-उल्हास गुप्ते

Guru Gochar 2023: तब्बल १२ वर्षांनी २२ एप्रिल रोजी गुरू ग्रहाचा प्रवेश मेष राशीत होत आहे. गुरू हा आकाश तत्त्वाचा एकमेव ग्रह आहे. आकाश तत्त्व हे प्रसरण पावत असते, विस्तारित होत असते. गुरूचा संबंध ज्या राशी ग्रहाशी व स्थानाशी येतो त्या त्या संबंधी येणाऱ्या गोष्टींना तो विस्तारित असतो. मेष ही मंगळाची राशी नि मंगळ हा गुरूचा मित्र ग्रह त्यामुळे नकळत मंगळाच्या भूमिकेचाही प्रवेश मेष राशीत होतो. सध्या मेष राशीत राहू आधीच स्थानापन्न झाला आहे. त्यात गुरूप्रवेश एकूण मंगळाच्या राशीत होणारा हा गुरू-राहू चांडाळ योग २८ नोव्हेंबर २०२३ पर्यंत असणार आहे. त्यानंतर राहू आपल्या वक्रगतीने मीन राशीत प्रवेश करील. गुरू हा खरा विनयशील, बुद्धिमान ज्ञानी ग्रह. अग्नितत्त्वाच्या राशीप्रवेशामुळे गुरूचे रूप अहंकारमय होईल नि त्यात राहूचा सहवास यामुळे ही अवस्था संभ्रमित असेल. याचे पडसाद समाजात जास्त प्रमाणात दिसून येतील. गैरसमज, चुकीच्या मतांशी ठाम असणे, अहंभावाचा अतिरेक करणे, अशा घटनांचे प्रदर्शन समाजात दिसून येईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दिखाऊपणा, मोठेपणा आदी गोष्टी धार्मिक नि राजकारणाच्या मैदानांत दिसून येतील. आणि त्यात प्रसारमाध्यमांना नामी संधी लाभून ते आपला कार्यभाग व्यवस्थित पार पाडतील. मात्र या काळात महत्त्वाचे शोध लागतील. कॉम्प्युटर इलेक्ट्रॉनिक्स या विषयांना वेगळे महत्त्व प्राप्त होईल. मानवी फायद्याच्या आणि तोट्याच्या दोन्ही तऱ्हेच्या नवीन गोष्टीत संशोधने होतील. त्यातून वस्तू तयार होतील. मात्र यातील सकारात्मक कामात गुरूचा सहभाग महत्त्वाचा राहील. मोठमोठे आर्थिक घोटाळे उघडकीस येतील. त्यामुळे देशाची आर्थिक बाजू वर-खाली होऊ शकते. तसेच जातीय, धार्मिक वादविवाद वाढतील. यात धार्मिक नि राजकीय पुढाऱ्यांचा सहभाग प्रामुख्याने दिसून येईल पण लोकांनी त्यांच्या भूलथापांना बळी पडू नये. त्यातच आपले हित असेल. देशादेशांत सीमावाद चालू राहतील. तर शेअर बाजार उद्योगधंदे यावरही विपरीत परिणाम दिसून येईल. एकूण हे सारे वातावरण २८ नोव्हेंबर २०२३ पर्यंत चालेल. त्यानंतर चांडाळ योग खऱ्या अर्थाने संपेल. हळूहळू खूपशा गोष्टी पूर्वपदावर येतील. या सर्व गोष्टींवर तिसऱ्या दृष्टीने पाहणारा शनी फारसा उपद्रवी ठरणार नाही.

मेष (Aries Zodiac)

मेष या मंगळाच्या राशीत गुरू-राहू-हर्षल यांचा एकूण सहवास कौटुंबिक सौख्याला त्रासदायक ठरला तरी गुरूची सप्तम स्थानावरील दृष्टी आकाशतत्त्वाच्या नियमाप्रमाणे व्यापक राहील. गैरसमज, वादविवाद फारसे विकोपाला जाणार नाहीत तर व्ययातील मीनेचा नेपच्यून चतुर्थस्थानावर आपली नवपंचम दृष्टी कायम शुभदायक ठेवील. अष्टमेश, लग्नेश मंगळ कुठल्याही स्थानात असला तरी वाहनवेगाचा अतिरेक टाळावा. भाग्येश गुरू लग्नी आहे. राहू जरी सोबत असला तरी गुरू आपल्या उद्योगधंद्यात, नोकरीत मदतीचा ठरेल. नोकरीत नवा बदल, नव्या योजना नकोत. २८ नोव्हेंबरनंतर मात्र त्याचा जरूर विचार करा. त्यात आपल्याला यश लाभेल.

वृषभ (Taurus Zodiac)

व्ययास जरी गुरू-राहू असले तरी दशमातला कुंभेचा शनी आपल्या अस्तित्वातून खूपशा समस्यांना शांत करील. नवमेश दशमात शनी अशा वेगळ्या आशयातून शनीचे वागणे त्याच्या उच्चत्वाला शोभून दिसेल. गुरू जरी राहूच्या चांडाळ योगात फसलेला असला तरी त्यांचा शनीशी होणारा संवाद सुखद, आशीर्वादपरच असणार आहे. व्ययातील हे गुरू-राहू अध्यात्म व गूढ विद्येला खूपसे पूरक ठरणारे असते. वृषभ रास ही हळवी रास स्वत:ला फार त्रास करून घेते पण अशा वेळी नेपच्यूनचे साह्य लाभेल. विचार बदलले की मार्ग बदलतो म्हणून अशा वेळी सकारात्मक विचार, धार्मिक वाचन, मित्रमंडळींत विचारविनिमय, चर्चा यांतून मनाला खूपशी शांतता लाभेल. नोव्हेंबरनंतरचा काळ खूप आनंदी वातावरण निर्माण करील.

मिथुन (Gemini Zodiac)

सध्या स्वराशीत मंगळ पण जेव्हा तो कर्क राशीत येईल तेव्हा संयमाने बोलण्याने आपण स्वत:चे हित साधू शकाल. खूप वेळा समाजात मित्रवर्गात ताठर भूमिका घेऊन वागू नका. एकादशस्थानात होत असलेला गुरू-राहू चांडाळ योग आपल्या मार्गात लहानमोठ्या अडचणी निर्माण करील. काही महत्त्वाची कामे हातातून जाऊ देऊ नका. स्थावर जमिनीचे व्यवहार करताना कागदपत्रे तपासून घ्यावीत. घरातील काही महत्त्वाचे निर्णय घाईने घेऊ नका. सप्टेंबर ते डिसेंबर दरम्यान गुरू वक्री होत आहे. या काळात मोठ्या आर्थिक उलाढाली करू नका. आरोग्याची काळजी घ्या. नवमातला शनी प्रवासाचे योग देईल. त्यातून तो आध्यात्मिक आनंद देईल. सामाजिक क्षेत्रात, राजकारणात २८ नोव्हेंबरनंतर आपल्या अपेक्षा पुऱ्या होतील.

कर्क (Cancer Zodiac)

कर्क ही जलरास तशी हळवी, भावविवश होणारी. या राशीचा स्वामी चंद्र. चंद्र-गुरू एकमेकांचे उत्तम मित्र. त्यामुळे प्रत्येकाच्या आयुष्यात चंद्राच्या पाठीमागे खऱ्या दिलदार बुद्धीचा गुरू सदैव मागे उभा असतो. विशेषत: चंद्र-गुरू युतीची माणसे विद्यादान, बौद्धिक क्षेत्रात खूप महत्त्वाच्या पदावर असतात. दशमातील गुरू आनंदी, सांसारिक सुख भोगणारा उच्च मनोवृत्तीचा असतो. विशेष म्हणजे मेष राशीतील गुरू राजकारण, सामाजिक क्षेत्रात उद्योगधंद्यात आपले कर्तृत्व उत्तमरीतीने दाखवून देतो पण या वेळी गुरूसोबत राहूचे सान्निध्य काहीसे विपरीत गोष्टी घडवून आणण्याकडे असेल! कारण हा दशमस्थानात होणारा चांडाळ योग अहंभाव, गर्विष्ठपणा याकडे झुकला जाईल. पण या सर्वांवर नजर ठेवून असलेला मीन राशीतील नेपच्यून गुरूला आपल्या सत्कर्माची योग्य जाणीव करून देईल. नोव्हेंबर २८ नंतर त्याला आपल्या सन्मानाच्या जागी योग्यरीतीने बसवील.

सिंह (Leo Zodiac)

सिंह राशीचा स्वामी रवी त्यामुळे अशा राशीच्या व्यक्ती खूप साहसी, कर्तृत्ववान असतात. अतिहळुवार भावनाशील नि कनवाळू लोकांशी यांचे फारसे जमत नाही. वेळ काढणे, रटाळ बोलणे यांना आवडत नाही. पण कधी तरी विशिष्ट ग्रहांच्या फेऱ्यात माणूस पूर्ण बदलला जातो. स्वभाव, वागणे, विचार या सर्वांवर त्याचा परिणाम हाेतो. साहसी माणसातला आत्मविश्वास दुरावतो. आपला मार्ग चुकला की अशी सतत हुरहुर लागते. हे सारे होण्याला कारण ग्रहस्थिती ठरते. विशेष म्हणजे सिंह राशीच्या नवमस्थानात होणारा गुरू-राहू चांडाळ योग काहीसा असाच त्रासदायक ठरू शकतो. गुरू-राहूच्या या युतीमुळे सामाजिक कार्यात, राजकारणात आपल्याला मानापमानाच्या प्रसंगांना सामोरे जावे लागेल. नोकरी-उद्योगधंद्यात गैरसमज, संशय आदी गोष्टी वाटेवर उभ्या राहतील. कुटुंबात, नातेवाईक मंडळींत शनी आपल्या वर्चस्वातून कलह निर्माण करू शकतो. पण पराक्रमातील केतू वडिलकीच्या नात्याने या साऱ्या अगतिक प्रश्नांना दूर सारून यातून आपले संरक्षण करील. एकंदरीत काय तर या राहू-गुरूचे निर्माण होणारे पडसाद केतू आपल्या पराक्रमाने दूर करील. या सात महिन्यांच्या नाट्यानंतर गुरू-हर्षलचा प्रगतिशील प्रवास सुरू होईल.

कन्या (Virgo Zodiac)

अष्टमात हर्षल-गुरू-राहू त्यामुळे स्वभावातील एकसूत्रता हरवल्यासारखी जाणवेल. कन्या ही बुधाची बौद्धिक राशी पण या ग्रहाच्या फेऱ्यात आपले अस्तित्व हरवल्यासारखे होते. उद्योगधंद्यात, नोकरीत, भागीदारीत, हळवेपणा आणि भावनिक गुंतवणूक वाढेल. त्यातून महत्त्वाचे निर्णय घेणे कठीण होईल. पण अशा वेळी षष्ठातील शनी या विरोधी विचारांना थांबवील. हे आलेले छोटे वादळ वळवाच्या पावसासारखे हवेत विरून जाईल. अष्टमात गुरू कौटुंबिक सुखात लहानसहान गैरसमज, नातेवाईकांचे रुसणे यावर शांत राहणे हा एकमेव रामबाण उपाय ठरेल. आपले मतप्रदर्शन बिलकूल करू नका. आपल्या पाठीमागे होणाऱ्या चर्चांना फार किंमत देऊ नका. कालांतराने हे वातावरण सहज निवळेल. त्यानंतर गुरूचे नवमस्थानातील आगमन खूपच आनंददायी ठरेल.

तूळ (Libra Zodiac)

कुठलाही ग्रह आपला शत्रू किंवा मित्र नसतो. ग्रह आपल्या वेगवेगळ्या भूमिका कालमानाप्रमाणे पार पाडत असतात. त्यातून मात्र चांगले-वाईट परिणाम आपण अनुभवत असतो. या वर्षी २२ एप्रिल रोजी गुरूचा मेष राशीत प्रवेश होत आहे. या मेष राशीत आधीपासूनच राहू आणि हर्षल आहेत. आता राहू आणि गुरू एकत्र आले आहेत. त्यातूनच हा चांडाळ योग तयार होत आहे. आपल्या तूळ राशीच्या सप्तमस्थानात मेष रास आहे आणि हा चांडाळ योगही सप्तम स्थानात, त्यामुळे उद्योगधंदा, भागीदारी, कौटुंबिक सौख्य या सर्वांसाठी नको तितके सामंजस्य आणावे लागेल आणि त्यात आपल्या राशीत केतूनेही आहे. त्यामुळे माणुसकी, भूतदया या गोष्टी प्रत्यक्षांत आचरणात आणताना आपल्या बुद्धीची घालमेल होईल. पण पंचमातील कुंभेचा शनी नि षष्ठातील गुरूसादृश नेपच्यून आपल्याला आधार देणारे ठरतील. पण हेही दिवस जातील. आणि तूळ राशीची चांडाळ योगातून मुक्तता होईल.

वृश्चिक (Scorpio Zodiac)

या राशीच्या षष्ठमस्थानात गुरू-राहू असा चांडाळ योग होत आहे. एकूण प्रकृतीच्या दृष्टीने आहाराकडे लक्ष द्यावे म्हणजे या काळात आजार टाळणे शक्य होईल. तसेच आपल्या बोलण्यातून शत्रुत्व निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी. कारण शत्रू निर्माण होण्यास आपले बोलणे कारणीभूत ठरू शकते. राजकारणात, सामाजिक क्षेत्रात आपला सहभाग कटकटीचा ठरू शकतो. एखाद्या दुष्टचक्रात शत्रूकडून आपले नांव गोवले जाणार नाही याची काळजी घ्यावी. तहान-भूक-निवारा या गोष्टी उसन्या पैशाने विकत घेऊ शकता पण मानसिक अस्थिरता पैशाने दूर होत नाही. उद्योगधंद्यात, नोकरीत बेपर्वाई, बेजबाबदारपणा टाळा. एकंदरीत या काळात संयमाने वागा. मात्र पंचमातील नेपच्यून आपल्या राशीतील चंद्राशी नवपंचम योग करीत आहे. तो या काळात मोठा आधार ठरेल.

धनू (Sagittarius Zodiac)

धनू ही अग्नितत्त्वाची राशी आहे. आणि पंचमात मेषेचा राहू, सोबत गुरूचे आगमन होत आहे. एकूण पंचमस्थानात होणारा हा चांडाळ योग खूपसा अडचणीचा ठरेल. मेष राशीत प्रवेश करणारा हा गुरू ज्ञान, प्रसन्नता, वक्तृत्व , संयम या अमूल्य गोष्टी घेऊन येतो. पण राहूच्या सहवासात त्याचा खूपच विपर्यास होतो. या चांडाळ योगात आर्थिक बाबतीत खूप सावधानता बाळगावी. व्यापार, उद्योगधंद्यात, शेअर बाजार सट्टा यांत पैशाचा अतिरेक टाळावा. मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष द्यावे. मुख्य म्हणजे मागच्या दाराने येणारी खोटी आपुलकी, प्रेम यात जास्त गुंतू नका. समोरच्याला ओळखण्याचे कसब अंगी असू द्या. म्हणजे मनस्तापाची पाळी येणार नाही. विशेषतः आरोग्याची काळजी घ्या. एकादश स्थानातील केतू आपल्यावर विशेष कृपादृष्टीने पाहत आहे. त्यामुळे तूर्त चिंता नको. राहूच्या राश्यांतरानंतर चांगले दिवस, चांगले क्षण जवळ येतील.

मकर (Capricorn Zodiac)

मुळात साडेसातीचे ओझे डोक्यावर घेऊन उभी असलेली ही रास या राशीच्या चतुर्थस्थानात २२ एप्रिल रोजी होणारा गुरूप्रवेश आणि आधीपासून असलेला राहू यातून होणारा चांडाळ योग मकर राशीला फारसा मानवणार नाही. साधारणपणे हे राहूचे अस्तित्व २८ नोव्हेंबरपर्यंत आहे. तोपर्यंत या राशीला लहान-मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागेल. राहूमुळे अशा लोकांतील उत्साह मावळतो. नोकरी, उद्योगधंद्यातील नेहमी सतर्क वागण्याला अचानक खीळ बसते. चतुर्थस्थानावरून मानसिकतेचा विचार केला जातो. माणसाच्या अंतर्मनाचे कार्य सतत सुरू असते. आपले शरीर कृतिशील श्रमामुळे अधिक उत्साहित होते. तसे मनही विचाराच्या कृतीतून आनंदी होते. आयुष्यात घडणाऱ्या घटनांची व मनांतील बऱ्या-वाईट विचाराचे एक वेगळे नाते असते व ग्रहांच्या चांगल्या-वाईट स्थितीवरून त्याचे प्रत्यंतर आपणास येते. थोडक्यात चतुर्थातला मेषेचा राहू गुरूच्या सदसद्विवेकबुद्धीला नेहमी खीळ घालण्याचे काम करील. उत्साह, आनंद, भावना यात खूपशा बाबतीत तो नकारात्मक भाव निर्माण करण्याचा प्रयत्न करील पण या नाट्यात दशमातील केतू आणि पराक्रम स्थानातील नेपच्यून राहूच्या या कटकारस्थानाला पूर्णपणे छेद देईल. कालांतराने राहूच्या राश्यांतराने मकर राशीच्या उत्साहात फरक जाणवेल आणि त्यातून खूपशा कामांना गती प्राप्त होईल.

कुंभ (Aquarius Zodiac)

स्वराशीत शनी आणि पराक्रमात राहू-गुरूचा चांडाळ योग त्यामुळे कटकारस्थान, सुडाच्या गोष्टी राहू-गुरूच्या मैत्रीतून सहज होऊ शकतात. पण कुंभ रास ही वायुबुद्धीतत्त्वाची रास आपल्या पराक्रम स्थानात हा प्रकार कधीही होऊ देणार नाही. कुंभेतील शनीच्या बुद्धिमत्तेत एक नवीन संस्कार आहे. मुख्यत: चांडाळ योगातून घडणाऱ्या कटू गोष्टींना तो आवर घालून पूर्णपणे विचारांचे सूत्र बदलेल. कारण दु:खाचे मूळ आपल्या बुद्धीत नसून ते आपल्या मनात असते. संकटे नेहमी सहानुभूतीची वाट पाहत असतात. दु:ख जेव्हा आपण बुद्धीच्या निकषावर तपासतो तेव्हा ते तत्त्वहीन आणि फसवे वाटू लागते. कुंभ राशीतील शनी जरी साडेसातीच्या फेऱ्यात असला तरी आपल्या सद्विचाराचे चिंतन विसरणार नाही. सदाचार सत्त्वशीलता कायम हृदयात वसलेली असते. तसेच भाग्यस्थानातील केतू कुंभ राशीला खूप मदतीचा ठरेल. तर धनस्थानात वसलेला नेपच्यून उत्तम वाणी, उत्तम विचार देईल. एकूण राहूचे मीन राशीतील राश्यांतर कुंभ राशीला फलदायक ठरेल.

मीन (Pisces Zodiac)

बारा राशीतील अखेरची जलरास मीन. या राशीचा स्वामी गुरू. ही रास व्ययस्थानात येते. अतिशय शांत, कोमल, उत्तम, दयाभाव, सहानुभूती, आत्मीयता साऱ्या खऱ्या माणुसकीच्या खुणा या राशीत प्रामुख्याने दिसून येतील. मीन राशीच्या पत्रिकेत गुरू जितका सुरक्षित असेल तितकी ती व्यक्ती कनवाळू, कृपाळू, पापभीरू आणि क्षमाशील असते. अशा मीन राशीत धनस्थानात गुरू-राहू चांडाळ योग होत आहे. एकूण हा योग आर्थिक बाबतीत काहीसा त्रासदायक ठरेल. त्यासाठी सहसा जास्त व्याजाच्या आमिषाने पैसे उसने देणे टाळावे. या गुरू-राहूसोबत वेगाने फळे देणारा हर्षल आहे. तेव्हा बँकेच्या झटपट व्यवहारात काळजी घ्यावी. स्वराशीत नेपच्यून अध्यात्माला खूपच पोषक ठरेल पण अध्यात्मात वैचारिक बैठक असू द्या. त्यात भोळेभाबडेपणा येऊ देऊ नका. त्यातून आपला गैरफायदा घेतला जाईल. अष्टमात केतू त्यामुळे जुने आजार उद्भवतील. राहू-गुरूमुळे अधिक डोके वर काढतील. योग्य उपचार करा. बाकी धनस्थानातला राहू मीन राशीत येईल तेव्हा गुरुबलात खूप चांगला फरक दिसून येईल.

।। शुभं भवतुं।।

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Biggest guru gochar after shani transit astrologer predicts which zodiac will get huge money and who face loss check your horoscope svs
Show comments