मैत्री हा आपल्या आयुष्यातील महत्त्वाचा घटक असतो. मैत्रीचे नाते व्यक्ती स्वत:साठी निवडतो. आयुष्यातील सुख, दु:ख ही मैत्रीत शेअर केली जातात. आयुष्यातील काही आनंदाचे क्षण, अनुभव आणि शांती तुम्हाला मित्र-मैत्रिणींमुळे मिळतात. अगदी लहानपणीचा एक मित्र- मैत्रीण शेवटपर्यंत तुमच्यासोबत असते किंवा असतो. आयुष्यातील अनेक वळणांवर तुम्हाला अशाप्रकारच्या मित्र-मैत्रिणींची साथ मिळते. पण, काही लोक स्वत:च्या स्वार्थासाठी मैत्री करतात. गरज पडली तर ते आपल्या स्वार्थासाठी मित्रांचा वापर करण्यापूर्वी विचारही करत नाहीत. यामुळे आता भगवान कृष्ण-सुदामासारखी मैत्री टिकवण्याची हिंमत कोणातही नाही. म्हणून आता मित्रांची परीक्षा घेणे खूप महत्वाचे आहे. यात एकत्र पार्टी करणाऱ्या आणि पिकनिकला एकत्र जाणाऱ्या लोकांना तुम्ही मित्र-मैत्रीण मानण्याची चूक करत असाल तर आता सावधगिरी बाळगण्याची वेळ आली आहे. अशा मैत्रीने तुम्ही स्वत:च्या आयुष्याचे नुकसान करून घेऊ शकता.
यावर कुशल अर्थशास्त्रज्ञ, मुत्सद्दी, राजकारणी आणि योगगुरु आचार्य चाणक्य यांनी नीती ग्रंथात, कोणत्या लोकांशी मैत्री ठेवू नये आणि खरा मित्र कसा ओळखावा याबद्दल खूप तपशीलवार लिहिले आहे. यामुळे चाणक्य नीतीमध्ये नमूद केलेल्या अशा गोष्टींबद्दल जाणून घेऊ, ज्याच्या मदतीने तुम्ही स्वतःसाठी योग्य मित्र निवडू शकता.
१) तोंडावर गोड बोलणारे मित्र
अशा मित्रांपासून दूर राहा जे तुमच्या समोर तुमची प्रशंसा करतात, पण इतरांसमोर तुमच्याबद्दल वाईट बोलतात.
असे वागणारे मित्र आवश्यकता भासल्यास त्यांच्या फायद्यासाठी तुमचा वापर करतानाही मागचा पुढचा विचार करत नाहीत. खरा मित्र तोच असतो, ज्याच्यात तुमची चूक तुमच्या तोंडावर सांगण्याची हिंमत असते आणि तो इतर लोकांकडून तुमच्याबद्दल कधीही वाईट ऐकून घेत नाही.
२) इकडच्या गोष्टी तिकडे सांगणारा मित्र
असे लोक ज्यांना गॉसिप करायला आवडते, ते कधीच कोणाचे चांगले मित्र बनू शकत नाहीत. जर तुमचा एखादा मित्र क्षणभर मजेसाठी आणि इतरांचे लक्ष वेधण्यासाठी तुमच्या गोष्टी इतरांना सांगत असेल तर तो तुमचा चांगला मित्र होऊ शकत नाही. तो तुमच्याबद्दल अनेक गोष्टी कोणालाही सांगू शकतो. म्हणूनच अशा लोकांना तुमच्या कोणत्याही सिक्रेट गोष्टी शेअर करू नका.
३) गरज असताना उपयोगी न पडणारे मित्र
सुखाच्या काळात सर्वजण सोबत असतात, पण दुःखाच्या किंवा संकटाच्यावेळी गरज असताना साथ देणारा तुमचा खरा मित्र असतो. यावेळी तुमची साथ सोडणारा मित्र कधीच तुमचा मित्र असू शकत नाही. यामुळे अशा मित्रांपासून दूर राहणेच चांगले.
संकटाच्यावेळी अथवा तुमच्या गरजेच्या वेळी एखादा मित्र आला नाही; तुम्हाला मदत न करण्यामागे कोणतेही कारण देत असेल, तर तुम्ही त्याच्याशी असलेली मैत्री संपवण्याचे हे लक्षण आहे. अशी माणसं आयुष्यात गर्दीसारखी असतात, जे तुम्हाला त्यांच्या इच्छेनुसार वापरतात.
४) विरुद्ध स्वभावाच्या लोकांशी मैत्री
ज्याप्रमाणे साप-मुंगूस, शेळी-वाघ, हत्ती-मुंगी, सिंह-कुत्रा हे कधीही मित्र होऊ शकत नाहीत, त्याचप्रमाणे विरुद्ध स्वभावाच्या लोकांशीही मैत्री होऊ शकत नाही. यामुळे तुमच्या स्वभावापेक्षा विरुद्ध स्वभावाच्या व्यक्तीपासूनही दूर राहावे, असे आचार्य चाणक्यही सांगतात.
आज जरी अशी व्यक्ती तुमच्यावर खूप प्रेमाचा वर्षाव करत असेल, परंतु त्याच्या स्वभावानुसार तो एक दिवस नक्कीच बदलेल आणि तुम्हाला त्याचे मोठे नुकसान सहन करावे लागेल.