भारतीय संस्कृतीत रामायण हे महाकाव्य अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. प्रत्येक भारतीय घरात रामायणाच्या कथांचे पारायण केले जाते. भगवान राम आणि देवी सीता यांच्यातील भावबंधाबद्दल सर्वांनाच माहीत असते. परंतु रामायणात अशी एक आगळी वेगळी प्रेमकथा आहे, जी क्वचितच सांगितली जाते. ही कथा रामाचा धाकटा भाऊ लक्ष्मण आणि त्याची पत्नी उर्मिला यांच्याविषयी आहे.
उर्मिला आणि लक्ष्मण यांच्यातील प्रेम हे निःस्वार्थ तसेच त्यागाचे प्रतीक मानले जाते. प्रत्येक प्रेमकथा ही खासचं असते. परंतु काही कथा प्रसिद्धीच्या झोतात येतात तर काही अबोल प्रीतीचे प्रतीक म्हणून राहतात. लक्ष्मण आणि उर्मिला यांच्यातील प्रेम याच अबोल प्रीतीचे प्रतीक आहे.
उर्मिला आणि लक्ष्मण
उर्मिला ही राजा जनक आणि राणी सुनन्या यांची कन्या होती. ती सीतेची धाकटी बहीण होती. तर लक्ष्मण हा श्रीरामचा धाकटा भाऊ आहे, जो अयोध्येचा राजा दशरथ आणि राणी सुमित्रा यांचा मुलगा होता. लक्ष्मण हा राम भक्तीसाठी प्रसिद्ध आहे. तर उर्मिला ही पती भक्तीसाठी त्यागमूर्ती म्हणून ओळखली जाते. राम आणि सीतेचा विवाह हा स्वयंवर पद्धतीने झाला होता. श्रीरामाने शिवाचे धनुष्य मोडून सीतेशी विवाह करण्याचा ‘पण’ जिंकला होता. राजा दशरथाला चार मुलगे आहेत हे कळल्यावर राजा जनकाने आपल्या चारही मुलींचा विवाह दशरथाच्या चार मुलांशी केला. अशा प्रकारे उर्मिलाचा विवाह लक्ष्मणाशी झाला.
आणखी वाचा: विदर्भ कन्या रुक्मिणीचे हरण कृष्णाने का केले?
रामायणातील एक आदर्श स्त्री: उर्मिला
आपल्या सर्वांना सीतेचे बलिदान माहीत आहे तसेच रामायणातील तिच्या हृदयस्पर्शी भूमिकेमुळे ती प्रत्येक स्त्रीची प्रेरणाही ठरली. तिची बहीण उर्मिलाही तिचीच प्रतिकृती होती. तिनेही सीतेचा आदर्श घेऊन आपल्या सुखाचा १४ वर्षांसाठी त्याग केला होता. रामाच्या वाटेला आलेला वनवास हा लक्ष्मणाच्या वाटेला आपसूक आला नाही. लक्ष्मणाने स्वतःहून रामाच्या बरोबर १४ वर्षांचा वनवास स्वीकारून आपल्या राम भक्तीची प्रचिती दिली. त्यामुळेच लक्ष्मणाला आदर्श बंधू मानले जाते, लक्ष्मणाने नेहमीच रामाची काळजी घेतली होती, रामाच्या आज्ञेचे पालन केले होते. रामाने सीतेला आणि लक्ष्मणाला आपल्या बरोबर वनात येण्यास नकार दिला होता. तरीही लक्ष्मण हा रामासोबत सावलीसारखा राहिला. लक्ष्मणाप्रमाणे उर्मिलानेही आदर्श पत्नीप्रमाणे पतीचा निर्णय स्वीकारला. तिने १४ वर्षे विरहाच्या यातना विनातक्रार भोगल्या होत्या. खऱ्या अर्थाने ती सीतेप्रमाणे आदर्श स्त्री ठरली होती.
आदर्श भाऊ
रामाच्या वनवासासाठी कैकयी कशा प्रकारे कारणीभूत ठरली हे सर्वश्रृत आहे. भरताला अयोध्येचा राजा करण्यासाठी तिने रामासाठी वनवास मागून घेतला होता. परंतु चारही भावंडांमध्ये कमालीचे प्रेम होते. त्यामुळे या चारही भावंडानी १४ वर्षांसाठी वेगवेगळ्या माध्यमातून यातना भोगल्या. असे असले तरी लक्ष्मणाचा त्याग हा सर्वोत्तम मानला जातो. कोणत्याही प्रकारची आसक्ती न ठेवता लक्ष्मणाने रामा बरोबर वनवास स्वीकारला होता.
लक्ष्मण १४ वर्षांसाठी वनवासाला जाणार आहे. तसेच तो आपला भाऊ आणि वहिनीसाठी कर्तव्य आणि जबाबदाऱ्या बजावणार आहे, हे कळताच उर्मिलाही त्यांच्या बरोबर निघाली होती. परंतु लक्ष्मणाने यासाठी नकार दर्शविला, उर्मिलाने राजघराण्याची काळजी घ्यावी आणि बाकीच्या कुटुंबाप्रती त्याची जबाबदारी येथे राहून पूर्ण करावी, अशी त्याची इच्छा होती. लक्ष्मणाने तिला सांगितले, त्याला राम आणि सीता यांची सेवा करायची आहे. तो रात्रंदिवस त्याच कामात व्यग्र असणार. उर्मिलाला तिच्या पतीचे मन समजले आणि तिने आपला हट्ट सोडून घरच्यांची मनोभावे सेवा करेन असे वचन दिले.
निद्रा देवीची परीक्षा
लक्ष्मणाचे शब्द दगडावरील रेषेसारखे होते. तो रात्रंदिवस न झोपता राम आणि सीता यांची सेवा करत होता. अशाच एका रात्री निद्रा देवीने लक्ष्मणाची परीक्षा घेण्याचे ठरविले. निद्रा देवी त्याच्या जवळ गेली, आणि म्हणाली, आता मला थांबणे शक्य नाही, तुला झोपेचा विचार करणे गरजेचे आहे आणि स्वत:ला लागू केलेल्या कर्तव्यापासून मुक्त होण्यास तिने सांगितले. परंतु लक्ष्मण आपल्या कर्तव्यापासून जराही मागे हटला नाही, त्याने राम-सीतेची अखंड सेवा सुरू ठेवली. हे पाहून निद्रादेवी त्याच्या भावाप्रती असलेल्या अखंड निष्ठेने प्रभावित झाली. त्याची झोप संतुलित ठेवण्यासाठी १४ वर्षे दुस-या कोणाला तरी झोपावे लागेल या अटीवर तिने त्याला वरदान दिले. लक्ष्मणाने यासाठी उर्मिलाकडे मदत मागितली. हिंदू रीतिरिवाजानुसार पती-पत्नी केवळ शारीरिकदृष्ट्या एकत्र येत नाहीत; तर त्यांची कर्म, ऊर्जा आणि आत्मा विवाहामुळे एकाच सूत्रात बांधली जातात. त्यामुळेच लक्ष्मणाची अर्धांगिनी म्हणून उर्मिलाने त्याच्या वतीने झोप घेण्याचा निर्णय स्वीकारला.
आणखी वाचा: एक उत्कट अधुरी प्रेम कथा…. उर्वशी आणि पुरुरवा!
लक्ष्मणाच्या वतीने उर्मिलाने आनंदाने १४ वर्षे झोपणे स्वीकारले.
१४ वर्षांच्या कालखंडात उर्मिला एकदाही उठली नाही. उर्मिलाने लक्ष्मणाशी लग्न करताना ‘दुःख असो किंवा आनंद असो, ती सदैव त्याच्या पाठीशी असेल, हे दिलेले वचन पूर्ण केले होते. लक्ष्मणाबद्दलचे तिचे प्रेम कोणतेही शब्द न बोलता तिच्या कृतीतून तिने सिद्ध केले. ती तिच्या पतीसाठी एक रक्षक झाली आणि त्याला त्याचे कर्तव्य पार पाडण्यासाठी मदत केली. तिच्यामुळे लक्ष्मणाने जागृत राहून झोपेचा पराभव केला. केवळ उर्मिलामुळे लक्ष्मण मेघनादाचा पराभव करू शकला. मेघनादाला वरदान होते की वर्षानुवर्षे न झोपलेल्या माणसाकडूनच त्याचा मृत्यू होईल. अशा प्रकारे लक्ष्मण आणि राम यांच्या विजयात उर्मिलाचा मोठा वाटा होता.
रामायणातील लक्ष्मण आणि उर्मिलाची प्रेमकथा ही भक्ती, निष्ठा आणि त्यागाची कथा आहे. भगवान रामाचा धाकटा भाऊ असलेल्या लक्ष्मणाचे उर्मिलावरचे प्रेम तितकेच शक्तिशाली आणि टिकाऊ होते. उर्मिलादेखील रामायणातील एक उल्लेखनीय व्यक्ती होती, जिने रामाची सेवा करण्याच्या आपल्या पतीच्या कर्तव्याला पाठिंबा दिला आणि त्याचा आनंद सुनिश्चित करण्यासाठी स्वेच्छेने त्याग केला. त्यांचे प्रेम त्रासांपासून मुक्त नव्हते, लक्ष्मणाच्या कर्तव्यामुळे त्यांना विरह सहन करावा लागला होता.
लक्ष्मण आणि उर्मिलाची प्रेमकथा त्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. जे एक खोल आणि चिरस्थायी प्रेम जोपासू पाहत आहेत, जे काळाच्या कसोटीला तोंड देऊ शकतात आणि त्यांच्या मार्गात येणाऱ्या कोणत्याही अडथळ्यावर मात करू शकतात.