डॉ. आशीष थत्ते ashishpthatte@gmail.com

पुरवठादार हा फक्त कंपन्यांमध्ये नसतो तर प्रत्येकाच्या घरातदेखील असतो. दूध घरी आणून देणारे, वर्तमानपत्र घरपोच देणारे हे आपले नेहमीचे पुरवठादार (आणि वृत्तपत्र हे विचारांचे पुरवठादारदेखील). यांच्याबरोबर आपल्याला चांगले संबंध ठेवणे गरजेचे असते. हल्ली शहरात वर्तमानपत्र व दूध कोण टाकते ते समजतदेखील नाही. मात्र गावागावांत किंवा लहान शहरांमध्ये आजदेखील त्यांच्याशी सौहार्दाचे संबंध ठेवले जातात. भाजीवाला हादेखील गृहिणींचा महत्त्वाचा पुरवठादार असतो. हाच पुरवठादार होता म्हणून टाळेबंदीचे दिवस थोडेसे कमी त्रासदायक गेले. गृहिणी किंवा वयस्कर व्यक्ती ज्यांच्याकडे हा विभाग असतो ते विक्रेत्यांचे विविध पर्याय निर्माण करतात, म्हणजे आपण एका विक्रेत्यांवर अवलंबून राहिला नको. जसे कंपन्यांमध्ये पुरवठादारांबरोबर वाटाघाटी करतात तसेच आपण पण करतो, पण अनौपचारिकरीत्या. पूर्वीच्या काळी आपल्याकडे वाणी नावाचा महत्त्वाचा पुरवठादार होता. घरातील बरेचसे सामान त्याच्याकडून यायचे. त्यावेळी वाण सामानासाठी एकच दुकान कायमस्वरूपी ठरलेले होते. आता मात्र वाण सामानासाठी दुकानांच्या साखळय़ा निर्माण झाल्या आहेत. जिथे अधिक सवलत देतात तिथेच आपण जातो. त्यामुळे आता पूर्वीसारखे वैयक्तिक संबंध असतीलच असे नाही. पूर्वीचा वाण सामान विकणारा अगदी कंपन्यांच्या पुरवठादाराप्रमाणे नंतर पैसे द्या असे देखील सांगायचा. म्हणजे तेवढी आपली पत असायची सध्या जागा क्रेडिट कार्डने घेतली आहे.

अस्सल खवय्यांचे पुरवठादार तर काही विचारूच नका. कोळीणसुद्धा ठरवलेली असते, दुसऱ्या कोळिणीचे मासे अळणी! तिच्याशी घासाघीस करताना कंपन्यांतील पुरवठादाराबरोबर बोलणी केल्याची जाणीव होते. म्हणजे आपण पुरवठादार व्यवस्थापन कितीतरी प्रकारे करत असतो. डॉक्टर म्हणजे अजून एक महत्त्वाचा पुरवठादार असे. सर्दी-पडसे झाल्यावर दर वेळेला काही नवीन डॉक्टर आपण शोधत नाही. केशकर्तनालय किंवा सौंदर्य प्रसाधन केंद्र (ब्युटी पार्लर) हेदेखील सहसा बदलत नाही. विचार करा आंबेदेखील वेगवेगळय़ा विक्रेत्यांकडून घेत नाही म्हणजे तिथेही व्यवस्थापन आलेच. मुंबईसारख्या ठिकाणी जागा बदलली, म्हणजे मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे वगैरे किंवा लग्नानंतर मुलगी सासरी गेली तरी पुढचे कित्येक दिवस छोटय़ाछोटय़ा वस्तूंसाठी जुन्या घरी किंवा माहेरी येऊन तेथील दुकानातून वस्तू घेतल्या जातात. म्हणजेच जोपर्यंत नवीन विक्रेत्यांवर आपला पूर्ण भरोसा बसत नाही, तोपर्यंत सहजासहजी पुरवठादारही आपण बदलत नाही.

औपचारिक पद्धतीने विक्रेत्यांना आपण मानांकन देत नाही, पण अनौपचारिक मूल्यांकन मात्र होतेच. हल्ली नवीन पिढीचा कल हा वस्तू थेट घरी मिळण्यावर असतो. म्हणजे पुरवठादार निवडण्यामागे हा अजून एक निकष आहे. नवीन कंपन्या ग्राहकाच्या सोयीप्रमाणे कुठल्या वेळेत वस्तूंचे वितरण करायचे हे विचारतात. पुरवठादाराचे महत्त्व आपल्या लेखी असते, पण आपल्याला ते समजतदेखील नाही.

लेखक कॉस्ट अँड मॅनेजमेण्ट अकाउंटंट म्हणून कार्यरत /