आशीष ठाकूर
निफ्टी निर्देशांकाच्या घोडदौडीला १७,८०० ते १७,९०० स्तराचा अडथळा असेल असे मागील लेखात नमूद केलेले होते. सरलेल्या सप्ताहातील शुक्रवारी हे प्रत्यक्षात घडलेदेखील! तेव्हा निफ्टी निर्देशांकावर १५,१८३ पासून चालू झालेल्या तेजीला आता पूर्णविराम मिळणार की स्वल्पविराम? या स्वल्पविरामाचे स्वरूप हलकीफुलकी घसरण होऊन पुन्हा तेजीच्या घोडदौडीत दिसून येईल काय? हा आज सर्वाना पडलेला प्रश्न आहे. याचे विस्तृत उत्तर जाणून घेण्याअगोदर निर्देशांकाचा साप्ताहिक बंद जाणून घेऊया.
अवघ्या दोन महिन्यांत निफ्टी निर्देशांकावर २,८०० अंशांची वाढ झाली. त्यामुळे सरलेल्या सप्ताहातील शुक्रवारची घसरण ही तेजीच्या वाटचालीला पूर्णविराम देणारी की तेजीच्या वाटचालीतील तो केवळ स्वल्पविराम असून, या घसरणीनंतर पुन्हा तेजीची घोडदौड सुरू होईल याबाबत संभ्रमावस्था आहे. या विषयावर विस्तृत चर्चा करत निफ्टी निर्देशांकाच्या भविष्यकालीन वाटचालीचे आलेखन करूया.
शुक्रवारचा बंद भाव :
सेन्सेक्स : ५९,६४६.१५
निफ्टी : १७,७५८.४५
येणाऱ्या दिवसांत निफ्टी निर्देशांकाने आता चालू असलेल्या घसरणीत १७,५०० चा स्तर राखायला हवा. या स्तरावर कालानुरूप पायाभरणी केल्यास, निफ्टी निर्देशांकाचे वरचे लक्ष्य १८,१०० असेल. भविष्यात निफ्टी निर्देशांकाने १७,५०० ते १८,१०० च्या स्तरादरम्यान संथ गतीने पायाभरणी केल्यास, या २,८०० अंशांच्या तेजीच्या वाटचालीतील ही घसरण स्वल्पविराम ठरेल आणि निफ्टी निर्देशांकाचे वरचे लक्ष्य १८,६०० ते १९,२०० असे असेल. ही नाण्याची एक बाजू झाली.
निफ्टीला गुंतवणूकदारांची फिरकी घेण्याची, गाफील क्षणी ‘कात्रजचा घाट’ दाखवण्याची सवय, हे डोळय़ासमोर ठेवून गत अनुभवाचा अभ्यास करता ‘निफ्टीचे ठाऊक असलेले सारे बहाणे’ आज आपण तपासून बघूया.
या स्तंभातील पूर्वीच्या लेखातील काळाच्या कसोटीवर उतरलेल्या घटनांवर प्रकाशझोत टाकल्यास..
१) ‘डो संकल्पने’चा एक वर्षांचा कालावधी
२) उतरत्या भाजणीतील उच्चांक व नीचांकाची आलेखावरील रचना (लोअर टॉप लोअर बॉटम आलेखावरील रचना)
३) निफ्टी निर्देशांकावरील १७,२०० या स्तराची महती.
वरील तिन्ही मुद्दय़ांचा एकत्रित विचार करता.. ‘डो संकल्पने’चा आधार घेता एखादी धारणा (तेजी अथवा मंदीची) विकसित झाली की, ती किमान एक वर्ष चालते. मंदीची धारणा विकसित झाली असेल तर ती एक वर्ष चलत आलेखावर उतरत्या भाजणीतील उच्चांक व नीचांकाची आलेखावर रचना तयार होते. आता १९ ऑक्टोबर २०२१ ला निफ्टी निर्देशांकावर १८,६०४ चा उच्चांक मारत निफ्टी निर्देशांकावर घसरण सुरू झाली. या प्रक्रियेत उतरत्या भाजणीतील उच्चांक हा १८ जानेवारीला १८,३५० असा २५४ अंशांच्या (१८,६०४ उणे १८,३५०) उतरत्या भाजणीतील उच्चांक झाला. त्यानंतर ४ एप्रिलला १८,११४ असा २३६ अंशांचा (१८,३५० उणे १८,११४) उतरत्या भाजणीतील उच्चांक झाला. आता हाच दुवा पकडत भविष्यकालीन उच्चांक रेखाटायचा असेल तर अगोदरच्या उच्चांकापासून २३० ते २५० अंशांच्या उतरत्या भाजणीतील उच्चांक होत आहे. आताच्या घडीला भविष्यकालीन उच्चांक रेखाटण्यासाठी आपण १८ एप्रिलच्या १८,११४ च्या उच्चांकापासून २३० अंश वजा करता १७,८८४ हा संभावित उच्चांक दृष्टीपथात येतो. हे गृहीत धरून मागील दोन लेखांत, निफ्टी निर्देशांकाचे वरचे लक्ष्य हे १७,८०० ते १७,९०० असेल असा उल्लेख असायचा. अशा वेळेला अत्यल्प मुदतीच्या गुंतवणूकदारांनी (शॉर्ट टर्म ट्रेडर) निफ्टी निर्देशांकाच्या प्रत्येक वाढीव टप्प्यावर, समभागांची नफारूपी विक्री करून मुद्दल आणि नफा सुरक्षित करावा, असेही त्या लेखांमधून सूचित केलेले होते. सरलेल्या सप्ताहातील शुक्रवारी निफ्टी निर्देशांकाने दिवसांतर्गत १७,९९२ चा उच्चांक नोंदवत १७,७५८ चा साप्ताहिक बंद दिला आहे. ही संभाव्य उच्चांकाची मांडणी हातात असल्यावर ती काळाच्या कसोटीवर उतरली पाहिजे.
ही संकल्पना समजून घेण्यासाठी अतिवेगवान ट्रेनचे उदाहरण घेऊया. एखाद्या प्रवाशाने संकटसमयी साखळी ओढल्यास ट्रेन त्वरित न थांबता पुढे काही अंतरावर जाऊन थांबते. तसेच काहीसे अतिजलद तेजीचे आहे. त्यात ‘बाजाराचे पोशिंदे’(परदेशी गुंतवणूकदार संस्था) यांनी आता खरेदीला सुरुवात केली आहे. अशा वेळेला आपले उच्चांकाचे गणित चुकू नये म्हणून या घसरणीत निफ्टी निर्देशांकाने १७,५०० चा स्तर राखत पुढील सुधारणेत निफ्टी निर्देशांकांने १७,८८४ चा उच्चांक पार करायला हवा. त्यापुढे १८,१०० च्या स्तरावर पाच दिवस टिकल्यास आता चालू असलेल्या तेजीला ही घसरण स्वल्पविराम असेल आणि भविष्यात १८,६०० चे वरचे लक्ष्य साध्य होईल. अन्यथा निफ्टी निर्देशांक १७,८८४ चा स्तर पार करण्यास अपयशी, त्याचबरोबर १७,५०० चा स्तर राखण्यासही अपयशी ठरल्यास निफ्टी निर्देशांकावर १७,२०० ते १७,००० या पातळीची मानसिक तयारी ठेवावी.
(क्रमश:)
लेखक भांडवली बाजार विश्लेषक
ashishthakur1966@gmail.com
अस्वीकृती : शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’, इच्छित उद्दिष्ट या संकल्पनाचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.