीही लोकसभेच्या निवडणुकीची घोषणा होऊन आचारसंहिता लागू होईल. सार्वत्रिक निवडणुका आणि बाजार यांचे जवळचे नाते आहे. मागील पाच निवडणुकीनंतरच्या एका वर्षांत बाजाराचा परतावा दोन अपवाद वगळता सरसच राहिलेला आहे. आता कधीही सोळाव्या लोकसभेच्या स्थापनेकरिता निवडणूक होणार असल्याने साहजिकच या निवडणुकांनंतर बाजार कसा असेल याचा अंदाज मांडण्यात संख्याशास्त्रज्ञ गुंतले आहेत. निकालानंतरच्या पहिल्या कामकाजाच्या दिवशी २००४ मध्ये निफ्टीने उताराची किमान मर्यादा गाठली तर २००९ मध्ये निफ्टीने कमाल उंची गाठली. त्यामुळे यावर्षी काय होईल याचा शोध घेण्याचा प्रयत्न जो तो आपल्याकडून करत आहे.
एखाद्या घटनेने बाजारातील सर्वच घटक एकाच दिशेने प्रवास करण्याची गोष्ट विरळाच. रिझव्र्ह बँकेचे पतधोरण असो वा दर महिन्यात जाहीर होणारे वाहन विक्रीचे आकडे असो. त्यांचा परिणाम त्या त्या उद्योगक्षेत्रापुरता मर्यादित असतो. दरवर्षी जाहीर होणारा अर्थसंकल्प काही उद्योगक्षेत्रांना सकारात्मक तर काहींना नकारात्मक असतो. परंतु निवडणुकांचे निकाल सर्वच उद्योगक्षेत्रांना परिणामकारक असतात, कारण देशाची पुढची धोरणे त्या वाटेनेच ठरत असतात. आज या बाबतीत तीन शक्यता दिसतात. पहिली भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी स्वबळावर २७२ च्या जादुई आकडय़ाला स्पर्श करण्याची; दुसरी शक्यता निवडणुकीत काँग्रेसला जर स्पष्ट बहुमत मिळाले नाही आणि तथाकथित ‘निधर्मी’ सरकार स्थापनेसाठी डाव्यांच्या मदतीची गरज पडण्याची आणि तिसरी शक्यता आहे काँग्रेस व भाजपा हे दोन्ही प्रमुख पक्ष स्वबळावर १५० जागांपर्यंत रोखले जाण्याची. आजच्या घडीला या तीन शक्यतांव्यतिरिक्त चौथी शक्यता दिसत नाही आणि या तीनही शक्यतांमध्ये पुढील एका वर्षांत बाजाराचा प्रवास वेगवेगळ्या दिशेला असेल. भाजप २२०-२४० पर्यंत व रालोआने सध्याच्या घटक पक्षाच्या बळावर सरकार स्थापन करण्याच्या संख्येला स्पर्श केला तर येत्या जून-जुल महिन्यातच निफ्टी ७००० असायला हवा. रालोआला तृणमूल व तत्सम अन्य लहान पक्षांचे समर्थन घ्यावे लागले तर आपला सत्तेतील वाटा वसूल करणारे नवीन चन्द्राबाबू तयार होतील. मग निफ्टी ६५०० पर्यंतच रोखला जाऊ शकतो. व काँग्रेसप्रणीत डाव्या आघाडीच्या पािठब्यावर आलेले सरकार निफ्टीचा ४५०० स्तर सुद्धा दाखवू शकेल. हे सर्व निकालानंतरच्या पहिल्या कामकाजाच्या दिवशी पहिल्या मिनिटाभरातच दिसेल असे नाही. परंतु पुढील एका वर्षांची वाटचाल ही पहिली पाच मिनिटे ठरवतील हे नक्की. निकाल नक्की कसा असेल हे निवडणूकपूर्व चाचण्या व राजकीय विश्लेषक यांचे काम आहे. तेव्हा त्यावर भाष्य न करता निवडणुकांच्या लाभार्थी असलेल्या उद्योगक्षेत्रांचा व त्या क्षेत्रातील कंपन्यांचा आढावा पुढील भागात घेऊ.
लेखक जीईपीएल कॅपिटल या नामांकित दलालपेढीत समभाग विश्लेषक आहेत. त्यांच्याशी ई-मेल: adityab@geplcapital.com वर संपर्क साधता येईल.