Dev Uthani Ekadashi 2023: कार्तिक मासातील शुक्ल पक्ष एकादशी ही कार्तिकी एकादशी किंवा देवउठनी एकादशी म्हणून ओळखली जाते. या एकादशीसह चातुर्मास समाप्त होतो. आषाढी एकादशीला निद्राधीन झालेले विष्णू देव या एकादशीला पुन्हा निद्रेतून बाहेर येतात असेही मानले जाते. यामुळे कार्तिकी एकादशीपासून पुढे शुभ मुहूर्ताची सुरवात होत असते. याच दिवशी तुळशी विवाह सुद्धा पार पडतो. घरोघरी तुळशीच्या रोपाचे शाळीग्रामासह लग्न लावले जाते. यंदा अधिक श्रावण आल्याने सगळ्याच सणांच्या तारखा या पुढे ढकलल्या गेल्या आहेत. काही वेळेला तिथी व इंग्रजी कॅलेंडरच्या तारखांमध्ये घोळ असल्याने नेमका सणाचा दिवस कोणता असा गोंधळ होतो. कार्तिकी एकादशीच्या बाबतही हेच झाले आहे. नेमकी यंदाची एकादशी तिथी कधी आहे? शुभ मुहूर्त काय याविषयी जाणून घेऊया..
देवउठनी एकादशी 2023 कधी आहे?
पंचांगानुसार, यंदा कार्तिक शुक्ल एकादशीची तिथी २२ नोव्हेंबर रात्री ११ वाजून ३ मिनिटांनी सुरु होणार आहे तर २३ नोव्हेंबर म्हणजेच गुरुवारी रात्री ९ वाजून १ मिनिटांनी एकादशी तिथी समाप्त होईल. उदयतिथीनुसार देवउठनी एकादशी ही २३ नोव्हेंबरला असणार आहे.
देवउठनी एकादशी व चातुर्मासाची समाप्ती
देवउठनी एकादशी म्हणजेच २३ नोव्हेंबर पासून यंदाच्या वर्षातील सर्व शुभ मुहूर्त सुरु होणार आहेत. पंचांगानुसार यानंतर लग्न, मुंज, गृहप्रवेश अशा कार्यक्रमासाठी २३ नोव्हेंबरच्या नंतर अनेक शुभ मुहूर्त आहेत.
हे ही वाचा<< १४० दिवसांनी शनी महाराज शनिवारीच पुष्य नक्षत्रात होत आहेत मार्गी! ‘या’ ६ राशींना लक्ष्मी देणार धनाचा हंडा
देवउठनी एकादशी 2023 ला महत्त्वाचे राजयोग
२३ नोव्हेंबरला म्हणजेच कार्तिकी एकादशीला यंदा ग्रहमान सुद्धा अत्यंत शुभ असल्याचे दिसत आहे. याच दिवशी तीन महत्त्वाचे राजयोग सुद्धा जुळून येणार आहेत. या दिवशी सकाळी ६ वाजून ५० मिनिटांनी रवी योग सुरु हपणार आहे तर संध्याकाळी ५ वाजून १६ मिनिटांपर्यंत हा शुभ योग कायम असणार आहे. यानंतर संध्याकाळी ५ वाजून १६ मिनिटांपासून सर्वार्थ सिद्धी योग सुरु होणार असून पुढच्या दिवशी सकाळपर्यंत याचा प्रभाव कायम असणार आहे.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)