Chanakya Niti : हिंदू धर्मात दर शुक्रवारी देवी लक्ष्मीची विशेष पूजा केली जाते. त्यासोबतच उपवासही केला जातो. धनाची देवी लक्ष्मीची पूजा केल्याने घरात सुख, समृद्धी व शांती नांदते, अशी धार्मिक मान्यता आहे. पण, देवी लक्ष्मी अत्यंत चंचल आहे, असे शास्त्रात सांगितले आहे. माता लक्ष्मी एका ठिकाणी जास्त काळ थांबत नाही. त्यासाठी माणसाच्या जीवनात सुख-दु:खाचा क्रम सुरूच असतो. त्यामुळे देवी लक्ष्मीची नित्य पूजा करावी, असे सांगितले जाते. आचार्य चाणक्य यांनीही त्यांच्या ‘नीतीशास्त्र’ ग्रंथात धनवृद्धीबाबत मार्गदर्शन केले आहे. आचार्य चाणक्य नीतीशास्त्रात म्हणतात की, देवी लक्ष्मी स्वतःहून तीन ठिकाणी वास करते. चला तर जाणून घेऊया या तीन ठिकाणांबद्दल-
”मूर्खा यत्र न पूज्यन्ते धान्यं यत्र सुसञ्चितम्।
दाम्पत्ये कलहो नास्ति तत्र श्री: स्वयमागता॥”
आचार्य चाणक्य त्यांच्या रचना नीतीशास्त्रात म्हणतात की, ज्या घरात मुर्खांची पूजा किंवा स्तुती केली जात नाही, त्या ठिकाणी माता लक्ष्मी निश्चितपणे वास करते. घरातील व्यक्तींचे आचरण चुकीचे असेल, तर संपत्ती नष्ट होणार हे निश्चित. त्याच वेळी मूर्खांच्या सल्ल्यानुसार काम केल्यास अपयश पदरी येण्याचीच शक्यता जास्त असते. त्यामुळे धनहानी होते.
हेही वाचा – Festivals in September 2023 : कृष्ण जन्माष्टमीपासून गणेश चतुर्थीपर्यंत; येथे पाहा सप्टेंबरमधील महत्त्वाच्या सण-उत्सवांची संपूर्ण यादी
आचार्य चाणक्य सांगतात की, ज्या घरांमध्ये अन्नसाठा जास्त असतो, त्या घरांमध्ये माता लक्ष्मीचा वास नक्कीच असतो. अन्नसाठा असेल, तर माता अन्नपूर्णा प्रसन्न होते. त्याच्या कृपेने घरात कधीही अन्न आणि पैशाची कमतरता भासत नाही. त्यामुळे भविष्यासाठी किंवा संकटकाळातही अन्नधान्य घरात साठवून ठेवावे. त्यामुळे लक्ष्मीसुद्धा प्रसन्न राहते. त्यांचा आशीर्वाद नेहमी साधक आणि त्याच्या कुटुंबीयांवर मिळत राहतो.
वास्तुदोषांमुळे घरातील सदस्यांमध्ये कलहाची परिस्थिती निर्माण होते. त्याच वेळी जन्मकुंडली जुळताना गण किंवा गुण मिळत नसल्यामुळे पती-पत्नीमध्ये कायम भांडण होत राहते. अशा स्थितीत धनाची माता लक्ष्मी रागावते आणि घरातून निघून जाते. त्याच वेळी ज्या घरांमध्ये पती-पत्नीचे नाते प्रेमळ व मजबूत असते, त्या घरांमध्ये माता लक्ष्मी स्वतः येते. त्यामुळे माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी या गोष्टींचे पालन होईल असे पाहावे.