भक्ती रसाळ bhakteerasal@gmail.com
महिला आर्थिक व्यवस्थापनाविषयी दिवसेंदिवस जागरूक होत आहेत. परिणामी महिला गुंतवणूकदारांची संख्या तीन पटींनी वाढली असून एकूण २२० लाख गुंतवणूकदारांपैकी ६० लाख गुंतवणूकदार ‘महिला’ आहेत. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे या महिलांपैकी ३० टक्के महिला वय वर्षे २५ ते ४० वयोगटातील आहेत. २०२२ साली जर एकूण गुंतवणूकदारांपैकी एक चतुर्थांश हिस्सा जर महिला वर्गाचा आहे, तर येणाऱ्या काळात महिला वर्ग फार वेगाने संपत्ती निर्माण करेल.
गेल्या आठवडय़ात जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर ‘कॅम्स – आरटीए’द्वारे महिला गुंतवणूकदारांकडून म्युच्युअल फंडात होणाऱ्या गुंतवणुकीविषयी एक अहवाल प्रसिद्ध झाला. महिलांचा म्युच्युअल फंडांद्वारे ‘व्यक्तिगत’ आर्थिक नियोजन करण्याचा कल वेगाने वाढत आहे, असा या अहवालाचा निष्कर्ष आहे.
गेल्या पाच वर्षांचा कॅम्सकडील उपलब्ध माहितीतून, म्युच्युअल फंडांद्वारे गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांचा अभ्यास केला असता, जाणवलेल्या काही ठळक बदलांचा उल्लेख करावाच लागेल. महिला गुंतवणूकदारांची संख्या तीन पटींनी वाढली आहे. एकूण २२० लाख गुंतवणूकदारांपैकी ६० लाख गुंतवणूकदार ‘महिला’ आहेत. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे या महिलांपैकी ३० टक्के महिला वय वर्षे २५ ते ४० वयोगटातील आहेत. २०२२ साली जर एकूण गुंतवणूकदारांपैकी एक चतुर्थांश हिस्सा जर महिला वर्गाचा आहे, तर येणाऱ्या काळात हा वर्ग फार वेगाने आणि जबाबदारी संपत्ती निर्माण करणार आहे, यात शंका नाही.
गेल्या पाच वर्षांत आर्थिकदृष्टय़ा स्वयंपूर्ण तसेच कुटुंबाचा मासिक जमाखर्च पाहणारा महिला वर्ग आर्थिक निर्णयप्रक्रियेत खंबीर भूमिका बजावत आहे, असा सकारात्मक बदल झाला आहे. पिढय़ा न् पिढय़ा महिला वर्गाची भूमिका ही यशस्वी बचत करणारी आणि कुटुंबाची आपत्कालीन बचाव यंत्रणा अशी राहिली आहे. परंतु गुंतवणूक आणि कौटुंबिक – व्यक्तिगत संपत्ती निर्माण करताना स्त्रियांना भूमिका नसते, कैकप्रसंगी त्याच उदासीन किंवा मागे मागेच राहत असल्याचे दिसत होते. काळाच्या गरजेनुसार तसेच सहज उपलब्ध असलेल्या आर्थिक माहितीच्या आधारे ‘स्त्री’ आज खुल्या दिलाने गुंतवणूक करू लागली आहे, हेच वास्तव म्युच्युअल फंडातील त्यांच्या वाढत्या भागीदारीतून समोर आले आहे.
कुटुंबाची आर्थिक गणिते मांडताना कुटुंबप्रमुखाला घरातील ‘स्त्री’साठी स्वतंत्र योजना असणे गरजेचे आहे हेदेखील आता पटले आहे. कुटुंबाच्या आर्थिक उद्दिष्टांचा विचार करताना जोडीदाराच्या निवृत्त जीवनाचा, आरोग्य आणीबाणीचा विचार करणे क्रमप्राप्त आहे. जर या घटकाची नियोजनात समर्पक दखल घेतली गेली नाही तर निवृत्त जीवनात, उतारवयात मोठय़ा आर्थिक विवंचनेला तोंड द्यावे लागू शकते.
स्त्री गुंतवणूकदारांचा एक व्यक्ती म्हणून स्वतंत्र विचार करावा लागतो. स्त्रिया समाजातील दुर्बल घटक आहेत किंवा आर्थिकदृष्टय़ा वंचित आहेत असा सामाजिक विचार गुंतवणूक क्षेत्रात केला जाऊ नये. कारण गुंतवणूक करताना ‘तटस्थपणे’ विचार करावा लागतो. स्त्रियांचा गुंतवणूक क्षेत्रातील हिस्सा वाढण्याची कारणे वस्तुनिष्ठ आणि काळानुरूप बदलली आहेत. कुटुंबाच्या सर्वागीण आर्थिक प्रगतीकरिता स्त्री आणि पुरुष दोघांनीही पुढील बाबींचा सखोल विचार करणे गरजेचे आहे
1) स्त्रियांचे आयुर्मान :
गेल्या काही दशकांपासून स्त्रियांचे आयुर्मान वाढत आहे. जोडीदारापश्चात किमान दहा वर्षे व अधिक काळ स्त्रिया जगत असल्याचे आढळून येते. त्यामुळे स्त्रियांचे निवृत्त जीवनाचे वेगळे नियोजन करणे क्रमप्राप्त ठरते. जोडीदाराच्या पश्चात स्त्रियांचे आर्थिक जीवन स्वयंपूर्ण असणे काळाची गरज आहे. विभक्त कुटुंब पद्धतीमुळे हा प्रश्न गंभीर बनला आहे. वैद्यकीय क्षेत्रातील प्रगतीमुळे, राहणीमान उंचावल्यामुळे आयुर्मान वाढतच राहणार आहे. वैद्यकीय चलनवाढ, जीवनशैलीतील बदल व त्यावरील खर्चातील चलनवाढ आणि वाढते आयुर्मान या बाबींवर कोणताही उपाय नाही. त्यामुळे निवृत्त जीवनात कोणतेही मासिक उत्पन्न नसतानाही आर्थिकदृष्टय़ा स्वतंत्र व काहीसे स्वावलंबी राहणे हे केवळ दीर्घकालीन आर्थिक नियोजनाने शक्य आहे.
2) स्त्रियांशी निगडित आजारांचे वाढते प्रमाण :
स्त्रियांचे आयुर्मान वाढत आहे, परंतु वाढलेले आयुर्मान निरोगी असेलच याची शाश्वती नाही. स्त्रियांना आरोग्याच्या समस्यांना तोंड देत दीर्घायुष्य काढावे लागत आहे, हे विदारक सत्य आहे. स्तनाचा कर्करोग, गर्भाशयाशी निगडित आजार, हाडांशी निगडित तक्रारी, स्थूलपणामुळे निर्माण होणारे विकार, हृदयरोग अशा व्याधीचे प्रमाण वेगाने वाढत आहे. केवळ कर्करोगाचा विचार केला तर प्रत्येक दहा रुग्णांपाठी एक रुग्ण महिला आहे. दरवर्षी ही रुग्णसंख्या १२ टक्क्यांनी वाढत आहे. आरोग्य आणीबाणीत कुटुंबाची बव्हंशी गुंतवणूक खर्ची पडते. महिला जर कमावती नसेल तर तिच्या आजारपणासाठी तरतूद म्हणून ‘स्वतंत्र’ नियोजनाअभावी संपूर्ण कुटुंब आर्थिक विवंचनेत पडू शकते.
3) प्रसूतीनंतरचा विश्रांतीकाळ
तरुण सुशिक्षित, अर्थाजन करणाऱ्या महिला वर्गाच्या जीवनातील प्रसूतीनंतरचा काळ हा आव्हानात्मक असतो. किमान सहा महिने ते २४ महिन्यांपर्यंत वाढीव खर्च, सक्तीची रजा, आर्थिकदृष्टय़ा ओढाताण या स्थित्यंतरात उद्भवते. बऱ्याचदा महिला वर्ग नवीन कौटुंबिक भूमिकेमुळे नवजात बाळाच्या संगोपनाकरिता नोकरीधंद्यात एक पाऊल पाठी घेताना दिसतो. स्त्रियांच्या आयुष्यातील उमेदीची वर्षे बऱ्याच आर्थिक संधींना गमावून किंवा स्व-खुशीने कुटुंब वाढवताना निसटतात. त्याचा परिणाम वय वर्षे ४५ नंतरच्या आर्थिक जीवनावर पडताना दिसतो. त्यामुळे तरुण महिला वर्गाला कुटुंब वाढवितानाच वेगळे स्वतंत्र नियोजन करणे अपरिहार्य ठरते.
4) ज्येष्ठ नागरिक, पालकांची जबाबदारी
बव्हंशी महिला वर्ग लग्नानंतरही आपल्या पालकांची आर्थिक जबाबदारी उचलण्यास तत्पर बनल्याचे दिसून येते. आज बदलत्या काळानुसार विवाहानंतर स्त्री- पुरुष आपापल्या जबाबदाऱ्या स्वतंत्रपणे पार पाडताना दिसतो. मुलींना आई-वडिलांच्या उतारवयात आर्थिक मदत करणे गरजेचे वाटते. त्यासाठी देखील स्वत:च्या आर्थिक नियोजनात काही गुंतवणुका राखीव ठेवता येतात.
आज स्त्रियांच्या मुठीत असणाऱ्या स्मार्टफोनमुळे एका क्षणात हवी ती माहिती हात जोडून मी आहे म्हणते. मोठय़ा प्रमाणात महिला वर्ग इंटरनेट सुविधा वापरत आहे. कुटुंबाच्या वाढलेल्या गरजांमुळे किंवा स्व-अस्मितेच्या जाणिवेमुळे स्त्रिया अर्थकारणात सक्रिय झाल्या आहेत. येणाऱ्या दशकात स्त्रिया खंबीरपणे संपत्ती निर्माण करून यशाची नवीन शिखरे गाठतील यात शंका नाही.