सुधीर जोशी

अमेरिकी बाजारातील रोखे परताव्यातील वाढ आणि त्या परिणामी सरलेल्या सप्ताहात देशांतर्गत भांडवली बाजारात पुन्हा घसरण अनुभवायला मिळाली. सप्टेंबर महिन्यात किरकोळ महागाई दर ७.४१ टक्के असा गेल्या पाच महिन्यांतील उच्चांकी पातळीवर पोहोचला आहे. गेल्या वर्षी याच महिन्यात तो ४.३५ टक्के नोंदण्यात आला होता. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने अर्थात आयएमएफने भारताच्या विकासदराचा अंदाज आणखी खाली आणत ६.८ टक्क्यांवर आणला आहे. देशांतर्गत बाजारात परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून समभाग विक्रीचा सपाटा सुरूच आहे. बाजारावर विक्रीच्या दबावाला या सर्व बाबी कारणीभूत झाल्या. सप्ताहाच्या अखेरच्या दिवशी अमेरिकी बाजारात आलेल्या तेजीचे प्रतिबिंब देशांतर्गत भांडवली बाजारावर उमटले. ज्यामुळे आधीचे नुकसान बऱ्याच अंशी भरून निघण्यास मदत झाली. साप्ताहिक तुलनेत बाजाराच्या निर्देशांकात फारसा बदल झाला नाही.

*  टीसीएस: माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील या सलामीच्या फलंदाजाने दुसऱ्या तिमाहीच्या निकालांची दमदार सुरुवात केली. मागील वर्षांच्या तुलनेत नफ्यामध्ये ८.४ टक्के वाढ साधत कंपनीने एका तिमाहीत दहा हजार कोटींच्या नफ्याचा मैलाचा दगड पार केला. कामगार गळतीचे प्रमाण जरी वाढले असले तरी येत्या काही महिन्यांत ते कमी होण्याचा कंपनीच्या व्यवस्थापकांना विश्वास आहे. सध्या मंदीच्या वाऱ्यामुळे कंपन्यांच्या खर्चात वाढ होत असली तरीही टीसीएससारखी बलाढय़ कंपनी नक्कीच तग धरेल.

*  इन्फोसिस: टीसीएसपाठोपाठ माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील दुसरी मोठी कंपनी असलेल्या इन्फोसिसनेदेखील चांगले निकाल जाहीर केले. मागील वर्षांच्या तुलनेत नफ्यामध्ये ११.३ टक्के वाढ झाली. कंपनीने प्रत्येकी १८५० रुपये या मर्यादेपर्यंत समभागांची पुनर्खरेदी व साडे सोळा टक्क्यांचा अंतरिम लाभांशाचे केलेल्या वाटपाचे गुंतवणूकदारांनी जोरदार स्वागत केले. चालू आर्थिक वर्षांसाठी १५ ते १६ टक्के वाढीचा अंदाज आणि समभागांच्या पुनर्खरेदीचा निर्णय कंपनीच्या समभागांमधील ऊर्जा टिकवून ठेवेल.

*  टाटा कन्झ्युमर कंपनी: पूर्वाश्रमीची टाटा ग्लोबल असलेल्या टाटा कन्झ्युमर कंपनीने सरलेल्या आर्थिक वर्षांत विक्रीमध्ये सात टक्के वाढ नोंदवून ती १२,४२५ कोटी रुपयांवर नेली तर नफ्यात ८ टक्के वाढीसह १,०७८ कोटींवर पोहोचला आहे. चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाहीतही विक्री आणि नफ्यात प्रत्येकी १० टक्के वाढ झाली आहे. कंपनी संपन्न, सोलफुल आणि इतर काही यशस्वी नाममुद्रांखाली तयार सेवन सिद्ध पदार्थाची बाजारपेठ काबीज करीत आहे. टाटा समूहाच्या नवीन धोरणांचा कंपनीला फायदा होतो आहे. यामध्ये कंपनीच्या मुख्य व्यवसायाची व्याख्या आणि त्याला अनुसरून उत्पादनांचा विस्तार, नाविन्यता, पुरवठा साखळीचे डिजिटायझेशन, आरोग्यवर्धक व उत्तम गुणवत्तेच्या उत्पादनांवर भर अशा बाबींचा समावेश आहे. सध्या कंपनीच्या समभागाची ७६० रुपयांची पातळी गुंतवणूकीसाठी योग्य वाटते.

* वरुण बेव्हरेजेस्: ही तयार शीतपेये बनविणारी एक प्रमुख उत्पादक कंपनी असून पेप्सिको या कंपनीचे भारतामधील उत्पादन व वितरणाचे हक्क याच कंपनीकडे आहेत. तसेच नेपाळ, श्रीलंका, मोरोक्को आणि झिंबाब्वेमधील उत्पादन व वितरणाचे हक्कदेखील कंपनीकडे आहेत. कंपनीचे कारखाने ९० टक्के क्षमतेने कार्यरत आहेत. बिहार आणि जम्मूमध्ये कंपनीचे दोन नवे उत्पादन प्रकल्प उभारले जात आहेत. इतर राज्यातही प्रकल्पांची क्षमता वाढवली जात आहे. यामुळे कंपनीला व्यवासायात पुढील वर्षांत २,६०० कोटींची भर घालता येणार आहे. करोनाकाळ संपल्यामुळे गेल्या तिमाहीत कंपनीच्या उत्पन्नात १०२ टक्के वाढ झाली होती. मात्र कच्च्या मालाच्या वाढलेल्या किमतींमुळे नफ्यावर परिणाम झाला होता. त्यामधून आता दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कंपनीच्या समभागांचा आलेख कायम चढता राहिला आहे. त्यामुळे सध्या झालेल्या समभागातील घसरणीची संधी साधून १,००० रुपयांच्या पातळीला गुंतवणूक करता येईल.

*  केपीआर मिल्स: ही कंपनी तयार कपडय़ांची उत्पादक व निर्यातदार आहे. सुती धाग्यांपासून तयार कपडय़ांच्या निर्मितीपर्यंत सर्व पायऱ्या कंपनीच्या आधिपत्याखाली आहेत. सुती वस्त्रांखेरीज कंपनीचे साखर, इथेनॉल तयार करण्याचे कारखाने आहेत. चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाहीत कंपनीच्या विक्रीमध्ये ७५ टक्के वाढ होऊन ती १,५८५ कोटी रूपये झाली तर नफ्यामध्ये ३५ टक्के वाढ साधली. तयार कपडय़ांचा २५० कोटींचा तर इथेनॉलचा ५०० कोटींचा असे दोन प्रकल्प पुढील वर्षांत मार्गी लागणार आहेत. सध्याचा ५६० रुपयांच्या आसपासचा समभागाचा भाव खरेदीसाठी योग्य आहे.

भारतातील महागाई निर्देशांकाबरोबर (७.४ टक्के) अमेरिकेचा महागाई निर्देशांकही (८.२ टक्के) कमी होण्याची लक्षणे नाहीत. त्या बरोबरीने भारतातील औद्योगिक उत्पादनातील घसरणीने चिंता अधिक वाढवली आहे. सर्व देशांचे महागाई रोखण्याचे उपाय कमी पडत आहेत. त्यामुळे मंदीचे सावट आणखी गहिरे बनत चालले आहे. अमेरिकी आणि भारताच्या मध्यवर्ती बँकांकडून पुढील महिन्यांत आणखी व्याजदर केली जाण्याची शक्यता बळावली आहे. मात्र  बाजाराने या शक्यता काही अंशी गृहीत धरल्या आहेत. परिणामी बाजारात मंदीची लाट टिकत नाहीत तसेच तेजीचे वारेही फार काळ वाहत नाहीत. आणखी काही महिने बाजार असाच दोलायमान राहण्याची चिन्हे आहेत. त्याचा फायदा अल्पावधीची खरेदी-विक्री करणाऱ्यांना होईल. पण दीर्घ मुदतीसाठी खरेदी करणाऱ्यांना फायदेशीर गुंतवणुकीच्या संधी जरूर मिळतील.

sudhirjoshi23@gmail.com

Story img Loader