‘क्रेडिट रिपोर्ट’ आणि ‘क्रेडिट स्कोअर’ यावर यापूर्वी या स्तंभातून लिहिले आहे. पण वाचकांच्या पत्र व्यवहारातून एक गोष्ट विशेष जाणवली की, बऱ्याच मंडळींना अजूनही ‘क्रेडिट रिपोर्ट’ आणि ‘क्रेडिट स्कोअर’ याबाबत फारशी माहिती नाही. ‘क्रेडिट रिपोर्ट’मध्ये नक्की काय असते आणि तो कुठे मिळतो हेच आज जाणून घेऊया.
सोप्या शब्दात सांगायचे तर ‘क्रेडिट रिपोर्ट’ म्हणजे तुमचे कर्जाचे प्रगती पुस्तक. तुम्ही किती कर्जे घेतली आहेत व त्या कर्जाची परतफेड कशी सुरू आहे याचा अहवाल म्हणजे

  ‘क्रेडिट रिपोर्ट’. ‘क्रेडिट रिपोर्ट’ बनविण्याचे काम ‘क्रेडिट ब्युरो’ करतात. भारतात आजमितीस सिबिल, एक्स्पेरियन, इक्वीफक्स आणि हाय मार्क असे चार ब्युरो आहेत.  
बँका कर्ज दिल्यावर आपल्या सर्व कर्जदारांची माहिती ‘क्रेडिट ब्युरो’ला देतात. मग ‘क्रेडिट ब्युरो’ या माहितेचे संकलन करून प्रत्येक कर्जदाराच्या नावे असलेल्या सर्व कर्जाची माहिती एकत्र करून ‘क्रेडिट रिपोर्ट’ तयार करतात. ‘सिबिल’च्या संकेतस्थळावर पसे भरून आपण ‘क्रेडिट रिपोर्ट’ बघू शकतो. इतरही ‘क्रेडिट ब्युरो’ आता ‘क्रेडिट रिपोर्ट’ देऊ करित आहेत. आता ‘क्रेडिट रिपोर्ट’मध्ये काय असते ते पाहू.
‘क्रेडिट रिपोर्ट’मध्ये कर्ज घेणाऱ्याची प्राथमिक माहिती असते. तुमचे नाव, िलग, पॅन कार्ड क्रमांक, पत्ता, दूरध्वनी क्रमांक इत्यादी माहिती नोंदवलेली असते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचा ‘क्रेडिट स्कोअर’देखील दिलेला असतो. तुम्ही घेतलेल्या प्रत्येक कर्जाची माहिती यात दिली जाते. त्यामध्ये गृह कर्ज, वाहन कर्ज, शैक्षणिक कर्ज या व अशा इतर कर्जाबरोबर ‘क्रेडिट कार्डा’ची माहितीदेखील दिली जाते. तुम्ही कर्ज घेण्यासाठी अर्ज केला असेल पण कर्ज घेतले नसेल तर त्याचीही नोंद यात केली जाते. यापूर्वी घेतलेली आणि पूर्ण परतफेड केलेल्या कर्जाची माहितीदेखील यात दिली जाते. प्रत्येक कर्जाचा  प्रकार, कर्जाची रक्कम, परतफेडीची माहिती या ‘क्रेडिट रिपोर्ट’मध्ये दिली जाते. एखादे कर्ज तुम्ही फेडले नसेल तर तेही नमूद केले जाते. काही वेळा बँकांशी कर्जावरून वाद झाले असतील व अशी कर्जखाती बंद करण्यात आली असतील तर अशा कर्जखात्यांसमोर ‘सेटल्ड’ असा नकारात्मक शेराही मारलेला असतो. सध्या चालू असलेल्या कर्जाच्या बाबतीत किती कर्ज फेडणे अद्याप शिल्लक आहे तेदेखील यात सांगितलेले असते. मागील ३६ महिन्याचा परतफेडीचा इतिहास प्रत्येक कर्जाच्या बाबतीत सांगितला जातो. क्रेडिट कार्डाची माहितीदेखील यात व्यवस्थित दिली जाते. प्रत्येक क्रेडिट कार्डांची क्रेडिट मर्यादा आणि कॅश मर्यादा नमूद केली जाते. क्रेडिट कार्डाचे हप्ते व कर्जाचे हप्ते वेळेत भरले जातात का ही बाबही ३६ महिन्यांच्या परतफेडीच्या इतिहासाकडे बघून कळते. थोडक्यात सांगायचे तर कर्ज घेतल्यावर त्या कर्ज खात्यात जे जे काही घडू शकते त्यापकी बहुतांश माहिती या ‘क्रेडिट रिपोर्ट’मध्ये दिली जाते.
बँका कर्ज देत असताना तुमचा ‘क्रेडिट रिपोर्ट’ पाहतात. विमा कंपन्या, टेलिफोन कंपन्या, स्टॉक ब्रोकर, कमॉडिटी ब्रोकर, क्रेडिट रेटिंग एजन्सी, सेबी, इर्डादेखील तुमचा ‘क्रेडिट रिपोर्ट’ बघू शकतात. अलीकडे काही बँकांनी नवीन कर्मचारीभरती करतानाही कर्मचाऱ्यांचा ‘क्रेडिट रिपोर्ट’ बघितल्याचे वृत्त आहे. थोडक्यात सांगायचे तर तुमचा ‘क्रेडिट रिपोर्ट’ आता तुमच्या आíथक भरभराटीचा पासपोर्ट ठरू शकतो. चांगला ‘क्रेडिट रिपोर्ट’ म्हणजे तुमच्यासाठी पायघडय़ा ठरेल तर वाईट ‘क्रेडिट रिपोर्ट’ तुमच्या समोर अनेक अडथळे आणेल. साधारणत: ७५० पेक्षा जास्त ‘क्रेडिट स्कोअर’ चांगला समजला जातो. चांगला ‘क्रेडिट स्कोअर’ कसा मिळवावा व तो कसा जपावा हे पुन्हा केव्हा तरी..   

राजीव राज rajiv.raj@creditvidya.com

(लेखक आर्थिक साक्षरतेसाठी कार्यरत ‘क्रेडिटविद्या डॉट कॉम’चे संस्थापक-संचालक आहेत)