Diwali 2022, Padwa and Bhaubeej: मंगळवारी झालेल्या खंडग्रास सूर्यग्रहणानंतर आजचा दिवस हा ग्रहणाचा करी दिन असल्याने बलिप्रतिपदा आणि भाऊबीज साजरी करावी का? ग्रहणाच्या दुसऱ्या दिवशी येणारा करी दिन हा अशुभ असतो मग त्या दिवशी सण साजरे करताना काही विशेष काळजी घ्यावी का? बलिप्रतिपदा नेमकी कधी सुरु होते? आजच भाऊबीजही साजरी करायची का? हे आणि असे अनेक प्रश्न मागील काही दिवसांपासून भाऊबीज आणि बलिप्रतिपदेसंदर्भात चर्चेत आहेत. याच सर्व प्रश्नांना पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी सविस्तर उत्तरं दिली आहेत.
नक्की वाचा >> Diwali Padwa 2022: ‘साडेतीन मुहूर्त’ म्हणजे काय? हे दिवस नेमके कोणते? ‘अर्धा मुहूर्त’ दिवाळी पाडव्याचा की अक्षय्य तृतीयेचा?
करी दिनाचं काय?
सूर्यग्रहणाच्या पुढील दिवस हा करी दिन म्हणून ओळखला जातो. हा दिवस अशुभ असल्याचं मानलं जातं. मात्र बलिप्रतिपदेचं महत्त्व इतकं आहे की करी दिनाचा प्रभाव यापुढे राहत नाही, असं दा. कृ. सोमण यांनी सांगितलं. त्यामुळे आजचा दिवस हा शुभ दिवस आहे. संपूर्ण दिवस शुभ दिवस म्हणूनच साजरा करावा असं दा. कृ. सोमण यांनी सांगितलं आहे.
आजच्या दिवसाचं महत्त्व काय?
आज कार्तिक शुक्ल प्रतिपदा, दिवाळी पाडवा, बलिप्रतिपदा, अभ्यंगस्नान, वहीपूजन, अन्नकूट, गोवर्धन पूजन, आनंदनाम विक्रम संवत् २०७९, महावीर जैन संवत् २५४९ , यमद्वितीया, भाऊबीज आहे. विक्रम संवत् २०७९ या नूतन वर्षाचा प्रारंभ होत आहे. महाराष्ट्रात चैत्र शुक्ल प्रतिपदेला शालिवाहन शक वर्षांचा प्रारंभ होतो त्यादिवशी आपण नवीन वर्षारंभ साजरा करीत असतो. त्या दिवसाला आपण ‘चैत्री पाडवा ‘ असे म्हणतो. गुजरात आणि उत्तर भारतात विक्रम संवत् पाळला जातो, अशी माहिती दा. कृ. सोमण यांनी दिली.
संवत् म्हणजे काय?
कार्तिक शुक्ल प्रतिपदा हा विक्रम संवत् वर्षाचा पहिला दिवस असतो, या दिवसाला ‘दिवाळी पाडवा‘ म्हणून ओळखले जाते. आज विक्रम संवत् २०७९ चा प्रारंभ होत आहे. या नूतन विक्रम संवत्सराचे नाव ‘आनंद’ असे आहे. विक्रम संवत् हा उज्जयिनीस विक्रमादित्य राजाने सुरू केला. शालिवाहनाच्या शकामध्ये १३५ मिळवले की विक्रम संवताचे वर्ष येते, असं दा. कृ. सोमण यांनी सांगितलं.
बलिप्रतिपदेचं महत्त्व काय?
आज बलिप्रतिपदा म्हणजेच दिवाळी पाडवा. कार्तिक शुक्ल प्रतिपदा सूर्योदयी असेल त्या दिवशी बलिप्रतिपदा साजरी करावी असं दा. कृ. सोमण सांगतात. बलिप्रतिपदा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक दिवस मानला जातो. व्यापारी लोक शुभ चौघडी वेळ पाहून लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पुजलेल्या नवीन वह्यांवर बलिप्रतिपदेपासून हिशेब लिहिण्यास प्रारंभ करतात.
भाऊबीजही आजची साजरी करायची कारण…
बलिप्रतिपदेबरोबरच आज यमद्वितीया म्हणजेच भाऊबीज कार्तिक शुक्ल द्वितीया अपराण्हकाली असेल त्या दिवशी साजरी करावी. आज दुपारी २ वाजून ४२ मिनिटांनी कार्तिक शुक्ल प्रतिपदा संपून द्वितीया सुरू होत आहे. दिनमानाचे पाच भाग करावे. चौथ्या भागाला अपराण्हकाळ म्हणतात. आज दुपारी १ वाजून ३१ मिनिटांपासून दुपारी ३ वाजून ४९ मिनिटांपर्यंत अपराण्हकाल आहे. या कालात कार्तिक द्वितीया आहे. त्यामुळे भाऊबीजही आजच साजरी करायची असल्याचंही दा. कृ. सोमण यांनी स्पष्ट केलं आहे.
आधी कोणी ओवाळावे पत्नी की बहीण?
आज दुपारी २ वाजून ४२ मिनिटांपर्यंत कार्तिक शुक्ल प्रतिपदा असली तरी बलिप्रतिपदा दिवसभर साजरी करावी. तसेच द्वितीया दुपारी २ वाजून ४२ मिनिटांना सुरू होणार असली तरी दिवसभर भाऊबीज साजरी करावी, असं दा. कृ. सोमण यांनी म्हटलं आहे. पत्नी आणि बहीण कोणीही अगोदर ओवाळले तरी चालेल, असं दा. कृ. सोमण यांनी सांगितलं.