Chanakya Niti : आचार्य चाणक्य यांचे धोरण आजही तितकेच प्रासंगिक आहेत. चाणक्यांनी माणसाला आनंदी आणि उद्देश पूर्ण जीवन जगण्यासाठी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. दरम्यान, यात चाणक्यांनी पाच ठिकाणांविषयी माहिती दिली आहे, जिथे राहून व्यक्तीच्या मान, सन्मान, प्रतिष्ठेला ठेच पोहोचू शकते. आयुष्यातील अडचणी वाढू शकतात, तसेच यशाच्या मार्गात अडथळे येऊ शकतात; तर चला जाणून घेऊया, चाणक्य नीतीनुसार व्यक्तीने कोणत्या पाच ठिकाणी जाणं टाळलं पाहिजे.

१) आदर मिळत नसेल असे ठिकाण

प्रत्येक व्यक्तीला आदर मिळावा असे वाटते. जर तुम्ही अशा ठिकाणी रहात असाल, जिथे लोक तुमचा आदर करत नाहीत, तुमच्या शब्दांकडे दुर्लक्ष करतात किंवा नेहमीच तुमचा अपमान करतात, तर तिथे राहण्यात काही अर्थ नाही. अशा वातावरणात तुमचा स्वाभिमान कमी होऊ शकतो, म्हणून तिथून दूर राहणेच बरे.

२) जिथे रोजगार नाही

पैशाशिवाय जीवन जगणे कठीण आहे. जर तुम्ही अशा ठिकाणी रहात असाल, जिथे नोकरी किंवा रोजगाराच्या संधी नाहीत, तर तुम्हाला तिथे राहून फक्त संघर्ष करावा लागेल. चाणक्य नीतीनुसार ते ठिकाण कितीही सुंदर असले तरी जर तिथे उदरनिर्वाहाचे साधन नसेल तर तिथे राहणे निरुपयोगी आहे.

३) जिथे आपलं कोणी नाही

कोणत्याही अडचणी, समस्या नसतील तोपर्यंत अनोळखी ठिकाणी राहणं चांगलं वाटतं. पण, जर कठीण काळात तुम्हाला मदत करण्यासाठी कोणी नसेल तर तुम्ही एकटे पडाल, म्हणूनच चाणक्य सांगतात की, जिथे कोणी मित्र किंवा नातेवाईक नाही अशा ठिकाणी जास्त वेळ वास्तव्य करू नका.

४) जिथे शिक्षणासाठी पोषक वातावरण नाही

आयुष्यात पुढे जाण्यासाठी शिक्षण खूप महत्त्वाचे आहे. जर तुम्ही अशा ठिकाणी रहात असाल, जिथे शिक्षणाची व्यवस्था नाही किंवा शिक्षणाला फारसे महत्त्व दिले जात नाही, तर तिथे राहून तुम्ही तुमची प्रगती थांबवत आहात. चाणक्य यांच्या मते, अशी जागा सोडणेच चांगले.

५) जिथे लोकांमध्ये चांगले गुण नाहीत

जर तुम्ही अशा लोकांमध्ये रहात असाल, जिथे खूप वाईट लोक आहेत, खोटे बोलतात, एकमेकांना फसवतात आणि चांगल्या संस्कारांचा अभाव आहे, तर तिथे राहून तुमच्यावरही वाईट प्रभाव पडू शकतो, म्हणून चाणक्य असा सल्ला देतात की, अशा ठिकाणाहून ताबडतोब निघून जावे आणि अशा ठिकाणी जावे जिथे चांगले लोक सापडतील.