Chanakya Niti : आचार्य चाणक्य एक महान विद्वान होते. त्यांनी जीवनातील प्रत्येक पैलूंवर भाष्य केले आहे. राजकारण असो किंवा जीवनातील लहान मोठ्या गोष्टींबाबत त्यांच्या नीतीद्वारे त्यांनी मार्गदर्शन केले आहे. ते अर्थशास्त्राचे एक चांगले जाणकार मानले जातात. त्यांच्या मते, प्रत्येक व्यक्तीमध्ये असे गुण असतात ज्यामुळे ती व्यक्ती यशस्वी होते. अशा लोकांवर नेहमी माता लक्ष्मीचा आशीर्वाद असतो. जर तुम्ही आर्थिक अडचणींचा सामना करत असाल तर चाणक्य यांनी सांगितलेल्या काही गोष्टी तुम्ही दीर्घकाळ लक्षात ठेवायला पाहिजे. चाणक्य यांच्या या गोष्टींमुळे तुम्हाला पैशांची कमतरता कधीही भासणार नाही. चाणक्य यांनी काय सांगितले आहेत, चला तर जाणून घेऊ या.
अन्नाचा आदर करा
आचार्य चाणक्य सांगतात की ज्या घरात अन्नाचा सन्मान केला जातो, त्या घरात कधी कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही. त्याचबरोबर त्या घरात धनसंपत्तीची देवता लक्ष्मीची कृपा नेहमी असते. त्यामुळे अन्नाचा आदर करणे, खूप गरजेचे आहे. ज्या घरात अन्नाचा अपमान केला जातो किंवा अन्न वाया घालवतात, त्या घरात लक्ष्मी नांदत नाही. अन्नपूर्णा देवीचा आशीर्वाद लाभत नाही. त्यामुळे अन्नाचा नेहमी आदर करायला शिका. अन्न वाया घालवू नका.
हेही वाचा : Shani Dev : शनिदेवाची ‘या’ प्रिय राशींवर असते नेहमी कृपा; जाणून घ्या, तुमची रास यात आहे का?
ज्ञानी किंवा जाणकार लोकांचा आदर करा
चाणक्य नीतीनुसार, व्यक्तीने नेहमी ज्ञानी लोकांबरोबर संगत ठेवली पाहिजे. कारण आपण निवडलेल्या संगतीचा आयुष्यावर नेहमी परिणाम होतो. संगत वाया घालवणारी नाही तर घडवणारी असावी. ज्ञानी लोकांबरोबर संगत ठेवून नेहमी त्यांचा आदर करावा. ज्या घरी ज्ञानी लोकांचा आदर केला जातो, त्या घरी लक्ष्मी नेहमी नांदते. हे ज्ञानी लोकं तुम्हाला योग्य मार्गावर चालण्यास नेहमी प्रेरित करतात.मूर्ख लोकांमुळे तुम्हाला अनेकदा अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे ज्ञानी लोकांचा आदर करायला पाहिजे.
पती पत्नीने एकमेकांचा आदर करा
चाणक्य सांगतात की ज्या घरात पती पत्नी प्रेमाने राहतात आणि एकमेकांचा आदर करतात त्या घरात नेहमी शांतीचे वातावरण दिसून येते. याचबरोबर माता लक्ष्मी सुद्धा त्या घरात नांदते. ज्या घरात पती पत्नी एकमेकांचा आदर करत नाही, छोट्या छोट्या गोष्टींवर वाद घालतात, त्या घरात सुख शांती नसते. यामुळे घरात नेहमी शांती असणे गरजेचे आहे.त्यामुळे पत्नी पत्नीने एकमेकांचा आदर करायला शिका.