लग्नासाठी कितीही पैसा खर्च केला तरी पती-पत्नी एकत्रित सुखी-आनंदी असतील तर ते नाते टिकते. लग्नानंतरच्या जबाबदाऱ्या आणि आव्हानांना दोघांना एकत्रितपणे तोंड द्यावे लागते. पतीवर काही संकट आले तर पत्नीने त्याला आधार द्यायचा असतो. पण, अशावेळी जर दोघांनी एकमेकांना नीट साथ दिली नाही तर ते नातं तुटायला वेळ लागत नाही. म्हणून नवरा-बायकोने आपल्या नात्याची गरज आणि महत्त्व वेळीच समजून घेणे आणि त्यानुसार वागणे गरजेचे आहे. आचार्य चाणक्य यांच्या मते, विवाहित जोडप्याने त्यांचे नाते तुटण्यापासून वाचवण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवणे आणि त्यानुसार वागणे फार महत्वाचे आहे.
चाणक्य नीतीमध्ये सांगण्यात आले आहे की, जे पती-पत्नी काही गोष्टी वेळेवर समजूत घेत नाही, त्यानुसार वागत नाही, त्यांच्या वैवाहिक जीवनात खूप दुःख असतात; यामुळे त्यांचे नाते फार काळ टिकत नाही. यामुळे पती पत्नीच्या नात्यात खालील पाच गोष्टी समजून घेणे फार महत्वाचे आहे.
१) प्रत्येक वेळी रागावणे
रागामुळे प्रत्येक काम आणि प्रत्येक नाते बिघडते. त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या पती किंवा पत्नीवर सतत राग येत असेल तर ही सवय लगेच बदला. कारण ज्याच्यासोबत तुम्हाला संपूर्ण आयुष्य घालवायचे आहे, त्याच्यावर सतत राग व्यक्त करत राहिलात तर त्यांच्या ह्रदयात तुमच्याविषयी असलेले प्रेम कमी होईल, जे शेवटी तुमच्यासाठी योग्य नाही.
२) एकमेकांपासून काही गोष्टी लपवणे
जर तुम्ही एखादी चूक पकडली जाण्याच्या भीतीने लपवत असाल किंवा जोडीदाराच्या दहा प्रकारच्या प्रश्न-उत्तरांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करत असाल, तर तुम्ही स्वत:च तुमचा संसार मोडण्याची व्यवस्था करत आहात.
जे नवरा-बायको काही स्वार्थापोटी एकमेकांना काही गोष्टी सांगत नाहीत, ते आपल्या वैवाहिक जीवनात कधीही सुखी राहू शकत नाहीत. त्यांचा सगळा वेळ एकमेकांवर आरोप करण्यात आणि संशय घेण्यात जातो.
३) नात्याची काळजी न घेणे
प्रत्येक नात्याप्रमाणे नवरा-बायकोच्या नात्यालाही काही मर्यादा असतात. दोघांनी एकमेकांचा आदार केला पाहिजे, पण अनेकदा तसे होत नाही. जे विवाहित जोडपे याकडे लक्ष देत नाहीत, ते कधीही एकत्र आनंदी राहू शकत नाहीत. दोघांमध्ये नेहमीच नाते दुरावण्याची परिस्थिती असते. याचा फायदा घेण्यासाठी अनेक वेळा तिसरी व्यक्तीही येते.
४) खोटे बोलणे
नवरा-बायकोचे नाते इतके नाजूक असते की, एका खोट्या गोष्टीनेही ते संपू शकते. म्हणूनच दोघांनी कोणत्याही गोष्टीत खोटं बोलण्याची चूक करू नका.जरी तुम्हाला वाटत असेल की, तुम्ही खूप छोट्या गोष्टीत खोटे बोलत आहात, तर तसा समज करून घेऊ नका; कारण तुम्हाला काही गोष्टी किरकोळ वाटत असल्या तरी त्या तुमच्या जोडीदारासाठी खूप महत्त्वाच्या असू शकतात. अशा गोष्टी तुम्हाला कळायला हव्या.
५) अवाजवी खर्च न करणे
वैवाहिक जीवन सुखी राहण्यासाठी पैशांचे योग्य व्यवस्थापन करणे अत्यंत आवश्यक आहे, अन्यथा प्रेमाचे द्वेषात रूपांतर व्हायला वेळ लागत नाही. आजकाल बहुतेक घटस्फोट पैशांमुळे होतात. म्हणूनच पती-पत्नीने खर्चाच्या बाबतीत अत्यंत सावधगिरी बाळगली पाहिजे.