April 2023 Horoscope 12 Zodiac Signs: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह प्रत्येक महिन्यात राशी व नक्षत्र परिवर्तन करत असतात. शनी- मंगळ, राहू- केतू यांसारखे ग्रह सुद्धा काही अंशी भ्रमण कक्षा बदलत असतात. ज्योतिष अभ्यासकांच्या माहितीनुसार ग्रहांच्या स्थितीनुसार एप्रिल महिना हा अत्यंत शुभ सिद्ध होऊ शकतो. एप्रिल महिन्याच्या ३० दिवसांमध्ये सूर्य, गुरु, शुक्र ग्रह गोचर करून राशी बदल करणार आहेत. ६ एप्रिलला शुक्र, १४ एप्रिलला ग्रह राजा सूर्य (मीन मधून मेष), २२ एप्रिलला गुरू ग्रह असे तीन मुख्य ग्रह एप्रिलच्या विविध टप्प्यांमध्ये गोचर करणार आहेत. तसेच एप्रिल महिन्यात मेष राशीमध्ये गुरु, राहू, सूर्य, बुध यांची युती होणार आहे. या युतीतून गुरूचा राजयोग व चतुर्ग्रह योग्य निर्माण होणार आहे. या राजयोगांसह एप्रिल महिन्याचे ३० दिवस काही राशींना राजवैभव तर काहींना कष्ट सहन करावे लागू शकतात. तुमच्या राशीला येणारा एप्रिल महिना कसा जाणार याविषयी ज्योतिषतज्ज्ञ सोनल चितळे यांनी दिलेले सविस्तर राशीभविष्य पाहूया…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

April 2023 Astrology: एप्रिल महिन्याचे १२ राशींचे भविष्य

मेष (Aries Zodiac)

२१ एप्रिलला गुरू आपल्या मेष राशीत प्रवेश करणार आहे. स्पर्धा परीक्षा देण्याची तयारी करत असाल तर २१ एप्रिलनंतर यश मिळण्याच्या शक्यता अधिक दाट होत आहेत. शिक्षणासाठी परदेशी जाण्याचा योग चांगला आहे. संबंधित कामे मार्गी लागतील. शनी आणि गुरू या ग्रहांची साथ चांगली मिळेल. अधिक मेहनत घेऊन परीक्षेची तयारी करावी. कामाच्या ठिकाणी आपला प्रामाणिकपणा आणि मेहनत यामुळे अडचणीतून मार्ग निघेल. अन्याय निदर्शनास आणून द्याल. कामाची पोचपावती नक्की मिळेल. आर्थिकदृष्टय़ा उत्कर्ष होईल.

वृषभ (Taurus Zodiac)

व्यय स्थानातील उच्चीचा रवी राहूसह असल्याने गरज नसताना धाडसी निर्णय घेऊ पाहाल. मोठी जोखीम पत्करू नका. महिन्याच्या मध्यापर्यंत गुरुबल आहे. तोवर स्वतःला सावरणे शक्य होईल. कौटुंबिक वातावरण संमिश्र असेल. आपली मते घरात सर्वांना पटतीलच, असे गृहीत धरू नका. विद्यार्थी वर्गाने सामंजस्य दाखवावे. चिडचिड टाळा. ऊर्जेचा अपव्यय करू नका. उष्णतेचे विकार डोकं आणि पोटावर परिणाम करतील. शांत डोक्याने सर्व समावेशक विचार लाभकारी ठरेल.

मिथुन (Gemini Zodiac)

शनी मंगळाच्या शुभ योगामुळे धाडसी निर्णय घेऊ शकाल. या निर्णयाच्या परिणामांची आपणास पूर्वकल्पना असेलच. लाभ स्थानातील मेष राशीत २१ एप्रिलला गुरू प्रवेश करेल. गुरूसह राहू, हर्षल आणि रवीचे भ्रमण काही काळ अनिश्चितता दाखवेल. वैचारिक गोंधळ होण्याची शक्यता आहे. नोकरी व्यवसायात कोणतेही मत मांडताना सावधगिरी बाळगावी. विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेची कसून तयारी करावी. विवाहोत्सुक मंडळींनी २१ एप्रिलनंतर जोडीदाराचे संशोधन सुरू करावे. अपेक्षेप्रमाणे आणि आचार विचारांमध्ये समानता असणारा जोडीदार मिळेल.

कर्क (Cancer Zodiac)

लाभ स्थानातील स्वगृहीचा शुक्र आर्थिक लाभ करून देईल. दशमातील उच्चीचा रवी अधिकारपद भूषवेल. त्याच्यासह राहू हर्षल असल्याने स्पर्धेला सामोरे जावे लागेल. विद्यार्थ्यांना आपल्या मेहनतीचा योग्य मोबदला मिळेल. जोडीदाराची मनस्थिती समजून घ्यावी. २१ एप्रिलला* गुरू आपल्या दशमातील मेष राशीत प्रवेश करेल. महत्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडाल. मुलांच्या समस्या सोडवताना भावनिक दृष्टिकोन बाजूला ठेवून विवेकी विचार करावा. हे मुलांच्याही फायद्याचे ठरेल. डोकेदुखीचा त्रास संभवतो.

सिंह (Leo Zodiac)

एप्रिल मध्यातील रवीचे भाग्य स्थानातील भ्रमण हितकारक असेल. २१ एप्रिलला गुरुचा मेष राशीतील प्रवेश आपल्याला नवी ऊर्जा, नवे चैतन्य देईल. रेंगाळलेली कामे पूर्ण करण्याचा सपाटा सुरू कराल. यश, कीर्ती, मान, पैसा मिळवाल. कष्टाचे चीज होईल. विद्यार्थी वर्गाला परीक्षेत अपेक्षित यश मिळेल. परदेशाशी संबंधित कामे झपाट्याने मार्गी लागतील. प्रयत्नाशिवाय कोणतीही हालचाल होणार नाही. मेहनतीला चांगले फळ मिळणार आहे हे लक्षात असुद्या. पडझड होणे, मार लागणे यापासून सावधगिरी बाळगावी.

कन्या (Virgo Zodiac)

भाग्य स्थानातील शुक्र उच्च शिक्षणासाठी पूरक ठरेल. अडकलेली कामे पुढे सरकतील. कामकाजावर मंगळाचा प्रभाव पडेल. इतरांच्या मागे लागून कामं पूर्ण करून घ्याल. देणेकऱ्यांकडे तगादा लावाल. डोक्याचा ताप वाढेल. २१ एप्रिलला सप्तमातील गुरू अष्टमात, मेष राशीत प्रवेश करत आहे. तेव्हापासून आपले गुरुबल कमजोर होत आहे. ताण तणाव वाढेल. आर्थिक दृष्ट्या कोणताही निर्णय घेताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. विद्यार्थी वर्गाने डोळसपणे मेहनत घ्यावी. सर्दी, खोकला, ताप असे त्रास उदभवतील.

तूळ (Libra Zodiac)

भाग्य स्थानातील मंगळ आर्थिक गणिते पुन्हा स्थिर स्थावर करेल. नव्या संकल्पना यशस्वी होतील. नोकरी व्यवसायातील प्रकल्प मार्गी लागतील. २१ एप्रिलला होणारा गुरूचा मेष राशीतील प्रवेश लाभकारक ठरेल. जोडीदारासह मिळते जुळते घेण्यासाठी ज्येष्ठ मंडळी मध्यस्थी करतील. विद्यार्थी वर्गाने घेतलेल्या जीवापाड मेहनतीचे चीज होईल. हिमतीने पुढे जाल. डोळे आणि डोकं यांचे आरोग्य सांभाळावे. गुंतवणूकदारांनी फसव्या तेजीला भुलू नये.

वृश्चिक (Scorpio Zodiac)

सप्तमातील वृषभेचा शुक्र जोडीदारासह खेळीमेळीचे नाते प्रस्थापित करेल. स्थावर मालमत्तेसंबंधित कामे धिम्या गतीने पुढे सरकतील. बोलणी लाभदायक ठरतील. विद्यार्थी वर्गाने घेतलेली मेहनत फळास येईल. २१ एप्रिलनंतर गुरू मेष राशीत प्रवेश करेल. गुरुबल थोडेसे कमी झाले तरी हिमतीने पुढे जायची तयारी ठेवाल. नोकरी व्यवसायात जोरदार आगेकूच कराल. उत्तम धनयोग येत आहे. मेहनत कमी पडू देऊ नका. रक्तदाब वाढणे, चक्कर येणे असे त्रास वाढतील. अतिदगदग टाळा. वेळेवर विश्रांती घेणेही गरजेचे आहे.

धनु (Dhanu Zodiac)

परदेशासंबंधीत कामे वेग घेतील. उच्च शिक्षणासाठी वा नोकरीनिमित्त परदेशगमन योग आहेत. स्पर्धात्मक परीक्षांची तयारी कराल. आरोग्य चांगले राहील. जोडीदारासह मिळतेजुळते घ्यावे लागेल. नोकरी व्यवसायात प्रगती कराल. धनसंपत्तीत वाढ होईल. कष्टाचे , बुद्धिमत्तेचे कौतुक होईल. 21 एप्रिलला गुरू मेष राशीत प्रवेश करेल. उत्तम गुरुबल प्राप्त होईल. विवाहोत्सुक मंडळींनी वधु वर संशोधन सुरू करावे. संतती प्राप्तीसाठी वैद्यकीय सल्ला घेऊन तसे प्रयत्न सुरू करा. यश मिळेल.

मकर (Capricorn Zodiac)

कामाच्या ठिकाणी कारकीर्द गाजवाल. आपली मते सर्वांपुढे ठासून मांडाल. व्यवसायात नवे उपक्रम राबवाल. विद्यार्थी वर्गाला कष्टाचे फळ निश्चित मिळेल. पंचमातील शुक्राचा अनेक दृष्टीने लाभ होईल. करियर, अभ्यास यांसह कला जोपासाल. प्रेमसंबंधात नाती दृढ होतील. विवाहीत दाम्पत्यांनी एकमेकांच्या कर्तृत्वाचे कौतुक करावे. शनीच्या साथीने गुंतवणूक चांगली होईल. छातीत जळजळ होईल. पित्ताचा त्रास वाढेल.

कुंभ (Aquarius Zodiac)

द्वितीय आणि तृतीय स्थानातील रवीचे भ्रमण अतिशय हितकारक असेल. धनसंपत्ती वाढेल. आत्मविश्वास दुणावेल. नोकरीच्या कामात हिंमतीने आगेकूच कराल. व्यवसायातील खाचाखोचा जाणून घ्याल. अंदाज खरे ठरतील. बुद्धिमत्तेच्या जोरावर गुंतवणूकीचा चांगला अभ्यास कराल. विद्यार्थी वर्गाला अभ्यासावर लक्ष
केंद्रीत करावे लागेल. प्रलोभनांपासून दूर राहावे. परदेशी शिक्षणाची तयारी करायला सुरुवात करावी. वातविकार बाळावण्याची शक्यता आहे.

मीन (Pisces Zodiac)

चंचल मनाला स्थैर्य मिळण्यासाठी शनीची मदत होईल. साडेसातीचा हा पहिला टप्पा बऱ्याच नव्या गोष्टी शिकवेल. न बदलता येणाऱ्या गोष्टींचा स्वीकार केल्याने प्रश्न झटपट सुटतील. नोकरीतील कामानिमित्त प्रवास कराल. व्यवसायात धोपट मार्ग सोडून आड मार्ग स्वीकारावा लागेल, अशी परिस्थिती निर्माण होईल. विवेकबुद्धी जागरूक ठेवावी. डोकं शांत व स्थिर ठेवण्यासाठी आपले छंद जोपासवेत. २१ एप्रिलला गुरू मेष राशीत प्रवेश करणार आहे. गुरुचे पाठबळ चांगलेच असेल.

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: April 2023 astrology news shani budh shukra yuti to give these zodiac signs more money profit love new job bank balance svs