आषाढ महिन्याच्या शुद्ध पक्षातील एकादशीला आषाढी एकादशी किंवा देवशयनी एकादशी म्हटले जाते. महाराष्ट्रात आषाढी एकादशीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. आषाढी एकादशीनिमित्त असंख्य भक्त पायी पंढरपूरला जातात आणि विठ्ठलाचे दर्शन घेतात. ही वर्षानुवर्षे चालणारी महाराष्ट्रातील परंपरा आहे.
सध्या आषाढ महिना सुरू आहे. राज्यातून विविध भागांतून येणारे लोक पायी पंढरपूरच्या दिशेने निघाले. या वर्षी आषाढी एकादशी केव्हा आहे? आषाढी एकादशीचा शुभ मुहूर्त कधी आहे? याविषयी आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत.
आषाढी एकादशी केव्हा आहे?
हिंदू पंचांगानुसार, आषाढी एकादशी महाराष्ट्रसह देशभरात २९ जून २०२३ रोजी गुरुवारी साजरी करण्यात येईल.
आषाढी एकादशीचा शुभ मुहूर्त
आषाढी एकादशी २९ जूनला पहाटे ३ वाजून १८ मिनिटांनी प्रारंभ होणार असून एकादशीची समाप्ती ३० जून पहाटे २ वाजून ४२ मिनिटांनी होणार आहे.
हेही वाचा : तळहातावर जर ‘V’आकाराचे चिन्ह असेल तर नशिबाला मिळेल कलाटणी? मिळू शकतो अपार पैसा
आषाढी एकादशीचे महत्त्व आणि पूजा
आषाढी एकादशीला देवशयनी एकादशीही म्हटले जाते. पुराणामध्ये सांगितल्याप्रमाणे श्री विष्णू बळीराजाच्या राज्याचे संरक्षण करण्यासाठी द्वारपाल म्हणून पाताळात जातात. हा काळ आषाढी एकादशीचा असतो आणि कार्तिकी एकादशीला परत येतात. त्यामुळे या दोन्ही एकादशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे.
पांडुरंग किंवा विठ्ठल हे श्री विष्णूचे अवतार मानले जातात. त्यामुळे आषाढी एकादशीला लाखो भक्त विठ्ठलाची आराधना करतात आणि पंढरपूरला जातात. या दिवशी विठ्ठलाची आराधना केली जाते. असे म्हणतात की पहाटे स्नान करून विष्णू किंवा विठ्ठलाची पूजा करावी. संपूर्ण दिवस एकदशीचे व्रत करावे आणि हरिभजन करून देवाचे नामस्मरण करावे, असे मानले जाते.