NCP Ajit Pawar Astrology Prediction: गेल्या काही दिवसांपासून अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही आमदारांना घेऊन राज्य सरकारला पाठिंबा देणार असल्याचं सांगितलं जात आहे. ‘द न्यू इंडियन एक्स्प्रेस’नं यासंदर्भातलं वृत्त दिलं असून त्यात अजित पवारांकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या ५३ पैकी ४० आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र तयार असल्याचा दावा करण्यात आला आहे. राज्यात खरंच राजकीय भूकंप होणार का? यावर अनेक तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. अशातच ज्योतिषतज्ज्ञ उदयराज साने यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या भविष्याविषयी ग्रह -ताऱ्यांच्या स्थितीनुसार अनुमान लावले आहे .
बंडखोरी निश्चित? कारण…
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कुंडलीत १५ एप्रिल नंतर मेष रवीचे भ्रमण होणार आहे तर मूळ कुंडलीतील गुरु-शनी सुद्धा प्रबळ होणार असल्याने पक्षातील इच्छुकांना थोपवणे त्यांनाही शक्य होणार नाही. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या कुंडलीत हे मेष रवीचे भ्रमण प्लूटोच्या केंद्रातून आणि मूळच्या रवीला हा रवी आठवा राहणार असल्याने, या तीनही पक्षाचे उमेदवारीवरून चांगलेच जुंपणार असून, बंडखोरी ही निश्चितपणे होऊ शकते.
महाविकास आघाडीबाबत भविष्यवाणी
दरम्यान, महाविकास आघाडीच्या घटक पक्षांना कुंभ राशीतील शनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव सेनेला तापदायक असल्याने या निवडणुका लढवण्यासाठी जो एकोपा असायला हवा, तसा एकोपा मिळणार नसल्याने उमेदवारांची त्यांच्या स्वतःच्या वैयक्तिक कामावरच मदार असणार आहे, असेही साने यांनी सांगितले आहे.
भाजपच्या कुंडलीत काय?
दुसरीकडे, भाजपाच्या कुंडलीत सुद्धा हे मेष रविचे भ्रमण संपूर्ण चांगले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला रवीचे भ्रमण संमिश्र आहे. कुंभ राशीतील शनी भाजपा व मुख्यमंत्र्यांच्या शिवसेनेला अनुकूल असून, हा कुंभेचा शनी काहीसा तापदायक ठरू शकतो.
दरम्यान, यासंदर्भात शरद पवार, सुप्रिया सुळे यांनी कोणतेही भाष्य करण्यास नकार दिला आहे. अजित पवार यांच्याबाबत सुरु असलेल्या चर्चा अफवा असल्याचे शरद पवार यांनी म्हंटले आहे तर सुप्रिया सुळे यांनी बैठका झाल्याबाबत आपल्याला काहीही माहित नसल्याचे सांगितले आहे.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे, यात अंधश्रद्धा पसरवण्याचा हेतू नाही)