28 February 2025 Horoscope : २८ फेब्रुवारी २०२५ रोजी फाल्गुन शुक्ल पक्षाची प्रतिपदा तिथी आहे. प्रतिपदा तिथी रात्री ३ वाजून १३ मिनिटांपर्यंत राहील. रात्री ८ वाजून ८ मिनिटांपर्यंत सिद्ध योग जुळून येईल. तसेच शतभिषा नक्षत्र दुपारी १ वाजून ४० मिनिटांपर्यंत जागृत असणार आहे. राहू काळ १० वाजून ३० मिनिटांनी सुरु होईल ते १२ वाजेपर्यंत असणार आहे. तर महिन्याचा शेवटचा दिवस तुमच्या राशीसाठी कसा असणार हे आपण जाणून घेणार आहोत.

२८ फेब्रुवारी पंचांग व राशिभविष्य :

मेष:- आपल्या स्वभावानुसार ठाम निर्णय घ्यावेत. कामातून आनंद मिळेल. सहकार्‍यांचे आभार मानायला विसरू नका. दिवस आपल्या मर्जीनुसार जाईल. इतरांवर छाप पडण्यात यशस्वी व्हाल.

वृषभ:- अनपेक्षित लाभ मिळण्याची शक्यता. मुलांच्या खेळकरपणात रमून जाल. नाटक वा सिनेमा पाहण्याचे ठरवाल. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल.

मिथुन:- घरगुती वातावरण प्रसन्न राहील. दिवसभर कामातच व्यग्र राहाल. सारखे मत बदलू नका. कामात एकसूत्रता ठेवावी. आततायीपणा करून चालणार नाही.

कर्क:- जवळचा प्रवास हसत-खेळत होईल. भावंडांच्या सानिध्यात रमून जाल. नवीन लोकांशी संपर्क होईल. जोडीदाराचा शांत स्वभाव मनात भरेल. एककल्ली विचार करू नका.

सिंह:- मानसिक चंचलता जाणवेल. गोडाधोडाचे पदार्थ चाखाल. भागीदारीत नवीन विचार मांडाल. कौटुंबिक वातावरण खेळीमेळीचे राहील. नातेवाईकांची नाराजी दूर करावी.

कन्या:- दिवस घाईघाईत जाईल. घरगुती वातावरण शांततेचे ठेवावे. वैचारिक शांतता जपावी. कौटुंबिक खर्च आटोक्यात ठेवावा. उत्तम गृहसौख्य लाभेल.

तूळ:- आशावादी दृष्टीकोन ठेवावा. घरात तुमचे प्रभुत्व राहील. सर्वबाबी अभ्यासूपणे जाणून घ्याल. वैवाहिक सौख्याच्या बाबीत समाधानी राहाल. खोट्या गोष्टींचा आधार घेऊ नका.

वृश्चिक:- संभाषणाची आवड पूर्ण कराल. मित्र-मैत्रिणींचा गोतावळा जमवाल. सारासार विचार करूनच निर्णय घ्यावेत. कौटुंबिक समस्या सामोपचाराने हाताळाव्या. नोकरांचे सुख मिळेल.

धनू:- योग्य तर्काचा वापर कराल. आपले बौद्धिक ज्ञान उत्तमरीत्या वापराल. लहान प्रवास करावा लागेल. तुमच्या बोलण्याने लोक प्रभावित होतील. काही गोष्टींचे एकवार चिंतन करावे.

मकर:- सामुदायिक वादात लक्ष घालू नका. जुनाट विचार करणे सोडून द्यावे. आपली जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडाल. न डगमगता आपले विचार मांडाल. तुमच्यातील धार्मिकता वाढीस लागेल.

कुंभ:- आपले प्रभुत्व दाखवाल. अचानक धनलाभ संभवतो. वैचारिक स्थिरता ठेवावी. नवीन मित्र जोडावेत. तुमच्या हातातील कलेचे कौतुक केले जाईल.

मीन:- कागदपत्रांची नीट छाननी करावी. फसवणुकीपासून सावध राहावे. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. भागीदारीत खुश असाल. कामातील क्षुल्लक अडथळे दूर करावेत.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर

Story img Loader