Chaitra Navratri 2025 Date Time Puja Vidhi: हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सणाला खूप महत्त्वपूर्ण मानले जाते, ज्यात नवरात्री हा अनेकांच्या आवडीचा सण आहे. आश्विन महिन्यातील नवरात्र भारतामध्ये मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. या नवरात्रीत आदिशक्तीच्या आराधनेसह गरबा, दांडियादेखील खेळला जातो. परंतु, आश्विन नवरात्रीव्यतिरिक्त एका वर्षात आणखी तीन नवरात्री साजऱ्या केल्या जातात. म्हणजे वर्षात एकूण चार नवरात्री असतात. त्यातील दोन नवरात्री प्रत्यक्ष असतात आणि इतर दोन नवरात्री गुप्त असतात. चैत्र आणि अश्विन महिन्यातील नवरात्रींना प्रत्यक्ष नवरात्री मानले जाते. या दोन्ही नवरात्री संपूर्ण भारतातील लोक उत्साहाने साजऱ्या करतात. तसेच माघ आणि आषाढ महिन्यातील नवरात्रींना गुप्त नवरात्री मानले जाते. या दोन्ही नवरात्रींमध्ये साधनेला अधिक महत्त्व दिले जाते.
येत्या ३० मार्च २०२५ (रविवार) रोजी चैत्र नवरात्रीला सुरुवात होणार असून, ती ७ एप्रिल २०२५ पर्यंत असेल. चैत्र नवरात्रीच्याच दिवशी हिंदू नववर्ष आणि गुढीपाडवादेखील साजरा केला जातो.
महाराष्ट्रामध्ये चैत्र नवरात्रीचा पहिला दिवस गुढीपाडवा म्हणून साजरा करतात. तसेच भारतातील काही राज्यांमध्ये चैत्र नवरात्रीला पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते. नवरात्रीमध्ये देवीची उपासना केल्याने देवी प्रसन्न होते. दुर्गादेवी ही सुख, समृद्धी, शक्ती व धनाची देवी असल्याचे मानले जाते.
चैत्र नवरात्री घटस्थापना मुहूर्त
चैत्र नवरात्रीच्या घटस्थापनेचा मुहूर्त ३० मार्च रोजी सकाळी ६ वाजून १३ मिनिटांपासून सकाळी १० वाजून २२ मिनिटांपर्यंत आहे. तर, घटस्थापेसाठीचा अभिजित मुहूर्त दुपारी १२ वाजून ०१ मिनिटांपासून ते १२ वाजून ५० मिनिटांपर्यंत असेल.
चैत्र नवरात्रीची कथा
चैत्र नवरात्र साजरी करण्यामागे एक पौराणिक कथा आहे. त्या कथेनुसार देवी दुर्गेने महिषासुर नावाच्या राक्षसाचा वध केला. असे म्हटले जाते की, महिषासुर नावाचा एक राक्षस होता, ज्याला भगवान ब्रह्मदेवाने अमर राहण्याचे वरदान दिले होते. या वरदानामुळे तो पृथ्वीपासून स्वर्गापर्यंत सर्वांना त्रास देऊ लागला. अशा परिस्थितीत त्याच्या अत्याचारांनी त्रस्त झालेले सर्व देव-देवता ब्रह्मा, विष्णू व महेश यांच्याकडे गेले. त्यानंतर तिन्ही देवांनी आदिशक्तीचे आवाहन केले. भगवान शिव, विष्णू आणि इतर देवतांच्या क्रोधामुळे त्यांच्या मुखातून एक तेज बाहेर पडले, जे एका स्त्रीमध्ये रूपांतरित झाले. अशा प्रकारे माता दुर्गा प्रकट झाली. त्यानंतर इतर देवतांनी तिला शस्त्रे दिली. मग माता दुर्गेने महिषासुराला आव्हान दिले. नऊ दिवस युद्ध चालू राहिल्यानंतर दहाव्या दिवशी देवीने महिषासुराचा वध केला.
शारदीय नवरात्र आणि चैत्र नवरात्रीमधील फरक
शारदीय नवरात्र आणि चैत्र नवरात्रातही फरक आहे. चैत्र नवरात्री आध्यात्मिक इच्छा पूर्ण करण्यासाठी साजरी केली जाते; तर शारदीय नवरात्र सांसारिक इच्छा पूर्ण करण्यासाठी साजरी केली जाते. शारदीय नवरात्रीत देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते; तर चैत्र नवरात्रीत अनेक ठिकाणी देवी शैलपुत्रीची पूजा केली जाते, जे देवीचे पहिले रूप आहे. तसेच चैत्र नवरात्रीत शारदीय नवरात्रीप्रमाणे गरबा, दांडिया खेळला जात नाही. ही नवरात्री केवळ आध्यात्मिक सिद्धी आणि मोक्ष मिळविण्यासाठी साजरी केली जाते.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)