काळोखाची रजनी होती
हृदयी भरल्या होत्या खंती
अंधारातचि गढले सारे
लक्ष्य, न लक्षी वरचे तारे
विमनस्कपणे स्वपदे उचलित,
रस्त्यातुन मी होतो हिंडत,
एका खिडकीतुनि सूर तदा
पडले.. दिड दा, दिड दा, दिड दा..
जड हृदयी जग जड हे याचा,
प्रत्यय होता प्रगटत साचा
जड ते खोटे हे मात्र कसें
ते न कळे, मज जडलेच पिसे
काय करावे, कोठे जावे,
नुमजे मजला की विष खावे
मग मज कैसे रुचतील वदा
ध्वनि ते.. दिड दा, दिड दा, दिड दा ..
-सतारीचे बोल (केशवसुत)
आज चत्र नवरात्रातील लक्ष्मी पंचमी असून गुढीपाडव्या पासून ‘विजय नाम संवत्सरास’ प्रारंभ झाला आहे; परंतु ‘लक्ष्मी विजय’ दृष्टीपथास पडेल अशी स्थिती अजिबात नाही म्हणून आजची सुरुवात कवी केशवसुत यांच्या ‘सतारीचे बोल’ या कवितेने.
गेल्या सोमवारी भारताच्या अर्थव्यवस्थेची सध्याची स्थिती व त्याची कारणे यांची सखोल मीमांसा केली. अपेक्षेप्रमाणे ‘सेन्सेक्स’ने त्या आठवडय़ात मंगळवारी १८,२०६.६१ चा तळ गाठल्यानंतर शुक्रवारी १८२४२.५६ वर तो बंद झाला. सध्याच्या आíथक पाश्र्वभूमीवर भविष्यात काय घडू शकते याचा थोडक्यात आढावा घेऊ.
मागील आठवडय़ातील विवेचन प्रसिद्ध झाल्यानंतर गेल्या आíथक वर्षांतील प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कर संकलन अपेक्षेहून अधिक झाल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या. २०१४ च्या अर्थसंकल्पात २०१३ हे करसंकलनाचे उद्दिष्ट ४.६ लाख कोटी अपेक्षित धरले होते. हे उद्दिष्ट ओलांडल्याचे अर्थ मंत्रालयातील महासून सचिव सुमीत बोस यांचे वक्तव्य प्रसिद्ध झाले. ओलांडलेले कर संकलनाचे उद्दिष्ट, मार्चच्या पहिल्या आठवडय़ापासून कमी होत असलेले कच्च्या तेलाचे भाव व डिझेलच्या किंमतीत केलेली रु. १.४५ ही वाढ व अर्थसंकल्पात सोन्याच्या आयातीवर वाढलेला कर व त्यामुळे सोन्याच्या आयातीत मागील महिन्यात झालेली कपात याचा परिणाम चौथ्या तिमाहीची वित्तीय तूट अर्थसंकल्पातील अंदाजित तुटीच्या जवळपास (५.१%) असायला हरकत नाही. तर आíथक वर्ष २०१४ ची तूट ४.२% असेल.
मागील सोमवारी अर्थमंत्री मुंबईत येऊन गेले. या भेटीत व्यापारी बँकांचे प्रमुख व उद्योग व्यवसायातील महत्त्वाच्या व्यक्ती यांच्याबरोबर दोन स्वतंत्र्य बठका झाल्या. अशीच बठक ते चेन्नई इथे घेणार आहेत. वेगवेगळ्या मंजूरीच्या गाळात रुतलेल्या प्रकल्पांना चालना देण्याचे मान्य करून पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील गुंतवणूक विषयक मंत्रिमंडळ समिती निर्णय घेऊन प्रकल्पांच्या मार्गातील अडथळे दूर करेल, असे त्यांनी सांगितले. परंतु या अडचणी मंत्रिमंडळातील जयराम रमेश यांच्यासारख्या खोडसाळ मंत्र्यांमुळेच व कोळसा खाणी वाटपात झालेल्या गोंधळामुळे निर्माण झाल्या. यावर पंतप्रधानांनी त्यावेळीच लगाम घालायला हवा होता. पर्यावरणाच्या मुद्यावरून खाणी बंद करण्याच्या नोटीसा पर्यावरण मंत्रालयाने पाठवल्या तेव्हा उद्योगक्षेत्राचा कंठघोष मौनी पंतप्रधानांनी ऐकून न ऐकल्यासारखा केला. यावेळी अर्थमंत्र्यांच्या प्रयत्नाला यश आले तर आíथक वर्ष २०१४ च्या उत्तरार्धात अर्थव्यवस्था ४.५-५% दरम्यान वाढण्याची शक्यता दिसते.
औद्योगिक उत्पादन निर्देशांक
आठवडय़ाच्या शेवटच्या दिवशी इन्फोसिसचे अपेक्षाभंग करणारे निकाल आणि फेब्रुवारीच्या औद्योगिक उत्पादन निर्देशांक एकाच दिवशी जाहीर होणे मंदीवाल्यांच्या कुंडलीत मणिकांचन योग ठरले. फेब्रुवारी महिन्यात औद्योगिक उत्पादन मागील वर्षांच्या फेब्रुवारी (४.३०%) महिन्याच्या तुलनेत ०.६% वाढले. ही वाढ उत्साहजनक नसली तरी आधीच्या महिन्याच्या नकारात्मक पाश्र्वभूमीच्या तुलनेत बरी म्हणायला हवी. विद्युत उपकरणे, केबल, अल्युमिनियम कंडक्टर, (वीज वाहक मनोऱ्यावरील तारा), जनरेटर, ऑल्टरनेटर, यांचे उत्पादन वाढणे चांगले लक्षण म्हणावे लागेल. कारण या सर्व वस्तू वीजनिर्मीती संच व तत्सम उद्योगात वापरल्या जातात.
केंद्रीय सांख्यकी संस्था ही दर महिन्याला मागील महिन्याचे आकडे व पुढील महिन्याचा अंदाज (Quick Estimators) वर्तवत असते. या अंदाजनुसार आíथक वर्ष २०१३ मध्ये औद्योगिक उत्पादन २% वाढणे अपेक्षित आहे. मार्च महिन्यात सर्व उद्योग मिळून १.२%, उत्पादित वस्तू १.५% तर वीज निर्मिती ७% वाढली आणि खनिज उत्पादनातील घट २% पर्यंत सिमित राहिली. एकूण वर्ष बरे गेले असे म्हणता येईल.
आज अर्थव्यस्थेला मुख्य तीन धोके दिसत आहेत. पहिला म्हणजे भारताच्या पतमापनात एखाद्या पतमापन संस्थेकडून कपात, राजकीय उलाथापालथ होऊन सरकार कोसळणे, तेलाचे भाव वाढणे. सध्या मेच्या ‘ब्रेंट क्रूड ऑईल फ्युचर’चा भाव न्यूमँक्सवर १०५ डॉलर/पिंप आहे. जर १०० डॉलर (अधिक उणे पाच डॉलर) व डॉलर बरोबरचा विनिमय दर सध्याच्या म्हणजे ५५ रुपयाच्या जवळपास राहिला तर उत्तम. जर युरोप, अमेरिकेची अर्थव्यवस्था सुधारली तरच मागणी वाढून तेलाचे भाव वाढू शकतील. संसदेचे हे अधिवेशन सुखरूप पार पडेल असे वाटते. सर्वात जास्त धोका संभवतो तो म्हणजे पत कपातीचा. मूडीज् व फिच या दोन पतमापन संस्था पतकपात होण्याच्या शक्यतेचा पुनरुच्चार करत आहेत. भारताच्या पत मापनात झालेले बदल दर्शवणारे कोष्टक सोबत जोडलेले आहे.
यापुढील बाजाराची वाटचाल पुढील घटकांवर अवलंबून राहील. कंपन्यांचे निकाल आता या महिन्यात जाहीर होत आहेतच. ३ मे रोजी रिझव्र्ह बँक पतधोरणात दर कपात, रोख राखीव प्रमाणात कपात करेल का? डॉलरशी विनिमय दर ५३-५५ दरम्यान राहणे, हवामान खात्याचा पावसाचा अंदाज, कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकींचे निकाल.
अर्थव्यवस्थेविषयक इतके विवेचन केल्यानंतर पुढे काय करावे, असा प्रश्न पडणे साहजिक आहे. पुढचा रस्ता दिसत नाही तेव्हा तेव्हा आजच्या घडीला कुंपणावर बसणे कधीही चांगले.
कंपन्यांचे निकाल चालू महिन्यात काही बरे, अधिकांश वाईट जाहीर होत राहतील. पुढे ३ मे रोजी रिझव्र्ह बँक पतधोरणात दर कपात, रोख राखीव प्रमाणात कपात करेल का? डॉलरशी विनिमय दर ५३-५५ दरम्यान राहील काय? हवामान खात्याचा पावसाचा अंदाज, कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकांचे निकाल.. वगैरे घटक यापुढील बाजाराची दिशा ठरवतील. आकडय़ांमधून अर्थव्यवस्थेविषयक सुस्पष्ट संकेत नाहीत.. पुढचा रस्ता दिसत नाही.. तेव्हा तेव्हा आजच्या घडीला कुंपणावर बसणे कधीही चांगले.
औद्योगिक उत्पादन निर्देशांक वाढ/घट (%)
निर्देशांकाचे एप्रिल-फेब्रु. एप्रिल-फेब्रु.
घटक २०१२ २०१३
सर्व उद्योग ३.५ ०.९
खनिज उत्पादन -२.१ -२.५
उत्पादित वस्तू ३.७ १.०
वीजनिर्मिती ८.७ ४.०
‘फिच’ या पतमापन कंपनीने भारताच्या पतमापनात वेळोवेळी केलेले बदल
परदेशी चलनातील पत स्थानिक चलनातील पत
तारीख दीर्घकालीन अल्पमुदतीची दृष्टीकोन दीर्घकालीन अल्पमुदतीची
पत पत पत पत
१८ जून १२ ट्रिपल बी मायनस एफ थ्री नकारात्मक ट्रिपल बी मायनस नकारात्मक
१४ जून १० ट्रिपल बी मायनस एफ थ्री स्थिर ट्रिपल बी मायनस स्थिर
१५ जून ०८ ट्रिपल बी मायनस एफ थ्री स्थिर ट्रिपल बी मायनस नकारात्मक
१ऑगस्ट ०६ ट्रिपल बी मायनस एफ थ्री स्थिर ट्रिपल बी मायनस स्थिर
२१ जानेवारी ०४ डबल बी प्लस बी स्थिर डबल बी प्लस स्थिर
२२ नोव्हे. ०१ डबल बी बी स्थिर डबल बी प्लस स्थिर