Astrological Predictions Of India 2025 : माणूस आयुष्य जगताना मन आणि बुद्धीचा वापर करून जगत असतो आणि घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीत सुख- दुःखाचा अनुभवसुद्धा घेत असतो. यामध्ये बुद्धीने जगणारी माणसे विज्ञानाची कास धरून पुरावे शोधत असतात, तर मनाने जगणारी माणसे आधार शोधतात आणि सुख- दुःखाच्या झोक्यात स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत असतात. तसे पाहायला गेले तर भूक (अन्न), वस्त्र आणि निवारा या गरजा भागवण्यात माणसाचे आयुष्य संपून जाते. पण, अशा आशा-निराशेच्या फेऱ्यात माणूस भावनिक आधारसुद्धा शोधत असतो. याचदरम्यान प्रत्येकाला पडलेला एक प्रश्न असतो तो म्हणजे ‘पुढे काय होईल…’
तर यातूनच ज्योतिषशास्त्राचा जन्म झाला. फलज्योतिषशास्त्राआधारे भावी घडणाऱ्या घटनांविषयी माहिती करून घेण्यासाठी लोक या शास्त्राकडे आकर्षित झाले आणि या शास्त्राबरोबरच संख्याशास्त्राचा उगम झाला. त्यात एक ते नऊ (१ ते ९) अंक आणि जन्मतारीख यांचा मेळ घालून माणसाच्या आयुष्यातील बऱ्या- वाईट घटनांचा शोध घेण्यात हे शास्त्र पुढे आले. तर काही दिवसांवर येऊन ठेपलेले २०२५ हे वर्ष सर्वसाधारणपणे जगाला, देशाला व महाराष्ट्राला कसे जाईल याचा एक अंदाज संख्याशात्राद्वारे आज आपण घेऊया…
मानसिक अस्थिरतेकडे…
२०२५ या वर्षाच्या संख्येत एक शून्य (०) व एक (५) हे अंक उपस्थित आहेत. दोन या अंकावर येणारे शून्य काहीसे त्रासदायक ठरते. तसेच या वर्षात दोन या अंकाची उपस्थिती दोन वेळा आली आहे, त्यामुळे धावपळीचे जगणे अधिक वाढेल. चढाओढ स्पर्धा यात आपले अस्तित्व काय असेल, हा सर्वसाधारण प्रश्न पूर्ण जगाला त्रासदायक ठरेल. त्यातूनच मानसिक अस्थिरता, अतिभावनाप्रधान होणे, कदाचित त्यामुळेच मनोविकारतज्ज्ञांची गरज भासणे यांसारख्या अनुभवातून सगळ्यांना सामोरे जावे लागेल.
पाच बुद्धीमत्तेचा कारक अंक
असे असले तरीही, पाच हा अंक बुद्धिमत्तेचा कारक आहे, तो वास्तव जगण्यासाठी खूप मदतीचा ठरेल. मंदीच्या काळात आपल्या गरजा कमी करून, आळस झटकून काम करणे जरुरीचे ठरेल आणि हे लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम ५ अंक उत्तम करू शकेल. व्यवहार कसोटी आणि प्रामाणिकपणा ही अंगे जपून जगण्याचा प्रयत्न केला, तर हे वर्ष प्रत्येकाला खूप समाधानकारक जाईल.
आर्थिक बाबतीत उत्तम
भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले. १५ तारीख म्हणजे १+५ = ६. सहा अंक हा शुक्राचा आहे. तर २०२५ म्हणजे २+०+२+५= ९. नऊ अंक हा सहा अंकाचा खूप जवळचा मित्रांक आहे, त्यामुळे हे वर्ष भारतासाठी सुखदायी जाईल. पाऊस, भूकंप अशा गोष्टी निसर्गनियमाने होतच राहणार, पण त्याचा अतिरेक, उपद्रव भारताला फारसा जाणवणार नाही. राजकारणात मात्र बुद्धिबळाच्या डावासारखे डाव खेळले जातील. जास्त बोलकी माणसे जास्त बुद्धिमान ठरतील, नावलौकिक मिळवतील. विशेष खार्डीयन पद्धतीने इंडिया (India) या नावाची स्पंदने १२ येतात. म्हणजेच १+२= ३. तीन हा अंक नऊ अंकाचा उत्तम मित्र आहे, त्यामुळे हे वर्ष भारताला आर्थिक बाबतीत चांगले जाईल.
सोन्या- चांदीचा चढता आलेख
विशेषतः नऊ हा अंक मंगळाचा आहे. त्याचा संबंध भूगर्भातील खनिजाशी येतो. यामुळे सोने-चांदीच्या भावाचा आलेख चढता राहील. तसेच वर्षअखेरीस शेअर्सचे भाव तेजीत येतील, त्यामुळे व्यापारी वर्गात एक आनंदी वातावरण निर्माण होईल. पैसा खेळता राहील, खरेदी-विक्रीत एक उत्साही, समाधानी वातावरण तयार होईल. कला, नाट्य, सिने क्षेत्रात कलाकारांना आर्थिक फायदा होईल. एकूणच आनंदी, उत्साही वातावरणात वर्ष सरेल.