आयुर्विमा हा कर वाचविण्यासाठीचा सर्वोत्तम पर्याय आहे ही भ्रामक कल्पना ग्राहकाने मनातून काढून टाकायला हवी. करामध्ये सूट मिळविण्यासाठी करायच्या गुंतवणुकीबाबत अन्य अनेक किफायती पर्याय बाजारात निश्चितच उपलब्ध आहेत.
सध्या प्राप्तिकर वाचविण्यासाठीच्या गुंतवणुकीचा सीझन टॉप गिअरमध्ये आहे. दरवर्षी बहुतांशी गुंतवणुकदार ८०सी अंतर्गत १ लाख रुपयांपर्यंतच्या रकमेचा पूर्णपणे लाभ घेत असतात. वर्षभर या ना त्या कारणाने चालढकल केलेला गुंतवणुकदारांची आता धावपळ सुरु होते. त्यातच या प्रॉडक्ट्सचे विक्रते भंडावून सोडत असतात. वेगवेगळया पर्यायांचे अंत्यस्थ घटक त्याचे फायदे-तोटे याची काहीही कल्पना नसलेले गुंतवणूकदार सहाजिकच जवळचा मित्र, नातेवाईक वगरेंनी सुचविलेल्या पर्यायामध्ये गुंतवणूक करतात.
या सर्व पर्यायांमध्ये आयुर्विम्याची विक्री सर्वात जास्त आक्रमकतेने होत असते आणि तेच एका मोठया समस्येचे मूळ आहे. आयुर्विमा मूलत: रिस्क कव्हरसाठी, करामधील सूट हा साईट बेनिफिट आहे तरीही तो मुख्यत: याच कारणासाठी विकला जातो.
विम्याचे मूळ उद्दिष्ट आहे हे कमावत्या व्यक्तीच्या आकस्मिक मृत्युच्या संभावनेमध्ये त्या व्यक्तीवर आíथकदृष्टया अवलंबून असलेल्या कुटुंबामधील इतर सदस्यांची आíथक कुचंबणा होऊ नये, अशी आहे. त्यामुळे विमा पॉलिसी खरेदी करताना या संभावनेचा प्रामुख्याने विचार केला जाणे आवश्यक आहे. परंतु प्रत्यक्षात या वास्तविकतेकडे पूर्ण दुर्लक्ष केले जाते आणि फक्त कर वाचविण्यासाठी विमा पॉलिसी खरेदी केली जाते.
काही गुंतवणूकदार अगदी दुसऱ्या टोकाचा विचार करतात. त्यांच्यामते विमा-बीमा ‘सब बकवास’ आहे. ते विमाछत्राची पर्वाच करत नाहीत. आपत्कालीन परिस्थीमध्ये त्यांची गुंतवणूक, मित्रपरिवार, नातेवाईक वगरे आपल्या कुटुंबाला निभावून नेतील अशी त्यांची धारणा असते. हा दृष्टीकोन अतिशय घातक आहे. इतरांच्या मदतीबाबत अपेक्षा बाळगणे हे स्वागतार्ह आहे. परंतु त्यावर सर्वस्वी अवलंबून राहणे धोकादायक आहे. त्यामुळे प्रत्येक कमावत्या व्यक्तीसाठी विमाछत्र हे असायलाच हवे.
ज्या गुंतवणुकदारांना विमा छत्राच्या आवश्यकतेची जाणीव असते त्यांना एका फार मोठया वास्तविकतेला सामोरे जावे लागते. आणि ती म्हणजे त्या क्षेत्रातील अंदाधुंद ‘मिस सेलिंग’! कित्येक वष्रे हा प्रकार अविरतपणे चालू आहे. कित्येक विक्रेते विमाइच्छुकाच्या भल्याच्या पॉलिसी विकण्याऐवजी (विमा पॉलिसी ही ग्राहकाने खरेदी करायची असते परंतु प्रत्यक्षात ती विकली जाते) त्यांच्या स्वतच्या कमिशनचा विचार करून त्यानुसार योग्य अशी पॉलिसी ग्राहकाच्या गळयात बांधतात. ग्राहकालाही त्या बाबतीत अंगभूत ज्ञान नसल्याने आणि लवकरात लवकर प्राप्तिकर वाचविण्याचे काम उरकणे हा त्याचा मुख्य उद्देश असल्याने तो सहज या कारस्थानाचा बळी ठरतो. काही बाबतीत महत्त्वाच्या गोष्टी / अटी ग्राहकापासून लपविल्या जातात. ग्राहकाला आणखी एका परिस्थितीला तोंड द्यावे आणि ती म्हणजे बँक कर्मचारी. विमाछत्र विकणाऱ्या बॅकांच्या कर्मचाऱ्यांवर ‘टारगेट’ पूर्ण करण्यासाठी अनेक दबाव आणले जातात आणि त्यासाठी खातेधारकांना वेठीस धरले जाते. अशाच एका कर्मचाऱ्यावर इतका दबाव आणला गेला की, त्या कर्मचाऱ्याने शेवटी स्वत:च्याच घरच्यांच्या नावाने पॉलिसी घेऊन टारगेट पूर्ण केले. त्यामध्ये ६८ वर्षांच्या सासऱ्याच्या नावाने देण्यात आलेल्या पॉलिसीचाही समावेश आहे.
अशा परिस्थीतीत ग्राहकाने काय करावे ?
सर्वप्रथम आयुर्विमा हा कर वाचविण्यासाठीचा सर्वोत्तम पर्याय आहे ही भ्रामक कल्पना मनातून काढून टाकावी. त्यासाठी पीपीएफ, पीएफ, म्युच्युअल फंड टॅक्स सेिव्हग स्कीम, एनएससी, बँक एफडी असे अनेक किफायतशीर पर्याय बाजारात आहेत. त्यामध्ये माझ्या माहितीनुसार म्युच्युअल फंड हा एक अतिशय उपयुक्त पर्याय आहे. त्यामध्ये ठोस परतावा नसतो. परंतु त्यामधील तीन ते चार स्कीममध्ये तर सुरवातीपासून वाढ द.सा.द.शे. २४ टक्के पेक्षा जास्त आहे. एका स्कीमबाबत तर १५ वर्षांपूर्वी (पीपीएफचा कालावधी) गुंतवणूक केलेल्या १०,००० रु. च्या रकमेवर आजपर्यंत डिव्हीडंडच्या रूपात जवळपास दोन लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेचे वाटप झालेले आहे. परताव्याचा दर पडतो २१%पेक्षा जास्त आणि तोही करमुक्त.
आता करामध्ये सूट मिळविण्यासाठी करायच्या गुंतवणुकीबाबत कोणता पर्याय निवडायचा हे नक्की झाल्यानंतर प्रश्न पडतो तो वेगवेगळया पर्यायांमधील रकमेच्या वाटपाबाबत. आयुर्विमा पॉलिसीमधेही ही सूट उपलब्ध असते. त्यामुळे विमा पॉलिसी बाबत विचार नक्की करून तिच्या प्रिमियमची रक्कम हिशोबात धरणे आवश्यक आहे. ती रक्कम वजा करून बाकीची रक्कम इतर पर्यायांमध्ये गुंतवावी.
आयुर्विमा पॉलिसी निवडताना दोन गोष्टींचा विचार विचार करणे आवश्यक आहे. एक म्हणजे किती विमाछत्राची गरज आहे ? उत्तर आहे, विमा इच्छुकांची ‘ह्यूमन व्हॅल्यू.’ ही व्हॅल्यू काढण्यासाठी अनेक थिअरी आहेत. सध्याच्या वार्षकि कमाइच्या २० पट ही त्यापकी एक सरळ आणि सोपी थिअरी. त्यासाठी एचएलव्ही कॅलक्युलेटर हाही एक मार्ग आहे.
दुसरी गोष्ट म्हणजे एकदा विमाछत्राची रक्कम नक्की झाल्यावर कोणत्या प्रकारची पॉलिसी तुमचे उद्दिष्ट साध्य करते त्याचा आढावा घेणे. सर्वसाधारणपणे तीन प्रकारच्या आयुर्विमा पॉलिसी बाजारात उपलब्ध आहेत. १) प्युअर टर्म प्लान २) एन्डाऊमेन्ट प्लान आणि ३) मनी बँक प्लान.
यापकी प्युअर टर्म प्लान म्हणून जी पॉलिसी असते त्यामध्ये रिस्क कव्हर हा एकच लाभ असतो. गुंतवणूक व परतावा हा प्रकार नसतो. त्यामुळे सर्वसाधारणपणे विमाइच्छुक ही पॉलिसी घेणे टाळतात. आणि तिथेच त्यांच्या हातून अनाहूतपणे एक घोडचूक होते. खाली दिलेल्या तुलनात्मक कोष्टकाचा अभ्यास केला की त्याचा अंदाज येईल.
एन्डाऊमेंन्ट प्लानमध्ये रिस्क कव्हरही दिले जाते आणि परतावाही प्राप्त होतो. या प्रकारातील प्रत्येक पॉलिसीला कोणत्या ना कोणत्या प्रकारचे गाजर लावलेले असते. त्यामुळे सहाजिकच गुंतवणूकदार त्याकडे आकर्षिला जातो.
मनी बॅक पॉलिसीमध्ये अतिरिक्त लाभ म्हणून विमाछत्राच्या कालावधीमध्ये टप्प्याटप्प्याने पसे परत केले जातात. सोबतच्या कोष्टकामध्ये प्युअर टर्म पॉलिसीचे वार्षकि प्रिमियम पाहिले तर ते इतर दोन प्रकारच्या पॉलिसींच्या तुलनेत अगदीच क्षुल्लक आहे हयाची कल्पना येते. प्रिमियम मधील फरकांची रक्कम गुंतवणुकीच्या इतर पर्यायांमध्ये गुंतविली तर नंतर मिळणाऱ्या परताव्याची रक्कमही मोठया प्रमाणात प्राप्त होऊ शकते.
अनेक जागृत विमाइच्छुक आता प्युअर टर्म पॉलिसीचा विचार करू लागल्याने विमा कंपन्यांनी या प्रकारामध्ये एक नवीन प्रकारची पॉलिसी तयार केली आहे. सर्वसाधारपणे प्युअर टर्म पॉलिसीमध्ये विमाधारक पालिसीची टर्म तरून गेला तर त्यास काहीही मिळत नाही. आता विमा कंपन्यांनी याच प्रकाराला एक नवीन गाजर लावले आहे. त्यानुसार विमाधारक पॉलिसीची पूर्ण टर्म तरून गेला तर त्याने भरलेल्या प्रिमियमच्या हप्त्यांची संपूर्ण रक्कम त्याला परत देण्यात येणार. त्यातही मेख आहे.
उदा. ३० वर्षांच्या व्यक्तीची ५० लाखाच्या प्युअर टर्म पॉलिसीची प्रिमियमची रक्कम आहे ९७००/- रुपये आणि त्याचे व्यक्तीची प्रिमियम परताव्याच्या अटीनुसार असलेल्या पॉलिसीची प्रिमियमची रक्कम आहे ३८,४०० रुपये. त्या दुस-या पर्यायामध्ये विमाधारक टर्म तरुन गेला तर कंपनी त्याला ११,५२,००० रुपये परत देणार (३८,४०० ७३०). विमाधारक खूष. परंतु त्याने जर प्रिमियमच्या फरकाची रक्कम २८,७०० रुपये (३८,४०० वजा ९,७००) दरवर्षी गुंतवणुकीच्या सुरक्षित पर्यायामध्ये गुंतविली तर त्याला प्राप्तिकरातही सूट मिळणार आणि ३० वर्षांनी ४१ लाख रुपये प्राप्त होणार आणि तेही करमुक्त.
थोडक्यात विमा कंपनीला फक्त रिस्क कव्हरचे काम करू द्या. गुंतवणूक कुठे करायची ते माझे मी बघतो, असा दृष्टीकोन ठेवला तरच गुंतवणुकदाराचे भले आहे.
(लेखक व्यावसायिक वित्तीय नियोजनकार आहेत.)
तुलनात्मक कोष्टक
पॉलिसी विमाछत्र टर्म प्रिमियम परतावा
प्युअर टर्म ६ लाख रु. २० वष्रे रु. १,९३६ ०%
एन्डाऊमेंट ६ लाख रु. २० वष्रे रु. २८,७७३ ७%
मनी बॅक ६ लाख रु. २० वष्रे रु. ३७,६७८ ५.५%
वित्त-वेध : आयुर्विमा आणि ग्राहक
आयुर्विमा हा कर वाचविण्यासाठीचा सर्वोत्तम पर्याय आहे ही भ्रामक कल्पना ग्राहकाने मनातून काढून टाकायला हवी. करामध्ये सूट मिळविण्यासाठी करायच्या गुंतवणुकीबाबत अन्य अनेक किफायती पर्याय बाजारात निश्चितच उपलब्ध आहेत. सध्या प्राप्तिकर वाचविण्यासाठीच्या गुंतवणुकीचा सीझन टॉप गिअरमध्ये आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 28-01-2013 at 01:25 IST
Web Title: Vitt vethlife insurance and customer