-उदयराज साने
Astrology Kundali Prediction on Karnataka Assembly Elections 2023: कर्नाटक विधानसभेच्या २२४ जागांसाठी लवकरच १० मे २०२३ रोजी मतदान होणार असल्याने, या ठिकाणी महत्त्वाचे तीन राजकीय पक्ष आपले बळ पणास लावणार आहेत. यात प्रामुख्याने भाजपा, काँग्रेस व जनता दल हेच पक्ष प्रमुख आहेत. म्हणूनच आपण प्रथम या पक्षांचा विचार करू.
काँग्रेस (Congress)
काँग्रेसच्या धनू लग्नाच्या कुंडलित कुंभ राशीतील शनी भ्रमण हे तृतीयेतून सुरू आहे. हा शनी २०२३ मे महिन्याच्या शेवटापर्यंत फक्त १२ अंशापर्यंत पुढे जात आहे. त्याच वेळी हा शनी काँग्रेसच्या मूळ कुंडलीतील रवी-बुध यांच्या केंद्रातून, तर मूळ कुंडलीतील हर्षलच्या षडाष्टकातून जाणार आहे. सत्तेचा कारक रवी हा काँग्रेसच्या मूळ कुंडलीतील मेष राशीतील चंद्र-शनीवरून भ्रमण करणार आहे. काँग्रेसला प्रारंभापासूनच योग्य उमेदवार मिळवण्यात खूप अडचणी येणार आहेत. निवडलेल्या उमेदवारांना जनतेचा प्रारंभापासूनच रोष सहन करावा लागणार आहे. प्रचारात कमालीचा विस्कळीतपणा येणार असल्याने, त्यांचे सर्व नियोजन फिसकटणार आहे. सध्या मंगळाचे भ्रमण मिथुन राशीतून सुरू असून, हे भ्रमण काँग्रेसच्या मूळ कुंडलीतील सप्तमातून सुरू आहे.
दिनांक १० मे २०२३ रोजी मंगळ कर्क राशीत प्रवेश करेल. हा मंगळ पक्षातील मूळची भांडणे अथवा मतभेद वाढवणारा आहे. ३१ मार्च रोजी बुधाने मेष राशीत प्रवेश केला असून तो २१ एप्रिलला वक्री होऊन १५ मे रोजी मार्गी होतो. मेष राशीतील बुध भ्रमण काँग्रेससाठी अत्यंत तापदायक आहे. पक्षात मोठी वैचारिक दरी निर्माण करणारे आहे, कारण बुधाचे भ्रमण चंद्र-शनीवरून होणार असून, काँग्रेसच्या मूळ कुंडलीतील बुधाला हा गोचर बुध सहावा राहणार असल्याने,महत्त्वाच्या ठिकाणी नेत्यांमधील बेबनाव वाढवत जाणारा आहे. दिनांक २१ एप्रिलच्या उत्तररात्री मीन राशीतून मेष राशीत प्रवेश करणार आहे.
निवडणुका २१ एप्रिलनंतर होणार आहेत, त्यामुळे हे गुरुभ्रमण काँग्रेसला अनुकूल ठरणार आहे. पण दिनांक २१ मे ते १७ जूनपर्यंत गुरू-राहू हा चांडाळ योग होत असल्याने, काँग्रेसचे जे पारंपरिक मतदार आहेत, ते दुसऱ्या पक्षाला मतदान करू शकतात. पंचमातून भ्रमण करणार असलेला व विधानसभेच्या स्थानावर दृष्टी ठेवणारा हा मेष गुरू म्हणूनच काँग्रेसला अनुकूल राहील. दिनांक १५ एप्रिलला रवी हा मेष राशीत प्रवेश करणार आहे, काँग्रेसच्या मूळ पत्रिकेतील चंद्र-शनीवरून होणारे रवीचे हे भ्रमण संपूर्णपणे प्रतिकूल ठरणार आहे. एकूणच कर्नाटक विधानसभेची निवडणूक काँग्रेसला खूपच संघर्ष करायला लावणारी आहे.
भारतीय जनता पक्ष (BJP)
भारतीय जनता पक्षाच्या कुंडलीत कुंभ राशीतील होणारे शनिभ्रमण, मिथुन लग्नाच्या भाग्यस्थानातून सुरू असल्याने, संमिश्र फल देणारे आहे. कारण भाजपाच्या कुंडलीतील तृतीयस्थानात मंगळ-राहू-गुरू-शनी असे तगडे ग्रह असल्याने असे घडणार आहे. भाजपाच्या कुंडलीतील रवीवरून मीनेतील गुरूचे सध्या भ्रमण होत असल्याने, त्यांना ते शुभ आहे. २२ एप्रिलपासून होणारे मेष राशीतील गोचर गुरुभ्रमण राहू व हर्षल यावरून होणार असल्याने, भाजपासाठी ते चांगले आहे. प्लूटो हा मकर राशीत असून, अष्टमातून त्याचे भ्रमण होत असल्याने, अनेक नेत्यांनी स्वतःच्या प्रकृतीची काळजी घेणे क्रमप्राप्त ठरणार आहे. दिनांक १४ एप्रिलपासून रवी हा मेष राशीतून भ्रमण करणार असल्याने, रवीला शुभ व पाप ग्रहांचे साहचर्य मिळणार आहे. भाजपाचे मतदार नसलेले लोकही भाजपाचा विचार करू लागतील.
२१ एप्रिलला बुध वक्री होत असल्याने, त्यांचे विचार आणखी बळकट होऊ लागतील. मेष राशीतील बुधाचे भ्रमण भाजपाला संपूर्ण अनुकूल नाही, कारण भाजपाच्या मूळ कुंडलीतील चंद्राच्या षष्ठात बुध-राहू-हर्षल-गुरू हे ग्रह असल्याने त्यांचे बळ थोडे कमी राहील. दिनांक ६ एप्रिलला गोचर शुक्र वृषभ राशीत आला आहे निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात शुक्राचीही अनुकूलता मिळणार असल्याने, कर्नाटक निवडणुकीसाठी भाजपाचे पारडे जड राहणार आहे.
हे ही वाचा<< “उद्धव ठाकरेंची कुंडली सांगते की, २०२५ आधीच…” ज्योतिषतज्ज्ञ उल्हास गुप्ते यांची महत्त्वाची भविष्यवाणी
जनता दल (Janta Dal)
जनता दलाच्या कुंडलीत गोचर शनीचे भ्रमण कुंभ राशीतून सुरू असून, हा गोचर शनी त्यांच्या राहूवरून भ्रमण करणार आहे. मंगळ हा मिथुन राशीतून भ्रमण करीत असून, हा मंगळ जनता दलाच्या मूळ कुंडलीतील शनी-हर्षल-नेपच्यूनच्या प्रतियोगातून व रवी- बुध-चंद्र यांच्या केंद्रातून जात असल्याने, त्याला सर्वाधिक महत्त्व द्यावे लागते. पक्षात तिकीट वाटपापासून कुरबुरी सुरू झाल्याचे नजरेस येईल. लिंगायत समाजाला आपलेसे करण्यात पक्षाला फारसे मोठे यश मिळणार नाही. मीनेतील गुरू पक्षासाठी जरी चांगला असला, तरी मेषेतील गुरू हा मूळ कुंडलीतील चंद्राला आठवा होणार आहे व त्याचे भ्रमण राहू-हर्षलवरून व मूळ कुंडलीतील प्लूटोच्या प्रतियोगातून होणार आहे. या सर्व महत्त्वाच्या ग्रहयोगांचा व ग्रहांच्या भ्रमणांचा विचार करता, या निवडणुकीत जनता दलाला भरीव कामगिरी करता येणार नसल्याचे दिसून येईल. एकूणच कर्नाटकच्या निवडणुकीत जनता दलामुळे काँग्रेसचे नुकसान होणार असून, भाजपाला मात्र त्याचा चांगलाच फायदा होईल.