Akshaya Tritiya 2024: वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला दर वर्षी अक्षय्य तृतीया हा सण साजरा केला जातो. हिंदू धर्मात या सणाला अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जाते. यंदा अक्षय्य तृतीया १० मे रोजी साजरी केली जाईल. या शुभदिनी गजकेसरी, शश आणि सुकर्मा हे योगदेखील असणार आहेत, ज्यामुळे हा दिवस नवीन वस्तू खरेदी तसेच नव्या कामाची सुरुवात करण्यासाठी खूप उत्तम मानला जाईल.
अक्षय्य तृतीया तिथी:
हिंदू पंचांगानुसार, अक्षय्य तृतीया तिथीची सुरुवात १० मे रोजी पहाटे ४ वाजून १७ मिनिटांनी होणार असून ती ११ मे मध्यरात्री २ वाजून ५० मिनिटांपर्यंत असेल.
अक्षय्य तृतीया शुभ मुहूर्त:
अक्षय्य तृतीयेचा शुभ मुहूर्त १० मे रोजी सकाळी ७ वाजून ४४ मिनिटांपासून ते दुपारी १२ वाजून २० मिनिटांपर्यंत असेल. या वेळेतदेखील तुम्ही शुभ कार्य, नव्या वस्तू खरेदी करू शकता.
अक्षय्य तृतीयेला वस्तू खरेदी करण्याचा शुभ मुहूर्त
अक्षय्य तृतीया हा दिवस साडे तीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो, त्यामुळे या दिवशी कपडे, सोने-चांदी, वाहन, घर खरेदी करणे शुभ मानले जाते.
सकाळी ०५:३३ ते १०:३७ पर्यंत.
दुपारी १२:१८ ते ०१:५९ पर्यंत.
संध्याकाळी ०५:२१ ते ०७:०२ पर्यंत.
रात्री ०९:४० ते १०:५९ पर्यंत.
अक्षय्य तृतीयेला श्री विष्णू आणि देवी लक्ष्मीच्या पूजेचे महत्त्व :
मत्स्य पुराणानुसार, अक्षय्य तृतीयेच्या दिवशी अक्षता आणि फुलांच्या दिव्याने श्री विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा-आराधना केल्यास त्यांची विशेष कृपा प्राप्त होते. तसेच या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करावे. अक्षय्य तृतीयेला आपल्या कुवतीप्रमाणे गरजू व्यक्तीला धान्य, गूळ, सातू, पैसे, वस्त्र हे देखील दान करू शकता.
अक्षय्य तृतीयेचे महत्त्व :
पौराणिक ग्रंथांनुसार, अक्षय्य तृतीयेच्या दिवशीच श्री विष्णूंचा सहाव्या परशुराम अवताराचा जन्म झाला होता, तसेच या दिवशी देवी गंगादेखील पृथ्वीवर अवतरली होती. याच दिवसापासून सतयुग, द्वापारयुग आणि त्रेतायुगाच्या सुरुवातीची गणना केली जाते.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)