-जयंती अलूरकर
CM Eknath Shinde Astrology: प्रत्येक राष्ट्र, प्रांत याला स्वतःचे असे एक एक संचित असते. त्या संचित मूल्यांचे ज्याला समग्र आकलन होते व ज्याला संचिताबरोबर ध्येय व स्वप्न ह्यांचा अनुबंध साधता येतो, तो द्रष्टा राजकारणी होतो. टॅरो कार्ड्सच्या मदतीने आपण राजकीय नेत्यांच्या अंतरंगात डोकावून त्यांचा २०२३-२०२४ या कालखंडाचा राजकीय प्रवास पाहणार आहोत. टॅरो रुपी आरसा हेच सांगतो की भूतकाळात झालेल्या सर्व घटनांचा वर्तमानावर परिणाम होतो. आणि त्या त्या गोष्टी योग्य वेळेवर सावरल्या गेल्या नाहीत तर भविष्यावर सुद्धा त्यांचे परिणाम झाल्याशिवाय राहत नाहीत.
टॅरो रुपी आरश्यात डोकावणारा आजचा चेहरा आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. त्यांचा चेहरा खंबीर आणि शांत दिसत आहे. आनंद दिघे यांच्यादेखरेखी खाली तयार झालेला हा नेता लहान-मोठ्या आरोपांना घाबरणारा, डगमगणारा नाही. हे वेळोवेळी ते दाखवून देतील, ते राजकीय क्षेत्रात दमदार वाटचाल करताना दिसत आहेत. कारकिर्दीत सामान्य कार्यकर्त्या पासून मुख्यमंत्री होण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास खडतर आहे. आपण मुख्यमंत्रीपदी बसावे, अशी आशा धरून त्यांनी काम केलेले नाही. अथक परिश्रमामुळेच ते ह्या पदापर्यंत येऊन पोहोचल्याचे दिसत आहे. अन्यथा शिंदे हे माध्यमातून त्यापूर्वी कधीच फारसे झळकलेले दिसले नाहीत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हाती मॅजिक कार्ड
पडद्यामागे काम करणारा त्यांच्यातील नेता टॅरो कार्ड मधल्या “मॅजिशिअन” च्या रूपामध्ये अचानक प्रसिद्धीच्या झोतात आलेला दिसत आहे. या मॅजिकमुळेच आमदार मोठ्या संख्येने पाठीशी उभे राहतात. राजकारणात ही सोपी गोष्ट नाही. राजकारणात मोठमोठ्या नेत्यांच्या मागेपुढे करणारे खूप लोक असतात. पण एखाद्याला एक मुखाने, एक मताने, एक मनाने आपला नेता म्हणून निवडतात तेव्हा ते मॅजिकच असतं. मॅजिशिअन हे कार्ड ती व्यक्ति सर्वार्थाने एखादी गोष्ट पेलण्याची ताकद बाळगणारी असते असं सांगतं.
शिंदेंना गूढ गोष्टीची माहिती…
शिंदे यांचा राजकीय आलेख यशाकडे जाणारा दिसत आहे. त्यांच्या कार्यकालात त्यांनी केलेलं काम हाच त्यांचा यूएसपी असेल. टॅरो कार्ड मधले सगळ्यात दुर्मीळ येणारे कार्ड “High Priestess” हे त्यांच्यासाठी आले आहे. याचाच अर्थ, सर्व गोष्टींची सर्व बाजूंनी सर्व माहिती अभ्यासूनच ही व्यक्ती काम करते. चांगले-वाईट, न्याय-निवाडा या वरती विशेष लक्ष ठेवते. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने काम करायला त्यांना आवडते. त्याच बरोबर गूढ गोष्टींची माहिती या व्यक्तीच्या पोतडीत असल्यामुळे विरोधकांनी विशेष खबरदारी घ्यावी असे टॅरो कार्ड्स सूचित करत आहेत.
एकनाथ शिंदे यांना मिळालं जस्टीस कार्ड
शिंदे ह्यांच्या कामात ते तळागाळातले लोकं, तसेच शेतकरी ह्यांच्यासाठी प्रामुख्याने काम करताना दिसतील. तरुण आणि विद्यार्थीवर्ग ह्यांच्यासाठी महाराष्ट्रात विविध योजना राबवताना दिसतील. स्त्रीशिक्षणाबाबत खेडोपाड्यांमध्ये जागरूकता निर्माण करताना, ते खरोखरच त्यांच्यापर्यंत पोहोचते आहे ना, ह्याची दखल सुद्धा घेताना दिसतील. त्यांना आलेले “जस्टीस” कार्ड, सुरुवातीला त्यांना अनेक न्यायालयीन खटल्यांना सामोरे जावे लागणार आहे असे सांगत आहे. अशा वेळी न डगमगता उत्तम प्रकारे सर्व खटल्यांना सडेतोड उत्तरे देत त्यांना विजय सुद्धा मिळवून देताना दिसत आहे.
हे ही वाचा<< शिवसेना नाव गेलं, चिन्हही गेलं, आता उद्धव ठाकरेंसमोर पुढचं संकट असणार.. ज्योतिष तज्ज्ञांनी वर्तवली भविष्यवाणी
उदाहरणार्थ, १६ आमदारांची अपात्रता हा विषय विधानसभा अध्यक्षांच्या अखत्यारीतला असून अध्यक्षांची निवड सुद्धा पूर्णपणे कायदेशीर असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने नमूद केले आहे, म्हणजेच “जस्टिस” कार्ड शिंदेंच्या पाठीशी उभे राहताना दिसत आहे. पक्ष आणि चिन्ह हे दोन्हीही सध्यातरी शिंदेंकडेच राहील. हा विषय न्यायप्रविष्ठ असल्याने ह्याबद्दल ज्यास्त कुठलीही टिप्पणी करणे उचित राहणार नाही.
महानगरपालिकेत शिंदेंना युतीचा फायदा की तोटा?
मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीबद्दल बोलायचे झाल्यास, या वेळी भाजप-शिवसेना (शिंदे) युतीस सम-समान मते पडताना दिसत आहेत. कुठेतरी शिंदेंच्या नेतृत्त्वाला सामान्य जनमानसात रुजायला थोडा तरी अवधी लागेल असं दिसत आहे. त्यातही शिंदे स्वतःच्या कामाने जनमानसाचा कौल स्वतःकडे नक्कीच प्रयत्नपूर्वक वळवण्यात यशस्वी होतील, असे दिसत आहे.