April 2024 Monthly Rashi Bhavishya: एप्रिल महिना हा सण उत्सवांचा महिना ठरणार आहे. पहिल्या पंधरवड्यात गुढीपाडवा, चैत्र नवरात्री व दुसऱ्या पंधरवड्यात राम नवमी असे शुभ मुहूर्त या महिन्यात असणार आहेत. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह गोचरांच्या दृष्टीने सुद्धा एप्रिल महिना महत्त्वाचा असणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, बुध २ एप्रिलला मेष राशीमध्ये वक्री होणार आहेत. तर ४ एप्रिलला बुधाचा मेष राशीत अस्त होणार आहे. बुधदेव गुढीपाडव्याला ९ एप्रिलला मीन राशीत प्रवेश करणार आहेत. यापाठोपाठ सूर्यदेव १३ एप्रिलला मेष राशीत प्रवेश करणार आहेत. तर बुधदेवाचा १९ एप्रिलला मीन राशीत उदय होणार आहे. मंगळ २३ एप्रिलला मीन राशीत प्रवेश करणार आहे. तर २५ एप्रिलला शुक्र मेष राशीत प्रवेश करणार आहे. ८ एप्रिलला सूर्य ग्रहण सुद्धा असणार आहे. ग्रहांच्या हालचाली व मुहूर्त पाहता या महिन्यात नेमका कुणाला लाभ होऊ शकतो व कुणाला कष्ट भोगावे लागू शकतात हे ज्योतिषतज्ज्ञ सोनल चितळे यांच्याकडून जाणून घेऊया..
१ ते ३० एप्रिलपर्यंत मेष ते मीन राशींचे भविष्य
मेष रास (Aries Rashi Bhavishya)
शनी, गुरू, हर्षल आणि रवी यांच्या सहकार्यामुळे बरीच वर्ष रेंगाळलेली कामे पुढे सरकतील. कामे पूर्ण होण्यासाठी चुकीचा मार्ग कदापि निवडू नका, खूप महागात पडेल. त्यापेक्षा थोडे सबुरीने घ्यावे. विद्यार्थी वर्गाला नव्या विषयांची ओळख होईल. मनाजोगते कोर्सेस करण्याची संधी उपलब्ध होईल. नोकरी व्यवसायात मोठे निर्णय घेताना आपला अनुभव आणि वरिष्ठांचे मार्गदर्शन कामी येईल. वैवाहिक नातेसंबंधातील तणाव कमी करण्यासाठी आपण पुढाकार घेणे आवश्यक आहे. जोडीदाराने पाहिले पाऊल पुढे टाकावे अशी अपेक्षा करू नका, तुम्ही व्हा पुढे! मालमत्तेचे प्रश्न रेंगाळतील. पित्त, डोकेदुखी त्रासदायक ठरेल.
वृषभ रास (Taurus Rashi Bhavishya)
वेळेनुसार योग्य निर्णय घेत पुढे गेलात तरच या स्पर्धेच्या आणि धावत्या युगात आपला निभाव लागेल. लाभ स्थानातील उच्चीचा शुक्र बऱ्याच बाबतीत आपणास सावरून घेईल. वक्री बुधाच्या परिणामामुळे नातेसंबंधात गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे. २५ एप्रिलला बुध मार्गी होईल आणि परिस्थिती सुधारेल. विद्यार्थी वर्गाने शिस्त आणि वेळापत्रक पाळणे अत्यंत गरजेचे आहे. गुंतवणूकदारांनी परताव्याचा जास्त हव्यास धरू नये. चढउतारामुळे मोठा धनलाभ होणे सहज शक्य नसले तरी नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी. जोडीदाराच्या साथीने महत्त्वाचा टप्पा पार कराल. हवामानातील बदलामुळे सर्दी, खोकला आणि ताप यांचा त्रास होईल.
मिथुन रास (Gemini Rashi Bhavishya)
या महिन्यात गुरुसह रवीचे देखील बळ मिळणार आहे. कष्टाचे चीज होईल. आपल्या मताला किंमत येईल. उच्चीचा शुक्र नव्या संकल्पना अमलात आणण्यात साहाय्य करेल. विद्यार्थी वर्गाने उच्च शिक्षणाची जोरदार तयारी करावी. नोकरीमध्ये थोडी तडजोड करण्याची तयारी ठेवल्यास आपल्याच हिताचे ठरेल. व्यावसायिकांना आर्थिकदृष्ट्या नवी गणिते मांडावी लागतील. विवाहोत्सुक मुलामुलींना मनाजोगता जोडीदार मिळेल. घर, मालमत्ता, प्रॉपर्टीसंबंधित कामात सरकारी अडचणी येतील. गुंतवणूकदारांना मर्यादित लाभ होईल. हाडे, सांधे, रक्तदाब याबद्दल विशेष काळजी घ्यावी लागेल. पथ्य पाळणे आपली जबाबदारी आहे, हे विसरून चालणार नाही.
कर्क रास (Cancer Rashi Bhavishya)
भाग्य स्थानातील उच्चीचा शुक्र अतिशय शुभफलदायी ठरेल. १३ एप्रिलला रवी दशमातील मेष राशीत प्रवेश करेल. या उच्चीच्या रवीमुळे नोकरी व्यवसायात भरघोस यश मिळेल. मानसन्मान आणि प्रतिष्ठा मिळेल. विद्यार्थी वर्ग परीक्षेत अपेक्षित यश संपादन करेल. सुरुवातीपासून घेतलेल्या मेहनतीचे चीज होईल. विवाहोत्सुक मुलामुलींनी जोडीदाराचे संशोधन कार्य सुरू करावे. विवाहित दाम्पत्यांनी तडजोड केल्यास सुखी जीवनाचा आनंद लुटता येईल. मित्रमंडळींच्या भेटीगाठीतून नवे चैतन्य मिळेल. गुंतवणूकदारांना दीर्घ मुदतीची गुंतवणूक खूप फायदेशीर ठरेल. घराचे काम मार्गी लागेल. महिन्याच्या उत्तरार्धात कोर्टकचेरीची कामे पूर्ण करावीत. रक्तातील साखरेच्या पातळीवर नियंत्रण ठेवावे.
सिंह रास (Leo Rashi Bhavishya)
आत्मविश्वास असेल तर मोठ्या संकटांनाही सहज तोंड देऊ शकाल. भाग्य स्थानातील रवी, गुरूच्या साहाय्याने परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळाल. विद्यार्थी वर्गाने पुढच्या आव्हानासाठी सज्ज व्हावे. अभ्यासातील सातत्य ढळू देऊ नका. नोकरी व्यवसायातून अपेक्षित यश, धनसंपत्ती मिळण्यासाठी स्वतःला अद्ययावत ज्ञानाने परिपूर्ण कराल. विवाहोत्सुक मुलामुलींना सुयोग्य जोडीदार मिळणे शक्य आहे. शोधकार्य सुरूच ठेवावे. नवविवाहित दाम्पत्यांना कौटुंबिक जबाबदाऱ्या पेलाव्या लागतील, धीराने घ्यावे. गुंतवणूकदारांना आपल्या गुंतवणूकीचा चांगला परतावा मिळेल. तज्ज्ञांच्या सल्ल्याने पुढे जावे. रोगप्रतिकारशक्ती वाढविल्यास आरोग्याच्या लहानमोठ्या तक्रारी दूर होतील.
कन्या रास (Virgo Rashi Bhavishya)
पूर्व नियोजन किती महत्वाचे असते याचा अनुभव येईल. लोकांमध्ये आपले कौतुक होईल. लहानमोठ्या गोष्टीतून स्वतः आनंद मिळवाल आणि यात इतरांनाही सामील करून घ्याल. विद्यार्थी वर्गाला ऐन वेळच्या संकटांना तोंड द्यावे लागेल. पण आधीपासूनच त्यासाठी सज्ज राहिलात तर फारसा त्रास होणार नाही. नोकरी व्यवसायातील गोपनीय बाबींचा डोक्यावर ताण वाढेल. योगासने, प्राणायाम या शाश्वत उपायांचा अवलंब करावा. नाते संबंध, प्रेमसंबंध टिकवण्यासाठी आपण पुढाकार घेणे इष्ट ठरेल. आपला अहंभाव बाजूला सारावा. गुंतवणूकदारांसाठी महिन्याचा पूर्वार्ध विशेष लाभदायक ठरेल. हाडे कमजोर झाल्याने धडपड संभवते. हाड मोडणे, दुखणे लांबण्याची शक्यता.
तूळ रास (Libra Rashi Bhavishya)
शनी, मंगळ ,शुक्र यांच्या सहकार्याने मोठया जबाबदाऱ्या हिमतीने पेलाल. आपल्या कर्तृत्वाची दाद मिळेल. कौतुक होईल. विद्यार्थ्यांना रवी, गुरूच्या साथीने अभ्यासात आणि परीक्षेत उत्तम यश मिळेल. नोकरी व्यवसायात सहकारी वर्गाकडून अपेक्षित मदत मिळाल्याने कामे वेगाने पुढे सरकतील. विवाहोत्सुक मंडळींनी हा महिनाभर अधिक मेहनत घ्यावी. विवाहितांना आपल्या जोडीदाराच्या हुशारीची, व्यवहारज्ञानाची छान प्रचिती येईल. घराच्या कामाचे व्यवहार रखडतील. गुंतवणूकदारांनी घाई करून नुकसान करून घेऊ नये. शांत डोक्यानेच व्यवहार करावेत. हातापायांची व डोळ्यांची जळजळ होणे अशा त्रासांना सामोरे जावे लागेल
वृश्चिक रास (Scorpio Rashi Bhavishya)
अभ्यास वा नित्याच्या कामाबरोबर नव्या गोष्टी शिकाल. स्वतःचा उत्कर्ष साधाल. विद्यार्थी वर्गाला उच्च शिक्षणासाठी चांगली संधी उपलब्ध होईल. आपल्या कष्टाचे चीज कराल. हुशारीसह व्यवहारज्ञान किती गरजेचे असते याचा प्रत्यय येईल. नोकरी व्यवसायात वरिष्ठ मंडळींसह वाद वाढवू नयेत. काही गोष्टी आपल्या मनासारख्या होणार नाहीयेत हे स्वीकारणे गरजेचे आहे. विवाहितांच्या बाबतीतही हाच नियम लागू पडेल. अशा गोष्टी ‘आहेत तशा स्वीकारणे’ या शिवाय पर्याय नसतो. घराच्या, प्रॉपर्टीच्या कामात तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळेल. गुंतवणूकदारांनी या नव्या आर्थिक वर्षात जरा जपूनच पाऊल उचलावे. भरपूर पाणी प्यावे. शरीरातील आणि वातावरणातील उष्णतेपासून स्वतःला सांभाळावे.
धनु रास (Sagittarius Rashi Bhavishya)
आपले काम राहिले तरी चालेल, मित्रमैत्रिणीचे आधी झाले पाहिजे या वृत्तीचा बऱ्याचदा आपल्याला अनुभव येईल. दिलदारी दिसून येईल. परंतु ‘आपल्या चांगुलपणाचा कोणी फायदा तर घेत नाही ना’ याचा आढावा जरूर घ्यावा. समाजात वावरताना व्यावहारिक दृष्टिकोन ठेवावा. विद्यार्थी वर्गाला अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे लागेल. मेहनतीला दुसरा पर्याय नाही. विवाहोत्सुक मुलामुलींना मनाजोगते स्थळ ओळखी ओळखीतून समजेल. विवाहित मंडळींच्या नात्यात समज, गैरसमज निर्माण होतील. शांत डोक्याने चर्चा करून ते दूर करावे लागतील. यात आपल्यालाच पुढाकार घ्यावा लागेल. मालमत्तेसंबंधी कामात अनेक अडथळे निर्माण होतील. थोडे धीराने घ्यावे. छातीत, पोटात वायू अडकल्याने हृदयावर जोर येईल.
मकर रास (Capricorn Rashi Bhavishya)
न पेलणाऱ्या जबाबदाऱ्या स्वीकारू नका, साहाय्यकांच्या मदतीने कामे पूर्ण होतील. अट्टहास करणे हितकारक नाही. विद्यार्थी वर्गाने मोठया परीक्षा, स्पर्धा परीक्षा यांची विशेष तयारी करावी. शनी कर्मकारक ग्रह असल्याने तो आपल्या मेहनतीचे योग्य फळ देईलच. नोकरी व्यवसायात कामानिमित्त प्रवास कराल. त्यातून यशाच्या दिशेने वाटचाल सुरू कराल. नव्या पर्वाची लवकरच सुरुवात होणार आहे. धीर सोडू नका. मालमत्तेच्या संबंधातील गुंतवणूक वाढेल. मतैक्य होण्यासाठी अजून वाट बघावी लागेल. अभ्यासपूर्वक केलेली गुंतवणूक लाभदायक ठरेल. डोकेदुखी, चक्कर येणे या गोष्टींकडे दुर्लक्ष न करता वैद्यकीय तपासणी करणे आवश्यक ठरेल.
कुंभ रास (Aquarius Rashi Bhavishya)
संयम आणि हिंमत यांचा सुयोग्य समतोल साधून महत्त्वाचे निर्णय घेता येतील. या निर्णयाचा भविष्यात मोठा लाभ होणार आहे. विद्यार्थी वर्गाने जिद्दीच्या बळावर उंच झेप घ्यावी. अभ्यास, परीक्षा यांमध्ये व्यग्र राहाल. उच्च शिक्षणासाठी घेतलेली मेहनत फलित होईल. नोकरी व्यवसायात चांगली भरभराट होईल. कामानिमित्त प्रवास कराल. या प्रवासामुळे आर्थिक लाभ होतील. वरिष्ठांकडून कामाची दखल घेतली जाईल. विवाहोत्सुक मंडळींना वधुवर संशोधनात यश मिळेल. विवाहित दाम्पत्यांना आपल्या जोडीदाराचा अभिमान वाटेल असे कार्य त्याच्या हातून घडेल. घर, प्रॉपर्टीच्या संबंधीत कामकाजासाठी कायदेशीर मार्गदर्शन मिळेल. अडचणी येतील पण त्यातून मार्ग निघेल. अचानक ताप, सर्दी, संसर्गजन्य आजारांनी त्रस्त व्हाल.
हे ही वाचा<< १३ दिवस केंद्र त्रिकोण राजयोग कायम; ‘या’ राशींना लाभतील सुगीचे दिवस; ‘या’ रूपात होईल लक्ष्मीचं आगमन
मीन रास (Pisces Rashi Bhavishya)
नव्या आर्थिक वर्षात खूप महत्वाच्या उलाढाली होतील. आपला आत्मविश्वास वाढेल. हिमतीने पुढाकार घ्याल. विद्यार्थी वर्गाला अपेक्षित यश मिळेल. मेहनत, अभ्यास आणि सातत्य यामुळेच हे शक्य होईल. नोकरी व्यवसायातील खाचखळगे लक्षात घ्यावेत. ‘आपण चांगले म्हणून सगळे जग चांगले’ असे नसते, सतर्क राहा. विवाहोत्सुक मुलामुलींचे विवाह जुळतील. मनपसंत जोडीदाराची निवड कराल. विवाहित दाम्पत्यांमध्ये समज, गैरसमज वाढतील. आपले म्हणणे शांतपणे आणि स्पष्टपणे जोडीदारापुढे मांडावे. फक्त गप्प राहून भागणार नाही, व्यक्त व्हावे. २५ एप्रिलपर्यंत घर, प्रॉपर्टीच्या कामात अडथळे येतील. गुंतवणूकदारांनी विशेष काळजी घ्यावी. घसा, डोळे आणि डोके यांची दुखणी मागे लागतील.