Dhanteras 2024 Date and Time: हिंदू धर्मात दिवाळी या सणाला विशेष महत्त्व आहे. दिवाळी हा सण भारतातच नव्हे तर जगभरात उत्साहत साजरा केला जातो. दिवाळी हा सण ५ दिवसांचा असतो. या पाच दिवसामध्ये घरोघरी अगंणात दिवे लावले जातात. आकाशकंदील लावले जातात. दारात रागोंळी काढली जाते. घरात फुलांची आरास करतात. दाराला तोरण बांधतात. घरोघरी फराळ करण्यासाठी मित्र-मैत्रिणींना बोलावले जाते. दिवाळीच्या दिवसांमध्ये सोन्या -चांदीची खरेदी करतात. नवीन वस्तूंची खरेदीदेखील या काळात करतात. धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मी पूजा, वसूबारस आणि भाऊबीज अशी पाच दिवाळी साजरी केली जाते.

दिवाळीच्या सणाला आता अवघे काही दिवस उरले आहेत. लोक वर्षभर या सणाची वाट पाहत असतात. दिवाळीची तयारी महिनाभर आधीच सुरू होते. माहितीसाठी, धनत्रयोदशीचा सण दिवाळीच्या दोन दिवस आधी साजरा केला जातो. याला धनत्रयोदशी किंवा धन्वंतरी जयंती असेही म्हणतात. या दिवशी लोक खरेदी आणि पूजा करतात. जाणून घेऊया या वर्षी धनत्रयोदशी कधी आहे, शुभ मुहूर्त आणि महत्त्व काय आहे…

धनत्रयोदशीचे महत्त्व

धनत्रयोदशीपासून दिवाळीला खरी सुरुवात होते. धनत्रयोदशीचा सण दरवर्षी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशीला असतो. या सणाला धनतेरस म्हणूनही ओळखतात. धनतेरस हा शब्द ‘धन’ आणि ‘तेरस’ या दोन शब्दांपासून बनला आहे. धन संपत्तीचे प्रतिनिधित्व करते आणि तेरस तेरावा दिवस दर्शवितो. पाच दिवसांचा दिवाळी सण अधिकृतपणे या दिवशी सुरू होतो. असे मानले जाते की, या दिवशी समुद्रमंथन किंवा समुद्रमंथनाच्या वेळी देवी लक्ष्मी दुधाच्या सागरातून प्रकट झाली.

“आयुर्वेदाचे हिंदू देव, भगवान धन्वंतरीची उत्पत्ती झाल्याकारणाने या दिवशी धन्वंतरीचा जन्मोत्सव साजरा केला जातो.” अशी माहिती पंचांगकर्ते पं.गौरव देशपांडे यांनी लोकसत्ताला दिली. असे मानले जाते की, भगवान धन्वंतरीची पूजा केल्यास चांगले आरोग्य आणि समृद्धी लाभते.

हेही वाचा – दिवाळीपूर्वी तयार होत आहे गुरु पुष्य योग! दागिने, मालमत्ता, वाहन खरेदी करण्याचा शुभ मुहूर्त जाणून घ्या….

धनत्रयोदशी २०२४ कधी आहे?

वैदिक कॅलेंडरनुसार त्रयोदशी तिथी २९ ऑक्टोबरला सकाळी १०.३४ वाजता सुरू होते आणि ३० ऑक्टोबर २०२४ रोजी दुपारी १:१७ वाजता समाप्त होईल. त्यामुळे २९ ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशीचा सण साजरा करण्यात येणार आहे.

हेही वाचा –कोजागरी पोर्णिमेला चांदीसारखे चमकेल ‘या’ राशींच्या लोकांचे नशीब! चांगले दिवस येणार

धनत्रयोदशीचा शुभ मुहूर्त

धनत्रयोदशीची पूजा संधिकाळात केली जाते. अशा स्थितीत २९ ऑक्टोबर रोजी पूजेचा शुभ मुहूर्त संध्याकाळी ६:३१ ते ८:१३ असेल. धनत्रयोदशीला भगवान धन्वंतरी, गणेश आणि कुबेर यांची पूजा करण्याची परंपरा आहे.

धनत्रयोदशीी कोणत्या वस्तूंची खरेदी करणे शुभ मानले जाते.

धनत्रयोदशीला खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. या दिवशी लोक सोने, चांदी, भांडी, झाडू इत्यादी वस्तू खरेदी करतात. तसेच या दिवशी भगवान धन्वंतरी आणि माता लक्ष्मीची पूजा केल्याने आरोग्य मिळते आणि आर्थिक समस्या दूर होतात.

हेही वाचा – कोजागरी पोर्णिमेनंतर सुर्य देव बदलणार आपली चाल, ‘या’ राशीच्या लोकांना मिळणार अपार पैसा आणि पद-प्रतिष्ठा

कसे केले जाते धनत्रयोदशीचे पूजन?

या दिवशी सोने, चांदी , भांडी खरेदीला विशेष महत्त्व असते. “नवीन भांड्यामध्ये धणे भरून त्याचे पूजन केले जाते आणि दुसऱ्या दिवसापासून ते वापरण्याची प्रथा आहे.

“धनत्रयोदशी दिवशी, कणकेच्या पिठामध्ये हळद घालून दिवा तयार केला जातो आणि तो सायंकाळी दक्षिणेकडे तोंड करून दिवा लावण्यास सांगितला जातो. त्यामुळे यमाची कृपा होते असे मानले जाते.” असे पं.देशपांडे यांनी सांगितले.

याशिवाय धनत्रयोदशीला लक्ष्मी म्हणून झाडू अथवा केरसुणीची पुजा केली जाते. घरात सुख-शांती येते आणि संपत्ती वाढते असे मानले जाते.