Astrology, Planets And Stock Market Investment : शेअर बाजारात गुंतवणूक करणे आपल्यातील अनेकांना भरपूर आवडते. शेअर बाजारातील गुंतवणूक अनेक गुंतवणूकदारांना फायदेशीर ठरते. पण, गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगणे आणि सतत लक्ष ठेवणेसुद्धा गरजेचे आहे. कारण- गुंतवणूकदारांना जेवढा फायदा होतो, तेवढेच नुकसानसुद्धा त्यांना सोसावे लागते. तुम्ही पाहिले असेल की, दीड महिन्यापासून अगदी मोजके दिवस सोडले, तर शेअर बाजारात बऱ्याचदा घसरण झाली आहे. तसेच आज आठवड्याच्या शेवटच्या दिवशी बाजारात पुन्हा एकदा मोठी घसरण दिसून आली. तर हे बघता, शेअर बाजारात पैसे गुंतवायचे की नाहीत याबद्दल तुमच्याही मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असतील. तर आज आपण याचबद्दल ज्योतिषी संजय बुधवंत यांच्याकडून जाणून घेऊ…

ज्योतिषशास्त्रातील अवकहडा चक्रातील घातचक्र हे कुंडलीतील पंचम स्थानावरून पाहिले जाते. लग्नराशी किंवा चंद्रराशीच्या पंचम स्थानातील राशी, नक्षत्र, योग, करण, तिथी व वार हे घात करणारे घटक मानले जातात. या पंचांगापैकी कोणतेही तीन घटक गोचरीने आल्यास त्या व्यक्तीला सावधानतेने राहायला हवे. अशा वेळी त्याचा घात होण्याचा संभव असतो. ‘घात’ या व्याख्येमध्ये शारीरिक, भावनिक, आर्थिक, सामाजिक इत्यादी अनेक प्रकारचे अपघात समाविष्ट आहेत. एखाद्या व्यक्तीस यापेकी कोणताही धक्का अचानक बसू शकतो. अनेकदा हे टाळता न येणारे असते. पण, त्याचे परिणाम भाग्याच्या व्यवस्थापनाच्या माध्यमातून सौम्य करता येऊ शकतात.

उदा:- धनू राशीसाठी घातचक्र खालीलप्रमाणे :

१) घातमास – श्रावण, २) घाततिथी – तृतीया, अष्टमी, त्रयोदशी, ३) वार – शुक्रवार, ४) नक्षत्र – भरणी, ५) घातयोग – वज्र , ६) घातकरण- तैतिल
वरील बाबींचा विचार करून वर्षभरातील तारखा व वेळा आपणास पंचांगातून काढता येतील. त्याप्रमाणे त्या विशिष्ट दिवशी सावधानता बाळगता येईल. शेअर बाजारात गुंतवणूक करताना त्या विशिष्ट दिवसांत जोखीम न घेण्यासाठीचे ते मुहूर्त असतील.

उदा:- धनू राशीसाठी १८ ऑक्टोबर २०२५ या दिवशी शुक्रवार, भरणी नक्षत्र, वज्र योग व तैतिल करण हे घातचक्रातील चार घटक एकत्र येत आहेत. या दिवशी गुंतवणूक करू नये. अशा प्रकारे कुंडलीतील पंचम स्थान हे धर्म त्रिकोणातील शुभ स्थान मानले असले तरी ते अत्यंत जोखमीचे आहे, हे विसरू नये. स्वतःच्याच मस्तीत लहरीपणाने वागण्याने तुम्ही स्वतःच अपघातास कारणीभूत ठरू शकता. पारंपरिक शास्त्राप्रमाणेच कृष्णमूर्ती पद्धतीद्वारे पाच, आठ, १२ या भावांच्या महादशा, अंतर्दशा, विदशेत जोखीम घेऊ नये; सावध राहावे. या काळामध्ये खूप मोठ्या नुकसानकारक घटना घडू शकतात. अशा प्रकारे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताना व्यक्तिविशिष्ट मुहूर्त ही संकल्पना वापरणे उपयुक्त ठरेल आणि संभाव्य नकारात्मक परिणाम टाळता येतील किंवा ते सौम्य करता येतील. रविच्या गोचरीनेदेखील असे मुहूर्त काढता येतील. उदा. सिंह लग्नराशीसाठी १६ जुलै ते २० जुलै हे दिवस दरवर्षी अत्यंत अशुभ असू शकतील. यावेळी रवि कर्क राशीतील पुनर्वसू नक्षत्राच्या चतुर्थ चरणातून भ्रमण करीत असत. सिंह राशीसाठी चंद्र व्ययेश व गुरू पंचमेश, अष्टमेश असल्याने पाच, आठ, १२ अशी अशुभ साखळी तयार होते.

तर गुंतवणूक कशी करावी?

शेअर बाजारातून शेअर्स खरेदी करताना तीन प्रकारे त्याची खरेदी करता येते.

१) अल्प मुदत – [Intraday]
२) मध्यम मुदत – [ months]
३) दीर्घ मुदत – [more than a year or long ]

तर व्यक्तीच्या कुंडलीचा विचार करून त्याचे वर्गीकरण खालीलप्रमाणे करता येईल :

१) अल्प मुदत- मंगळ, चंद्र व बुध प्रधान
२) मध्यम मुदत – रवि, शुक्र, गुरू प्रधान
३) दीर्घ मुदत- शनि प्रधान

गुंतवणूक करण्याचे सामान्य नियम :

१) इतरांच्या सल्ल्यानुसार गुंतवणूक करणे टाळावे. स्वतः अभ्यास करून आणि इतरांचा सल्ला विचारात घेऊन, स्वतः निर्णय घ्यावेत. शेअर बाजार या विषयात साक्षर होणे आवश्यक आहे . त्यावरील वॉरेन बफे, बेंजामिन ग्रॅहम इ. लेखकांची पुस्तके वाचून स्वतःच्या टिप्स काढा.

२) अल्प मुदतीत खूप श्रीमंत होण्याचा लालची हव्यास टाळावा.

३) अफवांवर विश्वास ठेवून कार्य करू नका. खातरजमा करा.

४) बाजार उच्चांकावर असताना खरेदी करू नका आणि बाजार नीचांकावर असताना घाबरून विक्री करू नका. भावनेच्या भरात व लहरीपणाने निर्णय घेणे टाळा. स्थितप्रज्ञ राहून विवेकाने निर्णय घ्या.

५) सरकारी ध्येयधोरणे व निर्णय यांचा शेअर बाजारावर खूप खोलवर परिणाम होत असतो. त्यांचा अभ्यास करा.

६) आंतरराष्ट्रीय घडामोडींचाही अभ्यास करा.

७) अर्थव्यवस्थेशी निगडित विविध देशी-विदेशी संस्थांचे मूल्यांकन व श्रेणी यांचा अभ्यास करा.

८) बाजारातील बदलत्या ट्रेंडचा अभ्यास करा.

९) संयम राखा.

गुंतवणूक कुठे करावी?

ज्योतिषशास्त्र व शेअर बाजार यांचा एकमेकांशी अत्यंत निकटचा संबंध आहे. १२ राशी, १२ ग्रह, २७ नक्षत्रे या सर्वांचा शेअर बाजारावर निश्चितपणे परिणाम होत असतो. मेष लग्नाची नैसर्गिक कालपुरुष कुंडली प्रमाण मानून राशिचक्रातील ग्रहांची गोचर भ्रमणे विचारात घेतल्यास उत्तम परिणाम मिळू शकतात. संजय बुधवंत यांची अनेक वर्षे गुरू ग्रहाच्या राशीपरत्वे होणाऱ्या गोचर भ्रमणातून भाकिते तंतोतंत बरोबर आली आहेत.

उदाहरण – गुरू मीनेत असताना शिपिंग शेअर्स, मेषेत असतान संरक्षण क्षेत्र, रेल्वे व ऊर्जा, वृषभेत असताना बँकिंग फायनान्स या सेक्टर्समध्ये मोठी तेजी येईल ही भाकिते संजय बुधवंत यांची तंतोतंत बरोबर झाली आहेत. जून २०२५ ते जुलै २०२६ या काळात गुरू मिथुन राशीत भ्रमण करणार असल्याने आयटी, एअरलाइन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता, कम्युनिकेशन्स, मीडिया, मोबाईल या क्षेत्रांमध्ये खूप मोठी तेजी संभवते. त्याआधीच या क्षेत्रांत गुंतवणूक केल्यास नक्कीच लाभ होईल. दूरदृष्टीने नियोजन अत्यंत आवश्यक असते. बाजाराच्या अंतर्प्रवाहांना समजून घेऊन गुंतवणूक केल्यास होणारा नफा काही पटीत असेल.

राशी व क्षेत्र :

१) मेष- आरोग्य, संरक्षण, अभियांत्रिकी, मसूर डाळ, वैद्यकशास्त्र, तांबे, अल्कोहोल, तंबाखू, वीज, स्फोटके, रसायने, रेल्वे.
२) वृषभ- बँकिंग, फायनान्स, साखर उद्योग, बागायती शेती, अलंकार, सौंदर्यप्रसाधने, संगीत व मनोरंजन क्षेत्र, कापड, कार, शेअर्स, हिरा, तांदूळ, मसूर डाळ.
३) मिथुन- माहिती तंत्रज्ञान, मोबाईल, इंटरनेट, वर्तमानपत्र, ग्रंथ, मध्यस्थी वा सल्लागार, दळवळण, तांबे, मूग.
४) कर्क- पाणी, धरण, जलविद्युत, मासे, मीठ, तांदूळ, चांदी, मोती, ॲल्युमिनियम, जस्त, जहाज उद्योग, शीतयपेये, शिक्षण.
५) सिंह- राजा, सरकार, सरकारी कंपन्या, ऊर्जा, अणुऊर्जा, सेबी, संसद, सौरऊर्जा, शस्त्रे, रिजर्व्ह बँक, सोने, तांबे, गहू.
६) कन्या- अन्नदान, अन्नप्रक्रिया उद्योग, प्रकाशन, सेवा क्षेत्र, माहिती तंत्रज्ञान, कापड, कारखाने बीएसई, एनएसई
७) तूळ- चित्रपट, जाहिरात क्षेत्र, हॉटेल, मनोरंजन, हिरे, दागिने, सौंदर्यप्रसाधने, पर्यटन, फॅशन, रंग तांदूळ.
८) वृश्चिक- वैद्यकीय साधने, औषध निर्माण, रसायने, संरक्षण, ॲसिड, स्फोटके, लष्कर, पोलिस, सीबीआय.
९) धनू- न्यायव्यवस्था, रिजर्व्ह बँक, धर्म, शिपिंग, इन्शुरन्स, खाद्यतेल, साखर, सोने, शिक्षण.
१०) मकर- चामडे, खाण, लोखंड, कच्चे तेल, नैसर्गिक वायू, चामडे, धर्म, पर्यटन बांधकाम.
११) कुंभ- अवकाशविज्ञान, उच्च तंत्रज्ञान, हवाई क्षेत्र, कृत्रिम बुद्धिमता, अभियांत्रिकी, बायोटेक, अणुविज्ञान,
संशोधन, विद्यापीठ.
१२) मीन- फायनान्स, बांधकाम क्षेत्रे, समुद्र संपत्ती आयात-निर्यात, शिपिंग, जलपर्यटन, कागद, प्लास्टिक, उद्योग क्षेत्र, धार्मिक संस्थाने, रुग्णालय.
वरीलप्रमाणे राशींतून ग्रहांच्या गोचरक भ्रमणाचा विचार केला  पाहिजे आणि गुंतवणूक केली पाहिजे.

Story img Loader