Bhau Beej 2024 Celebration: हिंदू धर्मामध्ये भाऊबीज हा सण प्रत्येक भाऊ-बहिणीसाठी खूप खास मानला जातो. कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या द्वितीया तिथीला हा सण साजरा केला जातो. या दिवशी बहिणी आपल्या भावाला टिळा लावून, त्याचे औक्षण करून, त्याला दीर्घायुष्य मिळावे आणि त्याचे कल्याण व्हावे यासाठी प्रार्थना करतात. त्यानंतर बहीण-भाऊ एकमेकांना भेटवस्तू देतात. यंदा ३ नोव्हेंबर रोजी भाऊबीज साजरी केली जाणार आहे.
भाऊबीजेची तिथी आणि शुभ मुहूर्त (Bhau Beej Shubha Muhurat)
भाऊबीजेची तिथी शनिवार, २ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजून २१ मिनिटांनी सुरू होणार आहे आणि ती रविवार, ३ नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजून ६ मिनिटांनी समाप्त होईल. उदय तिथीनुसार भाऊबीज ३ नोव्हेंबर रोजी साजरी केली जाईल. तसेच या दिवशी सकाळी ११ वाजून ३९ मिनिटांपर्यंत सौभाग्य योग राहील. त्यानंतर शोभन योग लागेल. त्यामुळे भाऊबीजेसाठी ११ वाजून ४६ मिनिटांपर्यंत सर्वोत्तम मुहूर्त असेल.
ब्रह्म मुहूर्त : सकाळी ४ वाजून ५१ मिनिटांपासून ते सकाळी ५ वाजून ४३ मिनिटांपर्यंत.
विजय मुहूर्त : दुपारी १ वाजून ५४ मिनिटांपासून ते २ वाजून ३८ मिनिटांपर्यंत.
गोधूलि मुहूर्त : संध्याकाळी ५ वाजून ३४ मिनिटांपासून ते ६ वाजेपर्यंत.
भाऊबीजेची पौराणिक कथा
पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी मृत्यूचा देव यमराज आपली बहीण यमुनेकडे तिने अनेक वेळा बोलावल्यानंतर तिच्या भेटीला गेला होता. यमुनेने यमराजाला भोजन दिले आणि त्याचे औक्षण करून, त्याच्या सुखी आयुष्यासाठी प्रार्थना केली. मग यमराजाने प्रसन्न होऊन बहीण यमुनेला वरदान मागण्यास सांगितले. यमुना म्हणाली की, तू दरवर्षी या दिवशी माझ्या घरी ये आणि या दिवशी जी बहीण आपल्या भावाला औक्षण करील, ती तुला घाबरणार नाही. यमराजाने यमुनेला तसे वरदान दिले. मग या दिवसापासून भाऊबीज उत्सवाला सुरुवात झाली, असे म्हणतात.