शिवसेना हे पक्षनाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय नुकताच निवडणूक आयोगाने जाहीर केला. हा ठाकरे गटासाठी मोठा फटका मानला जात आहे. या निर्णयाला ठाकरे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलंय. मात्र, त्याची सुनावणी अद्याप प्रलंबित आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाला नेमकी भविष्यात कोणती आव्हानं पाहावी लागणार आहेत? याविषयी तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. या पार्श्वभूमीवर ज्योतिषतज्ज्ञ उल्हास गुप्ते यांनी भाकित वर्तवलं आहे. तसेच, उद्धव ठाकरेंच्या अडचणी त्यांच्या जवळच्या व्यक्तींमुळे वाढत असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
उद्धव ठाकरेंनी शपथ घेतल्याचा दिवस अशुभ?
उद्धव ठाकरेंनी चुकीच्या दिवशी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याचा दावा उल्हास गुप्ते यांनी केला आहे. “मनात नसतानाही उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपद घेण्याचा आग्रह करण्यात आला. त्यानंतर संकटांची मालिकाच सुरू झाली. उद्धव ठाकरेंनी २८ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्राचे २९वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. पण तो दिवसही फारसा चांगला नव्हता”, असं मत उल्हास गुप्तेंनी मांडलं आहे.
सिंह राशीमुळे उद्धव ठाकरेंची धीरोदात्त मानसिकता
दरम्यान, उद्धव ठाकरेंची संकटातही ठाम राहण्याची धीरोदात्त मानसिकता त्यांच्या सिंह राशीतून येत असल्याचं उल्हास गुप्ते यांचं मत आहे. “मंत्रीपद स्वीकारल्यानंतर विरोधी पक्षांच्या प्रश्नांचा भडीमार – त्यात करोना काळ त्यात खूप धावपळ झाली. चतुर्थात गोचरीचे शनी- केतू मानसिक व शारिरीक स्वास्थ बिघडवत होते. कालांतराने पक्षात फूट पडून मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर पक्षचिन्ह व शिवसेना पक्षही दूर गेला, अशा करूण अवस्थेत स्वत:ला सावरून ते कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवताना दिसले”, असं उल्हास गुप्तेंचं म्हणणं आहे.
ह्रदय आणि मणक्याचा आजार
“उद्धव ठाकरेंच्या नवमान भाग्यात असलेला अष्टमेश मंगळ हा हिनबली वृषभ राशीत आहे. त्यामुळे हृदयाविषयी आजार तर षष्टात केतू व षष्टेश चतुर्थात वक्री शनी त्यांना मणक्यांचा आजार दाखवतो. पण या सर्वांवर मात करून आपलं शारीरिक- मानसिक दु:ख बाजूला सारून ते हसतमुखाने हात जोडून जनतेसमोर येतात. खरं तर ही ताकद हे बळ चतुर्थातील स्वराशीचा गुरु त्यांना देत आहे. त्यांच्या मूळ जन्म पत्रिकेत षष्ठात केतू आहे त्याच्या जोडीला १७ जानेवारीला शनी आला आहे त्यामुळे या दोघाच्या बळावर ते येणाऱ्या संकटाला सामोरे जातील”, असं भाकित उल्हास गुप्ते यांनी वर्तवलं आहे.
उद्धव ठाकरेंच्या पत्रिकेतील द्वादशेश एकादशात रवि आहे. त्यांच्या जवळची माणसे वाटेल तसे बोलून त्यांना अधिक संकटात टाकत आहेत. पण त्यांच्या भिडस्थ स्वभावामुळे ते स्पष्ट बोलू शकत नाहीत, अशी बाजू उल्हास गुप्तेंनी मांडली आहे.