आपल्या राशीला शनि असला की, अनेकांना धडकी भरते. पण ज्योतिषशास्त्रात शनि प्रभावापासून दिलासा मिळण्यासाठी काही उपाय सांगण्यात आले आहेत. जेव्हा जेव्हा शनिवारी अमावस्या तिथीचा योग असतो, तेव्हा त्या दिवसाला शनैश्चरी अमावस्या म्हणतात. यावेळी शनि अमावस्या ३० एप्रिल रोजी येत आहे. या दिवशी आंशिक सूर्यग्रहण देखील आहे. त्यामुळे या दिवसाचे महत्त्व अधिकच वाढले आहे. या दिवशी शनिदेवाची पूजा केली जाते. तसेच ज्या लोकांना शनि साडेसाती आणि अडीचकी आहे, त्यांनी या दिवशी उपाय करून शनि प्रभावापासून दिलासा मिळवू शकतात. चैत्र अमावस्येला ग्रह आणि नक्षत्रांचा अत्यंत दुर्मिळ संयोग पाहायला मिळत आहे. या दिवशी सूर्य, चंद्र आणि राहू मेष राशीत तर शनि आणि मंगळ कुंभ राशीत असतील. तर गुरू आणि शुक्र मीन राशीत एकत्र असतील.
शनिदेवाची पूजा करण्यासाठी शुभ मुहूर्त
चैत्र अमावस्या शनिवार ३० एप्रिल २०२२ रोजी आहे. चैत्र अमावस्या तिथी ३० एप्रिल रोजी दुपारी १२ वाजून ५९ मिनिटांनी सुरू होईल आणि १ मे रोजी दुपारी १ वाजून ५९ मिनिटांनी समाप्त होईल. त्यामुळे ३० एप्रिलला संध्याकाळी तुम्ही शनिदेवाची पूजा करू शकता.
अशा प्रकारे करा शनिदेवाची पूजा
शनि अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करून लाकडी चौरंग मांडा आणि त्यावर काळे कापड टाका. यासोबतच शनिदेवाची मूर्ती, यंत्र आणि सुपारी स्थापित केल्यानंतर मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. शनिदेवांना अबीर, गुलाल, सिंदूर, कुमकुम, काजल लावून निळी फुले अर्पण करा. तसेच मोहरीच्या तेलात तळलेली पुरी आणि इतर वस्तू शनिदेवाला अर्पण करा.
मोहरीच्या तेलाचा दिवा लावा
शनि अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी शनिदेवाच्या मूर्तीसमोर मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. तसेच त्यांना काळे वस्त्र अर्पण करावे. यानंतर शनि चालिसाचे पठण करावे. त्याचबरोबर या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावावा. असे केल्याने पितृदोषापासूनही मुक्ती मिळते.
अजून चार दिवस! धनु राशीची शनि साडेसातीतून होणार सुटका
हनुमंताची पूजा करा
शनि अमावस्येच्या दिवशी शनिदेवासोबत बजरंगबलीचीही पूजा केली जाते. हनुमानजींच्या भक्तांवर शनिदेव नेहमी कृपा करतात. शनिदेवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी शनि अमावस्येच्या दिवशी हनुमान चालिसाचा पाठ अवश्य करा. हनुमानजींचे दर्शन घेऊन त्यांची पूजा केल्याने शनिदेवाचे सर्व दोष आणि अडथळे लवकर दूर होतात.
रुद्राक्ष धारण करा
शनि अमावस्येच्या दिवशी सात मुखी रुद्राक्ष गंगाजलात धुवून धारण करावे. असे केल्याने सर्व समस्या दूर होतात असे मानले जाते. तसेच शनि अमावस्येच्या दिवशी ‘ओम प्रां प्रीं प्रौं स: शनैश्चराय नमः’ आणि ‘ओम शं शनैश्चराय नमः’ या दोन मंत्रांचा जप करावा. या दिवशी गरजूंना काहीतरी दान करा.
पितृदोषासाठी हे उपाय करा
शनि अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली चतु:मुखी दिवा लावल्याने धन, वैभव आणि कीर्तीत वृद्धी होते. यासोबत पितृदोषापासूनही मुक्ती मिळते. असे मानले जाते की शनि अमावस्येला पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावल्याने भाविकांच्या जीवनातील आर्थिक संकटे दूर होतात आणि पैशाची कमतरता भासत नाही.
या गोष्टी दान करा
शनि अमावस्येला उडीद डाळ, काळे कापड, काळे तीळ, काळे हरभरे यासारख्या काळ्या वस्तू गरीब व्यक्तीला दान केल्याने शनिदेवांची कृपा मिळते. या दिवशी काळा रंगाचे कपडे घालणं टाळा.