Akshaya Tritiya 2025 Exact Date Shubha Muhurat: हिंदू पंचांगानुसार वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेला अक्षय्य तृतीया हा सण साजरा केला जातो. हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो. या दिवशी शुभ कामाची सुरुवात, पूजा-आराधना, जप-तप, दान केल्याने अक्षय्य पुण्याची प्राप्ती होते, असे म्हटले जाते. तसेच या दिवशी सोने-चांदी, वाहन, प्रॉपर्टी खरेदी करणेदेखील शुभ मानले जाते. चला तर मग यंदाच्या अक्षय्य तृतीयेची तारीख, शुभ मुहूर्त जाणून घेऊ…

अक्षय्य तृतीयेची तिथी २९ एप्रिल रोजी संध्याकाळी ५ वाजून ३१ मिनिटांनी सुरू होईल आणि ३० एप्रिल रोजी दुपारी २ वाजून १२ मिनिटांनी समाप्त होईल. उदय तिथीनुसार ३० एप्रिल (बुधवार) रोजी अक्षय्य तृतीयेचा सण साजरा केला जाईल.

अक्षय्य तृतीयेच्या पूजेचा शुभ मुहूर्त

बुधवार, ३० एप्रिल रोजी पहाटे ५ वाजून ३१ मिनिटांपासून अक्षय्य तृतीयेच्या पूजेचा शुभ मुहूर्त सुरू होईल आणि तो दुपारी १२ वाजून १८ मिनिटांपर्यंत असेल.

अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करण्याचा शुभ मुहूर्त

३० एप्रिल रोजी सकाळी ५ वाजून ४१ मिनिटांपासून ते दुपारी २ वाजून १२ मिनिटांपर्यंत असेल. तसेच तुम्ही जर सोने-चांदीची खरेदी करू शकत नसाल, तर अक्षय्य तृतीयेला तुम्ही माती, पितळेची भांडी किंवा पिवळी मोहरीदेखील खरेदी करू शकता.

अक्षय्य तृतीयेचा पूजा विधी

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी पहाटे उठून, स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे. त्यानंतर घर स्वच्छ करून श्री विष्णू आणि देवी लक्ष्मीच्या मूर्ती किंवा फोटोची पूजा करावी. श्री विष्णूला चंदन, पिवळे फूल आणि देवी लक्ष्मीला कुंकू, गुलाब, कमळ अर्पण करावे. सुका मेवा, खीर, बत्तासे, गूळ अर्पण केल्यानंतर श्री विष्णू आणि देवी लक्ष्मीची स्तोत्र, मंत्राने मनोभावे आराधना करावी. त्यानंतर आरती करून पूजा संपन्न करावी. या दिवशी गरीब, गरजू व्यक्तीला दान करावे. अक्षय्य तृतीयेला केल्या जाणाऱ्या दान, मंत्र, जप, यज्ञातून मिळणारे पुण्य अक्षय असते; जे व्यक्तीच्या आयुष्यात सुख-समृद्धी घेऊन येते.

अक्षय्य तृतीयेचे महत्त्व

पौराणिक ग्रंथांनुसार, अक्षय्य तृतीयेच्या दिवशीच श्री विष्णूंचा सहाव्या परशुराम अवताराचा जन्म झाला होता, तसेच या दिवशी देवी गंगादेखील पृथ्वीवर अवतरली होती. याच दिवसापासून सतयुग, द्वापारयुग व त्रेतायुगाच्या सुरुवातीची गणना केली जाते.

(टीप : वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)